छोडो भारत आंदोलनात पुण्यातील पहिला हुतात्मा १६ वर्षांचा नारायण दाभाडे होता

जुलै १९४२. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. भारताने क्रिप्स मिशन नुकती फेटाळून लावली होती. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकण्याचे निश्चित करणारा एक ठराव केला आणि पुढे ७ आणि ८ ऑगस्टला मुंबईमध्ये गवालिया टँक मैदानात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीसमोर तो मान्य झाला.

या ठरावानुसार भारताचे स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काँग्रेसने महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली जनआंदोलनाची हाक दिली.

यावेळी आपल्या भाषणात गांधीजी म्हणाले की,

आपण परकीय सत्तेचे गुलाम आहोत ही भावना मनातून काढून टाका आणि देश स्वतंत्र करू वा मरू, या भावनेने या लढ्यात सहभागी व्हा.

तसेच ज्येष्ठ नेत्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी भाकीत केले. जर तसे झाले आणि काँग्रेस नेत्यांचे मार्गदर्शन मिळाले नाही, तरी लोकांनी आपल्या कुवतीप्रमाणे व बुद्धीप्रमाणे आंदोलन चालू ठेवावे, असेही सांगितले.

दुर्दैवाने गांधीजींचे भाकीत खरे ठरले. इंग्रजांनी त्याच मध्यरात्री पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद या नेत्यांना स्थानबद्ध करून त्यांची नगरच्या तुरुंगात रवानगी केली. हळू हळू सर्वच जेष्ठ नेत्यांना अटक झाली व लोकांत संतापाची इतकी तीव्र लाट उसळली आणि देशभर राजकीय आंदोलनाचा वणवा पेटत गेला. 

महाराष्ट्रही यात मागे नव्हता. 

९ तारखेला मुंबईत अरुण असफ अली यांच्या हस्ते आंदोलनाला सुरुवात झाली. पण त्याच्या आदल्या दिवशीच अधिवेशनातून रेल्वेने पुण्यात आलेल्या न.वि.गाडगीळ, केशवराव जेधे, भा. म. गुप्ते,  वि. कृ. साठे, पोपटलाल शहा, माधवराव मेमाणे, हरिभाऊ फाटक या शहरातील नेत्यांना अटक झाली.

त्यांच्या सोबत असलेल्या बारामतीचे बाबुराव गायकवाड, डॉ. नरवणे, इंदापूरचे ज्ञानेश्वर भोंगळे, पौडचे देवराव देशमुख या आणि इतर नेत्यांनाही अटक झाली. 

पुणे जिल्ह्यातील आंदोलन दडपून टाकण्यासाठी तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी टी.ई.स्रीटफिल्ड यांनी संपूर्ण जबाबदारी मि.हॅमंड या अधिकाऱ्याकडे दिली होती. सोबतच त्यांनी कलम १४४  लावून संपूर्ण पुणे शहर बंद ठेवले होते.

महात्मा गांधी यांचा आदेश वंद्य मानून ९ ऑगस्टच्या सकाळी कसबा पेठेतून मोर्चा निघाला. ‘महात्मा गांधी की जय’, छोडो भारत, अशा घोषणा देत हा मोर्चा काँग्रेस भावनाकडे येऊ लागला. तेथे ५० ते ६० पोलीस व अधिकारी हॅमंड बंदुकांनिशी तयार होते.

“त्यांना मोर्चातील लोकांवर लाठीमार, गोळीबार करून शहरात शांतात निर्माण करायची होती” असे प्रत्यक्ष या मिरवणुकीत भाग घेतलेल्या कन्हैयालाल काची यांच्या मुलाखतीत माहिती पुढे आली आहे.

सकाळी ८ वाजता मोर्चा काँग्रेस भवन येथे आला. तेव्हा सोळा वर्षाच्या नारायण दाभाडे या मुलाने भावनावरील युनियन जॅक काढून तिरंगा फडकवायचा असे ठरले. तो न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आणि सेवादलाचा कार्यकर्ता होता.

काँग्रेस भवन येथील सभेनंतर झेंडा फडकविण्यासाठी नारायण हळू हळू पुढे सरकू लागला, तेव्हा इंग्रजांनी गोळीबार करण्याची धमकी दिली. परंतु, तरीही नारायण ऐकत नव्हता. पोलिसांशी झटापट करून तो काँग्रेस भवनच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचला, तोपर्यंत त्याच्या पायाला आणि दंडाला गोळी लागली होती.

यानंतर न डगमगता नारायण वर चढला आणि इंग्रजांचा युनियन जॅक उतरवून तो फाडून टाकला. आणि तेथे भारताचा तिरंगा लावला.

त्या वेळी कमिशनर हॅमडने छातीत गोळी मारली. ती छातीतुन पाठीला लागली. आणि अंग्रेजो भारत छोडो… ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देत त्याने तिरंग्यापाशीच हौतात्म्य पत्करले. त्याच्यासोबत असलेला २१ वर्षाचा एस.व्ही.पारसनीस जखमी झाला.

पुणे जिल्ह्यातील पहिली धारातीर्थ पडणारी पहिली व्यक्ती म्हणजे नारायण दाभाडे होय. त्याने खऱ्या अर्थाने पुण्यात आंदोलनाला सुरुवात करण्याचे धाडस केले.

नारायण दाभाडेंच्या बलिदानातून पुण्यातील अनेक महाविद्यालयातील तरुणांनी प्रेरणा घेतली. बलिदानाच्या दुसऱ्या दिवशी अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय व फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात ३ ते ४ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

पुढे हा मोर्चा टिळक रस्त्याने एस.पी.कॉलेजमध्ये जाणार होता. तिथे गेल्यावर लोकांनी पुन्हा घोषणा देईल सुरुवात करताच पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीमार केला. लोकांनी पोलिसांच्या दिशेने उलट दगडफेक केली.

त्यामुळे गोळीबार झाला व त्यातही तीन जणांचा मृत्यू झाला. एकूणच पुण्यातील ‘भारत छोडो आंदोलन पाहिल्या दिवसापासूनच हिंसक झाले होते.

नारायण दाभाडेंचे स्मरण

डिसेंबर २००५ मध्ये पुण्याच्या काँग्रेस भवन येथे पुणे शहर काँग्रेस आणि नारायण दाभाडे स्मारक समितीतर्फे हुतात्मा नारायण दाभाडे यांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्याचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले होते

हे ही वाच भिडू 

 

 

1 Comment
  1. SubhashChandra Kanhaiyalalji Varma says

    Vandematram 🙏🌹 Salute To All Hind Warriors 🙏🌹 Today Remembering My Grand Father’s Participation In This Andolan Late Shri Premraj Tuljaramji Saraf (Varma) Of 360/361 Center Street Pune Camp. Who Was Jailed In Yerwada Prison.🙏🙏🙏🙏

Leave A Reply

Your email address will not be published.