अजूनही धारपांच्या कादंबऱ्या रात्री वाचण्याचं धाडस होत नाही…

मराठी भाषेत भयकथा आणि त्यांचा वाचकवर्ग यांचा एक वेगळा फॅनबेस आहे. भयकथांवर आधारित सिनेमे जितके चालत नाही तितके पुस्तक अगोदर मराठी भाषेत खपले जायचे. ज्या ज्या वेळी मराठी भयविश्व आणि भयकथा, गूढकथा यांचा विषय निघतो त्यावेळी एक नाव हमखास घेतलं जात ते म्हणजे नारायण धारप. एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे नारायण धारप यांच्या पुस्तकांबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आणि साहित्यनिर्मिती बद्दल जाणून घेऊया.

धारपांच्या वैयक्तिक आयुष्याकडे जाण्याअगोदर मागे तुंबाड हा सिनेमा आला होता. या सिनेमाने दरदरून घाम फोडणारी भीती काय असते ते दाखवलं होतं. अगदी ऑस्कर वैगरेला पाठवण्याच्या चर्चा या सिनेमाची आणि यातल्या खऱ्या कथेची झाली होती. या सिनेमाची कथा नारायण धारपांच्या कादंबरीवर आधारित असल्याचं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. यावर बऱ्याच चर्चा झाल्या.

सिनेमाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी सांगितलं होतं कि नारायण धारपांच्या लिखाण शैलीचा प्रभाव या कथेमध्ये आहे. हा सिनेमा एक मास्टरपीस म्हणून समोर आला पण नंतर या सिनेमाची कथा नारायण धारपांचीच आहे हे शोधण्यासाठी तेव्हा धारपांच्या भयकथांची भयंकर विक्री झाली आणि बाजारात पुन्हा एकदा भयकथांचं वादळ रोरावू लागलं होतं.

२७ ऑगस्ट १९२५ रोजी नारायण गोपाळ धारप यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून धारपांनी केमिस्ट्रीमध्ये पदवी मिळवली आणि नंतर पुन्हा त्यांनी बी.एस्सी [ टेक ] हि दुसरी पदवी मिळवली. भारतात नोकरी केल्यावर त्यांचं मन रमेनासं झालं आणि ते आफ्रिकेला निघून गेले. भारतात परतल्यावर त्यांनी व्यवसाय सुरु केला. तोवर धारप प्रसिद्ध झालेले नव्हते. 

पुढे नागपूर सोडून ते पुण्याला परतले आणि बदलीच्या निमित्ताने किंवा शिकायला पुण्यात आल्यावर लोकांना जे सामान अत्यावश्यक वाटते अशा वस्तू किमान भाड्याने देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. कॉट, खुर्च्या, टीपॉय आणि छोटी कपाटे ह्या गोष्टी ते भाड्याने देत.  धारपांनी भयकथा लिहिण्याच्या अगोदर विज्ञानकथा लिहिल्या, पण त्यावेळी विज्ञानकथा वाचकांचा फारसा ओढा नव्हता पण आघाडीच्या विज्ञानकथा लेखकांमध्ये नारायण धारपांचं नाव येतंच.

१९५१ मध्ये धारप लेखनाकडे वळले. सुरवातीच्या त्यांच्या विज्ञानकथा आणि भयकथा यांना वाचकांचा प्रतिसाद मिळाला नाही पण पन्नास वर्ष सातत्याने धारप लिहीत राहिले. हळूहळू त्यांचा वाचकवर्ग तयार होऊ लागला.

१०० पेक्षा जास्त पुस्तकांची मांदियाळी धारपांनी वाचकांना उपलब्ध करून दिली. मराठी साहित्याला भयकथांचं कोंदण कुणी घातलं असलो तर नारायण धारप. अत्यंत व्यापक आणि थरारक भयकथा धारपांनी दिल्या.

धारपांच्या बऱ्याच कथांची बीज हि परकीय असायची पण त्यातल्या मेन संकल्पनेला धारपांनी आपल्या शैलीत आणि मराठी भाषेत इतक्या उत्तम पद्धतीने बसवली कि त्याला तोडच नाही.

अजूनही धारपांच्या कादंबऱ्या रात्री वाचण्याचं बरेच लोकं टाळतात. चंद्राची सावली आणि लुचाई हि दोन पुस्तक मराठी भाषेतली आणि गूढकथेतली कळस मानली जातात.

धारपांनी आणखी एक प्रयोग केला. एका प्रकाशकाच्या आग्रहाला बळी पडून त्यांनी दर महिन्यास एक अशा सहा रहस्य-कथांचे लेखन केले होते. समर्थ, कृष्णचंद्र, पंत हि धारपांची पात्र खूप गाजली. धारपांच्या कथा कादंबऱ्या- ग्रहण, तळघर, बुजगावणे, चेटकीण, कुलवृत्तांत, अंधारयात्रा, नेनचीम, उत्तररंग अशा अनेक कादंबऱ्या धारपांनी लिहिल्या. 

धारपांच्या भयकथांचं आणि त्यांच्या वाचकवर्गाचं कौतुक म्हणजे एकेकाळी सुजाण वाचक लायब्ररींमध्ये रेशनिंगच्या दुकानांप्रमाणे लांबलचक रांगा लावून धारपांच्या पुस्तकांची वाट पाहत बसायचे.

अगदी शेवटच्या काळातही धारप लिहीत होते. १८ ऑगस्ट २००८ रोजी नारायण धारपांचं निधन झालं. पण त्यांच्या भयकथा आजही वाचकांच्या मनात रुंजी आणि भय निर्माण करत राहतात.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.