पन्नाशीत असतानाही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली होती…
भारतीय बॅडमिंटन मधील दिग्गज नंदू नाटेकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. गत शतकात सहाव्या सातव्या दशकात भारताला जगाच्या बॅडमिंटन नकाशावर नेणारा हा अवलिया. बॅडमिंटन या खेळाची सारी नजाकत अंगी असलेला हा एक महान खेळाडू. अष्टपैलू, अष्टावधानी प्रत्येक खेळात निष्णांत असलेला लोभस मोहक व्यक्तिमत्त्वामुळे बॅडमिंटनचा हा “चॉकलेट बॉय” परदेशातही लोकप्रिय होता.
भारताला, परदेशातील स्पर्धांची बॅडमिंटनमधील विजेतेपदे मिळवून देण्यात तो अग्रेसर होता. आद्य पुरुष होता.
खरं तर बॅडमिंटन त्याचं पहिलं प्रेम टेनिस होतं. १९५१ साल असेल ते. टेनिसमधील दिग्गज रामनाथन कृष्णन यांच्यासोबत ज्युनिअर नॅशनल अंतिम सामना तो हरला. तो पराभव त्याने एवढा जिव्हारी लावून घेतला की पुन्हा टेनिस कोर्टावर पाय ठेवणार नाही.
टेनिसचे अपरिमित नुकसान झाले, पण बॅडमिंटनचा फायदा झाला. बॅडमिंटन खेळातील तो एक उत्तुंग क्रीडापटू ठरला. वयाच्या विसाव्या वर्षी बॅडमिंटन खेळाबरोबर त्यांची झालेली मैफल तब्बल दोन दशके रंगली. शंभराहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेतेपद त्यांनी जिंकली.
१९५१ ते ६१ या कालावधीत दशकाहून अधिक काळ त्यांनी थॉमस कप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे आव्हान एक हाती पेलावले.
नंदू नाटेकर यांच्या खेळाबाबत आदराने बोललं जायचं. त्यांच्या खेळात शैलीमध्ये नजाकत होती. एखाद्या नर्तकीच्या लयबद्ध हालचाली होतात तशी लयबद्धता त्यांच्या खेळात होती. त्यांचा खेळ पाहताना चांगलं नृत्य पाहतोय असा भास व्हायचा. कारण नर्तकी सारखे त्यांचे पदलालित्य होते. शरीराची हालचाल तालबद्ध लयबद्ध व्हायची. त्या हालचालीत रिदम असायचा. कारण त्यांच्याकडे बॅडमिंटन खेळाची परिपूर्णता होती. सर्व फटक्यांनी त्यांचा भाता समृद्ध होता. फटके तंत्रशुद्ध अगदी पुस्तकातील असावेत असे होते.
खेळ खेळताना हात एकीकडे पाय दुसरीकडे असं वेडेवाकडे चित्र कधीच दिसायचे नाही.
बॅडमिंटन मधील परिपूर्णता त्यांना प्रसन्न होती. कारण त्यांचे कोर्टावर खेळतानाचे अनुमान अंदाज आडाखे अचूक होते. आपण मारलेला शटल कॉक समोरचा खेळाडू कुठे मारणार याचा त्यांना अचूक अंदाज यायचा. या पूर्वानुमान क्षमतेने त्यांना भारतीय बॅडमिंटनमधील दिग्गज केले. कारण त्या देणगीमुळे त्यांची फटका खेळताना कोर्टावर पळापळ व्हायची नाही. ते आधीच अंदाज आल्याने कोर्टावर त्याठिकाणी हजर असायचे. त्यामुळे ते एकाच जागी उभे राहून किंचित हालचाल करीत सामना खेळायचे त्यामुळे त्यांची दमछाक ही कमी व्हायची.
बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरीचे माजी विजेते अनिल प्रधान आणि नंदू नाटेकर यांनी एकत्रित खेळ केला आहे. अनिल प्रधान नाटेकर यांच्या पेक्षा दहा वर्षांनी लहान. नाटेकर पन्नाशीत असताना प्रधानांनी त्यांच्यासोबत वर्ल्ड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १९८५ साली टोरंटो (कॅनडा) येथे झालेल्या एका स्पर्धेत नाटेकर व प्रधान जोडीने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.
अनिल प्रधान म्हणतात,
” पण नाटेकरांचा माझा संबंध आला तो १९७१-७२ ला जेव्हा महाराष्ट्र बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक व्यवस्थापक होते तेव्हापासून. नंदू नाटेकर मृदू स्वभावाचे, मितभाषी व्यक्तिमत्त्वाचे होते. नाटेकरांमुळेच महाराष्ट्राला व भारताला परिपूर्ण, ऑलराऊंडर बॅडमिंटन कला पाहता आली.”
प्रतिस्पर्ध्यांच्या डावपेचाचा व पुढील फटक्यांचा आधीपासूनच अंदाज असल्याने त्यांनी अनेक नवनवे प्रयोग यशस्वी केले. म्हणजे एकाच ॲक्शन मध्ये दोन वेगळ्या प्रकारचे फटके मारण्याची कला त्यांनी विकसित केली होती.
नाटेकर यांच्या आगमना वेळी म्हणजे १९५० च्या सुमारास त्यावेळचा ऑल इंग्लंड चॅम्पियन मलेशिया चा वांग पेन सून भारतात आला होता. तो बॅक हँड फटक्यांचा मास्टर होता. त्याला पाहून नाटेकरांनी टॉस, स्मॅश व ड्रॉप्स हे आपले हुकमी फटके बॅक हँड मध्येही विकसित केले. त्यामुळे आरंभीचा त्यांचा खेळ सर्व फटक्यांनी समृद्ध बनला. त्यामुळेच ते राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे तगडे आव्हान वीर म्हणून गाजले.
- विनायक दळवी
हे ही वाच भिडू.
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये घोड्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले !
- अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी तिच्या ताटातील एक कण उचलला आणि म्हणाले, पदक हीच मुलगी जिंकणार
- लाल मातीच्या पहिलवानांना ऑलिम्पिकच्या मॅटवर पोहचवणारे कुस्तीचे भीष्म पितामह….