नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना शिव्या-शाप यात्रा का म्हंटले गेले?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज अखेर पोलिसांनी संगमेश्वरमध्ये अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

भाजपच्या सध्या सुरु असलेल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. मात्र राणेंनी या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केलेले हे पहिलेच वादग्रस्त वक्तव्य नाही. याआधी मागच्या ४ दिवसांपासून त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी सडकून टीका केली आहे. यातील देखील अनेक वक्तव्य वादग्रस्त असल्याचं दिसून आलं होतं.

त्यामुळे सध्या या यात्रेला शिवसेना शिव्या शाप यात्रा म्हंटले गेले आहे.

याच पार्श्वभूमीवर जनआशीर्वाद यात्रेदरम्यान एकूणच राज्य सरकार, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी कोणकोणती टीका केली हे बघणं महत्वाचं ठरत.

१. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करत आहेत

१९ ऑगस्ट रोजी नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली होती. हि सुरूवात होण्यापूर्वी विमानतळावर भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते,

हे सरकार या राज्याचा कोणत्याही प्रकारचा विकास करु शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नावाप्रमाणे राज्याला उद्धवस्त करायला निघाले आहेत.

२. शिवसेना सत्तेसाठी लाचार

सोनिया गांधी यांनी २० ऑगस्ट रोजी बोलावलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. यावरुन नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

नारायण राणेंनी म्हटलं होतं कि, लाचारीचा एक भाग म्हणून बैठक होत आहे. बाळासाहेबांची विचारधारा हिंदुत्वाची होती, आत्ताची शिवसेना म्हणजे लाचारीची शिवसेना झाली आहे. बाळासाहेबांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा त्याग केला नाही.

३. शिवसेनेत माकड राहिलेत

नारायण राणे यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या सुरुवातील मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. या गोष्टीला शिवसेनेकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यांना स्मारकाकडे जाण्यापासून रोखण्यात येणार असल्याचं सांगितले गेले. मात्र राणेंनी त्यादिवशी बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घेतले.

त्यानंतर नारायण राणे यांना याबद्दल मत विचारलं असता ते म्हणाले होते कि,

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर मी मानवंदना देण्यासाठी जाऊ नये यासाठी प्रयत्न झाले. पण कोणी मला अडवायला तरी आलं पाहिजे. शेवटपर्यंत कोणीच आलं नाही. माणसं राहिलेच नाहीत शिवसेनेत. झाडावर उड्या मारतात, तेवढेच उरलेत.

४. शिवसेनेने स्वतःच मन शुद्ध करावं.

नारायण राणे यांनी स्मारकाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेकडून तिथं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं होतं. त्यावर देखील नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती.

ते म्हणाले होते,

स्व. बाळासाहेबांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करण्यापेक्षा शिवसेनेनं स्वत:च मन शुध्द करावं. मुंबई महानगरपालिका आणि राज्यात सत्ता असूनही शिवसेनाला स्मारकाच्या ठिकाणी साध्या सुविधा उभारता आलेल्या नाहीत. स्व. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागी चिखल तुडवत जावं लागलं, हे खेदजनक आहे.

५. मातोश्रीचे २ बंगले झाले पण शिवसैनिक बेरोजगार आहेत.

याच जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका चालूच ठेवली होती.

यात ते म्हणाले होते,

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली होती, मग मराठी माणसाच्या जीवनात हे परिवर्तन का करू शकले नाहीत? मातोश्रीचं परिवर्तन झालं, एकाचे दोन बंगले झाले, पण मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल नाही. आजही अनेक शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. ही पाळी का आणावी?

६. एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळे आहेत

शनिवारी २१ ऑगस्ट रोजी वसई-नालासोपारा भागाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेनेवर टीका करताना पक्षात इतर नेत्यांना अधिकार नसल्याचं म्हंटलं होतं. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं होतं.

ते म्हणाले होते,

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ सही पुरतं ठेवलं आहे. मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाही. ते शिवसेनेत कंटाळले असून आमच्याकडे आले तर त्यांना घेऊ आणि मनात आणले तर ठाकरे सरकारचं विसर्जन करु.

७. पिंजऱ्यात राहणारे मुख्यमंत्री

जन आशीर्वाद यात्रेत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणखी एक टीका केली होती. ते म्हणाले होते,

या राज्याचे मुख्यमंत्री कोणी आहेत असं मला वाटतच नाही. काही दम नाही. कसले मुख्यमंत्री, पिंजऱ्यात राहातात, मातोश्रीच्या बाहेर निघत नाहीत. जनतेमध्ये जायला पाहिजे, प्रश्न बघायला पाहिजेत. मी मुख्यमंत्री असताना सगळ्यांनी पाहिलंय मी कसं काम केलं”

८. उद्धव ठाकरे यांनी घरातच बसावं

उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने ते मंत्रालयात जात नसल्याने विरोधी पक्षातून टीका होत असते. अशातच नारायण राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीला घरी बसलेले आहेत. आता त्यांनी कायमचे मातोश्रीत बसावं. लवकरच त्यांचं सरकार जाणार आहे.

९. हिंदुत्वाशी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवले.

राज्यात यांची सत्ता आहे. आमदारकीचे ५६ आमदार आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करुन यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. पण इथे १२ झेंडे दिसत आहेत. काय अवस्था झाली आहे यांची. मी जर आत्ता सांगितलं तर त्यांची पळता भुई थोडी होईल. हे काही दिवसांनी सत्तेवर नसतील. घऱी जावा नाहीतर आम्हाला घऱी पाठवावं लागेल.

१०. मुख्यमंत्र्यांना कानाखाली लावली असती. 

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली.

मात्र यावर रायगड जिल्ह्यातील महाड इथे जनआशीर्वाद यात्रा असताना, पत्रकारांशी बोलताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आणि राणे म्हणाले,

“त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,”

याच वक्तव्यानंतर नारायण राणे यांच्या विरोधात पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.