नंदुरबार काँग्रेससाठी इतकं महत्वाचं का आहे?

२९ सप्टेंबर २०१०. नंदुरबार जिल्ह्यातल थेंबली गाव एखाद्या सणाप्रमाणे सजल होतं. या आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून मोठमोठ्या आलिशान गाड्या हेलिकॉप्टर यांची वर्दळ सुरु होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्यपाल के शंकरनारायण, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया असे अनेक मोठमोठे नेते अधिकारी हजर होते.

प्रसंग होता आधार कार्डच्या उद्घाटनाचा.

खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते संपूर्ण भारतात पहिल्यांदाच आधार कार्ड योजनेचा शुभारंभ होत होता. पंतप्रधान येणार म्हणून संपूर्ण देशातील मीडिया जिल्ह्यात आला होता. पण नंदुरबारकरांना एका व्यक्तीच्या आगमनाची उत्सुकता होती. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी.

सोनिया गांधींचे सभास्थळी आगमन झाले आणि टाळ्यांचा आणि जयघोषाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. सोनिया गांधींनी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका स्थानिक आदिवासी महिलेला पहिलं आधार कार्ड देऊन या योजनेचा शुभारंभ केला. देशाच्या इतिहासात क्रांतिकारी ठ्वल जाणारं पाऊल पडलं होतं.

संपूर्ण भारत भरात चर्चा होती कि काँग्रेसने एवढी मोठी योजना सुरु करण्यासाठी याच भागाची निवड का केली?

याच उत्तर आहे गांधी घराण्याचे आणि गांधी घराण्याचे खास नाते. एककाळ होता अगदी उत्तरप्रदेश मधील अमेठी रायबरेली पडतील पण नंदुरबार मध्ये गांधी घराण्याने दगड देखील उभा केला तरी तो निवडून येईल असं म्हटलं जात होतं.

याची सुरवात होते इंदिरा गांधी यांच्यापासून.

सत्तरच्या दशकात इंदिरा गांधी भारतातल्या सर्वात लोकप्रिय नेत्या म्हणून उदयास आल्या. नेहरूंची मुलगी हि इमेज त्यांनी मोडून काढली. काँग्रेसला खऱ्या अर्थाने समाजवादी वळण त्यांनीच दिले. बँकांचे राष्ट्रीयीकरण , संस्थाने खालसा करणे असे अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले. काँग्रेसमध्ये असलेल्या बड्या धेंड्यांनी अनेक प्रयत्न केले पण इंदिरा गांधी त्यांना पुरून उरल्या. बांगलादेश युद्धातील विजयामुळे तर त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. 

संपूर्ण देशात दुर्गा म्हणून त्या फेमस झाल्या.

गरिबी हटावचा नारा देणाऱ्या इंदिरा गांधी आदिवासी भागात विशेषतः आदिवासी महिलांना आपल्या वाटायच्या. गोरगरिबांच्या विकासासाठी प्रतिबद्ध आहेत यावर आदिवासी समाजाचा विश्वास होता. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना इंदिरा गांधींनी नंदुरबार भागात एका आदिवासी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सभा घेतली होती. तिथे त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला.

पुढे आणीबाणी नंतर मात्र इंदिरा गांधींचा सर्वात वाईट कालखंडास सुरवात झाली.

७७ साली त्या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या. अनेक मोठमोठे नेते त्यांना सोडून गेले. मोरारजी देसाई यांच्या सरकारने त्यांच्या वरील कारवाई तीव्र केली. एकदा तर त्यांना तीस हजारी कोर्टात हजर राहणायची नोटीस देण्यात आली. 

इंदिराजींच्या अटकेच्या निषेधार्थ लोकसभेत महाराष्ट्राच्या खासदारांनी उपोषण केले ज्याची प्रसिद्धी देशभरात झाली. यात आघाडीवर दोन खासदार होते. एक म्हणजे नंदुरबारचे खासदार सुरूपसिंग नाईक आणि धुळ्याचे खासदार विजय नवल पाटील. 

 तेव्हा नंदुरबार देखील धुळे जिल्ह्यात येत होता. इंदिरा गांधींच्या वाईट काळात देखील त्यांच्या पाठीशी राहिलेले एका जिल्ह्यातले दोन खासदार त्यांना मोठा कॉन्फिडन्स देऊन गेले.

तेव्हापासून इंदिरा गांधींनी एक परंपरा पाळली, आपल्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ नंदुरबार मधून करायचा. हि परंपरा राजीव गांधी सोनिया गांधी यांनी देखील पाळली.

१९५२ मध्ये पहिली लोकसभा निवडणूक झाल्यापासून काही मोजकी वर्षे वगळता २०१४ पर्यंत सलग नंदुरबार मतदारसंघावर काँग्रेसची घट्ट पकड राहिली. विशेषतः माणिकराव गावित सलग नऊ वेळा निवडून आले. त्यांच्यवर सोनिया गांधी यांचा इतका विश्वास होता कि त्यांना २००४ साली केंद्रात गृहराज्य मंत्रिपदाची जबाबदारी दिली. जवळपास तीस वर्षे माणिकराव गावित यांनी नंदुरबार मतदारसंघावर राज्य केलं.

२०१४ साली मोदींची लाट आली. राहुल गांधींच्या कडे सूत्रे सोपवलेल्या काँग्रेसचे सगळे गड ढासळले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माणिकराव गावित यांचा देखील नंदुरबार मधून पराभव झाला. त्यांना विजयकुमार गावित यांच्या मुलीने म्हणजेच हिना गावित यांनी हरवलं.

त्या वर्षी सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे नंदुरबारला प्रचाराला येऊ शकल्या नव्हत्या. हे देखील माणिकराव गावितांच्या पराभवाचे कारण सांगितले गेले. २०१९ च्या लोकसभेच्या वेळी काँग्रेसने के.सी.पदवी या आक्रमक नेत्याला तिकीट दिलं. तेव्हा देखील स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडे प्रियांका गांधी यांना प्रचाराला बोलवण्याची मागणी केली होती. पण गांधी घराण्यातील कोणीही फिरकले नाहीत. २०१९ साली पुन्हा काँग्रेसचा नंदुरबार मधून पराभव झाला.

आता राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीवर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक पदाधिकारी बदलले जात आहेत. नव्या नेत्यांना संधी दिली जात आहे. महाराष्ट्रात देखील प्रदेशाध्यक्षपदी तरुण तेजतर्रार नाना पटोलेंना आणून काँग्रेसने याची लक्षणे दाखवून दिली आहेत.

याचेच पडसाद आता महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये दिसून  येतील असं म्हटलं जात आहे. काँग्रेस या विस्तारात काही मंत्र्यांना वगळणार आहे. यात एक प्रमुख नाव चर्चेत आहे ते आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवाचे आमदार के.सी.पाडवी यांचं. पाडवी यांच्या सारख्या मोठ्या नेत्याला वगळणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पण केसी पाडवी यांना डच्चू मिळणार नसून त्यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून बढती मिळणार आहे असं सांगितलं जातं.

नंदुरबार जिल्ह्यात जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षाशी जोडून घेण्याचे प्रयत्न चालले आहेत. इथे पक्ष पुनर्जीवित झाला तर त्याचा एकूणच राजकारणावर परिणाम होणार हे नक्की. याचाच अर्थ काँग्रेसने आपल्या बालेकिल्ल्याकडे लक्ष केंद्रित करून भाजपकडून जिल्हा खेचून घेण्याचं अगदी मनावर घेतलं आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.