मुख्यमंत्री राणेंच्या विरोधात राडा करण्यासाठी आनंद दिघेंना मंत्रालयात बोलवलं पण..

शिवसेनेत आजवर जेवढी बंड झालीत त्यातला एक कॉमन धागा म्हणजे उद्धव ठाकरेंचं अन् बंडखोरांचं न पटणं…त्यात मुख्य म्हणजे नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंचं कधीच पटलं नाही. 

नारायण राणे म्हणजे शिवसेनेतले फायरब्रॅन्ड नेते. शिवसेनेचे सदस्यत्व घ्यायचे तर वयाची १८ वर्षे पूर्ण पाहिजे असा नियम होता पण फक्त पंधरा वय वर्ष असतांना नारायण राणे शिवसेनेचे शिवसैनिक बनले.

साधा शिवसैनिक ते राज्याचा मुख्यमंत्री असा प्रवास राणेंनी केला. पण याच प्रवासात त्यांच्यासोबत पक्षातल्याच नेत्यांनी कारस्थान केल्याचा प्रकार घडला होता असं खुद्द नारायण राणेंनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलेलं.

एका मुलाखतीत नारायण राणे सांगतात,

असा एकही दिवस उजडत नसे की, नारायण राणे आणि बाळासाहेबांची भेट होत नसे.  त्याकाळात शिवसेनेत साहेबांनी सांगायचं आणि नारायण राणेने ऐकायचं असं शिवसेनेत काम होतं.  पदाधिकारी नेमण्यापासून सगळ्या धोरणांत, जबाबदाऱ्यांत बाळासाहेबांसाठी नारायण राणे हाच पर्याय असायचे. महाराष्ट्रात कुठेही काहीही घटना घडली की नारायण जा, मी जायचो सगळं निभवायचो. 

बाळासाहेबांनी दोन निवडणुकांचं नेतृत्व हे नारायण राणेंकडे दिलं होतं. उमेदवार निवडणं, अमुक उमेदवार तमुक मतदारसंघातून निवडून येईल, त्या उमेदवाराच्या प्रचाराचे कार्यक्रम असं सगळं नारायण राणे ठरवत असत.

“संपूर्ण शिवसेनेत पहिल्या, दुसऱ्या फळीतील सगळ्या नेत्यांमध्ये आवडणारा माणूस मीच होतो. याला अपवाद फक्त उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरेंना चांगल्या माणसांचं कौतुक कधी करवत नाही, त्यांना ते देखवत नाही”. 

तर मेन किस्स्यावर येऊया, 

नारायण राणेंच्या मुख्यमंत्री पदाच्या सुरुवातीच्या काळात घडलेला हा प्रसंग. राणे सांगतात, मी मुख्यमंत्री बनलो आणि त्याचदरम्यान उद्धवजी ठाकरेंचं शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात आगमन झालं. एकीकडे पक्षातील सर्व सूत्रं उद्धव ठाकरे बघू लागले…

तर दुसरीकडे नारायण राणे मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार करतात, त्यांचा लय दरारा आहे अशी चर्चा तेंव्हा शिवसेनेत होत असायची.

जसजसं उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतलं वर्चस्व वाढू लागलं, तसं तसं राणेंची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द देखील गाजू लागली. थोडक्यात दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई चालू होती.

राणे सांगतात, मुख्यमंत्री म्हणून माझ्या कामाची स्टाईल पाहून काही नेत्यांनी ज्यात सुभाष देसाई आणि मनोहर जोशी यांचा समावेश आहे. अशा नेत्यांनी माझ्या विरोधात कारस्थानं करायला सुरूवात केली. 

त्यातलं एक मोठं कारस्थान म्हणजे मंत्रालयात येऊन शिवसैनिकांनी राडा घालायचा म्हणजे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचं नाव खराब होईल असा त्यामागचा उद्देश होता. 

आणि या राड्यासाठी निवडलं स्व.आनंद दिघे यांना…

आनंद दिघेंनी असा राडा करायला जावं असं त्यांना उद्धवजींनी सांगितलं, याची बाळासाहेबांना काहीच माहिती नव्हती.

सुभाष देसाई आणि मनोहर जोशी यांनी सांगितल्यानुसार सेनेतल्याच आनंद दिघे यांना असं सांगितलं की, मंत्रालयात जायचं. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जाऊन धांगडधिंगांना घालायचा. राडा करायचा. मंत्रालयाच्या कामकाजात अडचण निर्माण करायची. नियम मोडायचे. 

म्हणजे सगळीकडे अशी चर्चा होईल नारायण राणेंच्या कारकिर्दीत, त्यांच्या उपस्थितीत भर मंत्रालयात असा गोंधळ होतो तेही त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांमुळे हे त्यांना प्रेसला दाखवायचं होतं. 

पण ही घटना घडण्याच्या आधीच नारायण राणेंना याची पोलिसांकडून इन्फोर्मेशन मिळाली. नारायण राणे सतर्क झाले. त्यांनी त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मंत्रालयाच्या परिसरात उभं केलं.  पोलिसांना तशा सूचना दिल्या. 

आनंद दिघे आणि त्यांचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजता येणार होते. ११.३० वाजले तरी त्यांचा पत्ता नव्हता. मग नारायण राणेंनी आनंद दिघेंना फोन केला,

नारायण राणे दिघेंना म्हणाले,

 

आनंद दिघेजी तुम्ही मंत्रालयात येणार होता, वाट बघतोय तुमची, या लवकर..”

दिघेंनी यावर उत्तर दिलं,

“नाही नाही दादा तुम्ही असं का म्हणताय”. त्यावर राणे म्हणाले, “नाही मी ऐकल तुम्हांला काम दिलंय”, 

दिघे म्हणाले,

नाय नाय म्हणे असं काय नाही. तुमचा गैरसमज होतोय“…

असं म्हणत त्यांनी यावर उत्तर देणं टाळलं. 

नारायण राणे सांगतात,

अशी कारस्थानं माझ्याविरोधात सुरू होती. मी त्यावेळेला फारच पॉप्युलर होते ते कदाचित पाहवलं नाही.

मी नंतर नंतर जेंव्हा दौऱ्यावर जायचो, नागपूरला गेलो तर नागपूरच्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरे फोन करायचा, नारायण राणे इथे येतायत कोणीही विमानतळावर जायचं नाही. कोणीही त्यांच्या सभेला जायचं नाही अशा सूचना द्यायचा…माझ्या मनाला हे फार लागलं, मी शिवसेनेसाठी माझं आयुष्य वाहून घेतलं आणि असे कारस्थानं माझ्याविरोधात केली असं नारायण राणे यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलेलं.

त्यांनी सांगितलेल्या या किस्स्यामुळे कळलं कि, सुभाष देसाई, मनोहर जोशी असे नेते मंत्रालयात राडा घालण्यासाठी आनंद दिघेंना पाठवणार होते पण नारायण राणेंच्या ऐनवेळेस हा सगळा गेम कळला आणि देसाई अन् जोशींचा डाव फसला. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.