विरोधी पक्षनेते राणेंनी पाठवलेला कोट घालून जयंत पाटलांनी अर्थसंकल्प सादर केला

आज राजकारणाने टोक गाठलं आहे. विधान सभा असो किंवा सोशल मीडिया, कार्यकर्ते असो किंवा नेते नळावर च्या भांडणा प्रमाणे एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून भांडताना दिसतात. स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना दुगाण्या झाडण्या पर्यंत अनेकांची मजल जाते तर विरोधकांशी सौहार्दता हा विषय तर खूप लांबचा राहिला.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. शिवसेना-भाजपचे युती सरकार अगदी थोडक्यात पराभूत झाले होते आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आली होती. शिवसेनेच्या नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ १ वर्ष देखील झाला नव्हता मात्र त्यांना पायउतार व्हावे लागले होते. अनेकजण सत्ता हातातून गेली तर सैरभैर होताना दिसतात.

पण नारायण राणे यांनी सत्ता बदल अगदी मोठ्या मनाने स्वीकरला होता. 

नवे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे विलासराव देशमुख. विरोधी पक्षनेतेपद नारायण राणे यांच्याकडे होते. अनेकदा विधानसभेत दोघांची खडाजंगी होत असे. विकासाच्या मुद्द्यांवरून वाद होत असत. एकदा असेच कुठल्याशा कारणाने नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर कडक भाषेत टीका केली, विलासरावांनी त्यांना तसेच जोरदार उत्तर दिले. एकूण सभागृहातील वातावरण तंग  झाले होते.

सत्र संपले. विलासराव देशमुखांनी नारायण राणेंना फोन लावला आणि विचारलं,

“काय नारायण राव खूप रागावलात का?” 

राणेदेखील हसून नाही म्हणाले व घरून डब्बा खातोय जेवायला या असं निमंत्रण दिलं. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते दुपारचा डब्बा एकत्र बसून खाल्ले.

हि फक्त राजकीय औपचारिकता नव्हती तर महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपण एकमेकांचे सहकारी एक भलंमोठं कुटुंब असल्याप्रमाणे वागत होते.

तेव्हा इस्लामपूरचे तरुण अभ्यासू आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. बजेट चे सेशन सुरु होते. वेगवगेळ्या प्रश्नांवर विरोधी पक्ष अर्थमंत्र्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न करत होते. जयंत पाटील देखील त्यांना उत्तर देत होते.

जयंत पाटील यांनी एके ठिकाणी ही आठवण सांगितली आहे . ते म्हणतात,

“त्यावेळी मी वजन कमी करण्याचा प्रयोग करत होतो आणि एवढा बारीक झालो होतो . एक दिवस एक टेलर माझ्याकडे आला. तुमच्या कोटाचे माप घ्यायचे आहे. मला काही समजेना. या टेलरला राणेसाहेबांनी पाठवले होते.”

जयंत पाटलांनी सुटाबुटात अर्थसंकल्प सादर करावा असं राणेंना वाटत होत. त्यांनी आग्रहाने टेलरला पाठवले होते. दोन दिवसात तो टेलर हँगरला लावलेला कोट घेऊन आला. जयंत  पाटलांनी तो घातला. सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होती.

विरोधी पक्षनेते म्हणून राणे अर्थसंकल्पावर जोरदार टीका करत होते आणि त्यांनी भेट म्हणून दिलेला गळाबंद कोट घालून जयंत पाटील त्यांना उत्तर देत होते.

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेले नेते व मंत्री मा.आर.आर.पाटील यांच्या साठी देखील नारायण राणे यांनी ब्लेझर शिवण्याचा आग्रह धरला होता मात्र आबांनी  नकार दिला व त्याच्या ऐवजी त्याच टेलरकडून सफारी शिवून घेतली होती.

असे अनेक प्रसंग आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाचा अजूनही चिखल झालेला नव्हता. मुद्याला प्रतिवाद मुद्द्यानी केला जात होता. विरोधकाच्या  ठिकाणी विरोध आणि मैत्री च्या ठिकाणी मैत्री सांभाळली जात होती. आज हे पाहावयास मिळत नाही.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.