एक अर्थतज्ञ असाही होता ज्याचं भाषण ऐकण्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियम फुल्ल व्हायचं..

तसं बघायला गेलं तर अर्थसंकल्प ऐकणं म्हणजे एक परीक्षाच असते. आणि त्यावरच विश्लेषण करणार भाषण ऐकणं म्हणजे त्याहून कठीण काम. लोकसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना प्रत्येक वर्षी दिसणार चित्र म्हणजे, अर्थमंत्री बोलत राहतात, सत्ताधारी पक्षाचे खासदार बाक वाजवून समर्थन देतात तर विरोधी पक्षातील खासदार ‘शेम-शेम’ म्हणत विरोध दर्शवतात.

जास्तच लोड झालं तर कोणा खासदारांची झोप लागलीय, हे देखील बघितलय.

तर बाहेर आल्यावर त्यावरच विश्लेषण विचारल्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांची काही वाक्य ठरलेली असतात. म्हणजे बघा, सत्ताधारी म्हणतात असतात,

देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प, शेतकऱ्याला न्याय देणारा अर्थसंकल्प, देशाला सक्षम करणारा अर्थसंकल्प अशी बरीच वाक्य ऐकायला मिळतात.

तर विरोधक याच्या बरोबर उलट्या प्रतिक्रिया देतात,

शेतकऱ्याला वाटाण्याच्या अक्षता देणारा अर्थसंकल्प, सर्वसामान्यांच्या इच्छांना केराची टोपली दाखवली, अन्याय केला वगैरे.

पण आजकाल अस्सल, परखड आणि पॉइंट टू पॉईंट विश्लेषण करणारे अर्थशास्त्रज्ञ अगदी हाताच्या बोटावर मोजण्य़ाइतकेच सापडतात. पण जुन्या काळी म्हणजे अगदी १९७०-८० च्या दशकात अर्थसंकल्पावऱच भाषण ऐकण्यासाठी एक सुप्रसिद्ध म्हण होती,

अर्थसंकल्पाच भाषण ऐकावं तर दोघांचेच,

एक अर्थमंत्री आणि दुसरं नानी पालखीवाला यांचं.

आज पर्यंत नानी पालखीवाला हे नाव आपल्याला जेष्ठ वकील, राज्यघटना तज्ञ म्हणून परिचित आहे. पण त्यापलीकडे जाऊन ते कर म्हणजेच टॅक्सेशन आणि कॉर्पोरेट संबंधित प्रकरणांचे वकील होते. आणि सोबतच प्रसिद्ध अर्थतज्ञ देखील.

आपल्याकडे लोकशाहीमध्ये राज्यघटनेने तुम्हाला-आम्हाला दिलेले मूलभूत अधिकार सुरक्षित आहेत. पण जेव्हा – केव्हा व्यवस्थेने त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे अधिकार वाचवण्याच्या लढ्यात सगळ्यात पहिल्यांदा पालखीवाला यांचं नाव घ्यावं लगत.

विशेषतः राष्ट्रीयकरण केलेल्या बँकाचा खटला, केशवानंद भारती खटला किंवा १९७६ मधील ४२ व्या घटनादुरुस्तीला विरोध करून दुसरी बाजू उजेडात आणणं असू यामुळे पालखीवाला यांचा उल्लेख व्यवस्थेबाहेरचे राज्यघटनेचे रक्षक असाच करावा लागतो.

पण सोबतच वर सांगितल्या प्रमाणे पालखीवाला एक निष्णात अर्थतज्ञ देखील होते.

त्यांची अर्थसंकल्पावरची भाषण ऐकणं ही एक पर्वणी असायची. लोक अगदी कान देऊन ऐकायची, इतर वेळी रटाळ वाटणाऱ्या अर्थसंकल्पावरच्या विश्लेषणापेक्षा जेव्हा पालखीवला विश्लेषण करायचे तेव्हा ही भाषण इतकी लोकप्रिय व्हायची की, मुंबईतील मैदान खच्चून भरायची.

एक वेळ अशी देखील आली की, त्यांना आपलं भाषण करण्यासाठी अख्ख क्रिकेटच स्टेडियम बुक करावं लागलं होत. वाढती गर्दी बघून १९८३ मध्ये त्यांनी आपलं भाषण मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर स्थलांतरित केले. पुढील अनेक वर्ष इथे त्यांची भाषण होत असायची.

वानखेडे स्टेडियम तयार झाल्यापासून ब्रेबॉर्नवरचे सामने थांबले. तिथे गर्दी व्हायची बंद झाली होती. त्यावरून प्रसिद्ध क्रिकेटर विजय मर्चंट गमती मध्ये त्यावेळी म्हणाले,

मि.पालखीवाला यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमवर गर्दी पुन्हा खेचून आणली.

पालखीवाला मुळातच पट्टीचे वक्ता होते. लोकांना गुंतवून ठेवण्याची कला त्यांना अवगत होती. सोबतच अगदी मनमोकळे पणाने बोलायचे. हातात कोणताही कागद किंवा नोट्सची देखील गरज भासायची नाही.

स्व. जी. डी. चौकसी यांनी त्यांच्या एका सभेचे अध्यक्षस्थान भूषवले होते. ते म्हणाले होते,

मला विश्वास बसत नाही की एखादी व्यक्ती कोणताही कागद किंवा कसल्याही नोट्स हातात न घेता इतके मोठे, एवढे अचूक आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणारे भाषण कस देऊ शकत.

चौकसी म्हणतात, त्यासाठी माझी स्वतःची खात्री म्हणून एकदा भाषण ऐकताना पालखीवालांनी सांगितलेली सगळी आकडेवारी लिहून घेतली आणि घरी जाऊन क्रॉस चेक करून बघितली तर ते सगळे आकडे तंतोतंत खरे निघाले होते. जर ते अर्थमंत्री झाले असते तर लोकसभेत त्यांनी अर्थसंकल्प वाचून नाही तर आठवून सांगितला असता.

पालखीवाला यांच्या भाषणात कसलाही उथळपणा नसायचा. तर विश्लेषणात तथ्य, आकडेवारी, नमुने, प्रसंगाला अनुरूप उदाहरण, साहित्यिक आणि ऐतिहासिक संदर्भ या सगळ्यांची जोड असायची. जर अर्थसंकल्पात काही कमतरता राहिली तर टीका करताना देखील पुढे मागे बघत नसत.

कॅलिफॉर्नियावरून आलेले डॉक्टर विलियम एमर्सन म्हणाले होते, जर अमेरिकामध्ये असं भाषण कोणी दिले असते तर लोक भाषणात सांगितलेल्या मुद्द्यांवर पुढचे अनेक दिवस भांडत राहिले असते. आणि माध्यमांमध्ये पण पुढचे अनेक दिवस चर्चा चालू राहिली असती.

असं म्हंटल जात की, १९८८-८९ च्या बजेटवर त्यांनी केलेल्या टिकेतूनच पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने उदारीकरणाच धोरण अवलंबले. आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये परकीय गुंतवणुकीसाठी परवानगी दिली, पण अभ्यासकांचं यावर एकमत नाही.   

पुढे लोकांच्या मागणीनुसार ‘अर्थसंकल्प विश्लेषण’ या विषयावरील भाषण बँगलोर, दिल्ली, कोलकत्ता, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे अशा देशभरातील विविध ठिकाणी होऊ लागली. कर्नाटकमध्ये १९९३ च्या दरम्यान झालेल्या एका भाषणाचे अध्यक्षस्थान तत्कालीन मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी भूषवले होते.

ते पालखीवाला यांच्या या विश्लेषणाच्या विरोधात असायचे पण प्रत्यक्षात जेव्हा भाषण करताना बघितले तेव्हा मोईली यांना देखील पालखीवालांची मत पटू  लागली.

जानेवारी १९९६ मध्ये भारतीय विद्या भवन मध्ये आयोजित एका सभेमध्ये तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांनी आपलं भाषण बाजूला ठेवून पालखीवाला यांना बंगलोरच्या भाषणाची आठवण करून देत आवर्जून ऐकत असल्याचे सांगितले होते.

प्रखर बुद्धिमत्ता आणि विन्रमता यांचा अनोखा संगम त्यांच्या स्वभावात असायचा, २९ व्या वर्षीच १२ ते १५ तास अभ्यास करून ‘लॉ आणि इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध केले. भारतातील कररचनेवरील हे पुस्तक विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथ ठरले.

त्यांच्या या अभ्यासामुळे खूप कमी वयात त्यांना वकिली आणि अर्थतज्ञ या दोन्ही क्षेत्रात लिजंड बनवले. सरकार येत राहिले जात राहिले. पण पालखीवला यांनी कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी आपलं विश्लेषण थांबवलं नव्हतं.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.