शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे एकत्र पक्ष स्थापन करणार होते..

जुलै २००५. एक दिवस बातमी आली. नारायण राणे यांनी १० आमदारांसह शिवसेना फोडली…

नारायण तातू राणे म्हणजे शिवसेनेतील दिग्गज नेते. पक्षाची धडाडती तोफ. याच पक्षातून त्यांनी बलाढ्य महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देखील भूषवलं होतं. पुढे युतीची सत्ता जाऊन आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांना राज्याचं विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं.

मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या वादातून त्यांनी २००५ साली विरोधी पक्ष नेतेपद, आमदार आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि आपल्या १० समर्थक आमदारांसह पक्ष सोडला.

मात्र शिवसेनेला हा धक्का पचतो न पचतो तोच काही दिवसात अजून एक सर्वात मोठा धक्का बसला. तो देखील घरातूनच. तो होता राज ठाकरे यांच्या रूपात. आपला वाद विठ्ठलाशी नसून त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असं म्हणतं अनेक नेत्यांवर एकाच वाक्यात टिका करत त्यांनी देखील शिवसेना सोडली.

यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले तर राज ठाकरे यांनी आपला स्वतंत्रपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मात्र पक्ष सोडल्यापासून ते दोघांनी वेगळा राजकीय प्रवास सुरु करण्यापूर्वीची एक आठवण नारायण राणे यांनी आपल्या ‘झंझावत’ या आत्मचरित्रामध्ये सांगून ठेवली आहे.

ही आठवण म्हणजे राज ठाकरे यांनी राणेंना दोघांनी मिळून वेगळा पक्ष स्थापन करण्याची ऑफर दिली होती.

झंझावतमध्ये सांगितलेल्याप्रमाणे,

राणे हे जुलै २००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एके रात्री राज ठाकरे हे त्यांना भेटायला आले. त्याच वेळी राज यांनी आपणही शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याच राणे यांना सांगितलं. मात्र राणे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना राज यांच्या या निर्णयाचे अजिबातच आश्चर्य वाटलं नव्हतं. कारण ते बाहेर पडल्यानंतर राज यांच्या विरोधात शिवसेनेत कारवाया सुरू झाल्याचं त्यांच्या कानावर आलं होतं.

राणे पुढे सांगतात की, 

उद्धव ठाकरेंमुळे राज यांचा भ्रमनिरास झाला होता. त्यामुळे राज यांची निराशा वाढत चालली होती. त्यांना पक्षात आपलं भविष्य दिसतं नव्हतं. आपल्याला अनुल्लेखान मारलं जात असून नेता म्हणून पाहण्याऐवजी डोळ्यात घुसलेल्या कुसळाकडं पाहाव तसं पाहिलं जात असल्याचं दुःख त्यांना सलत होतं.

मात्र ही सारी चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी राणेंकडे एक प्रस्ताव ठेवला. तो म्हणजे दोघांनी मिळून एक पक्ष काढावा.

राज यांचं बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख व्यक्तिमत्व आणि राणेंचा सेना नेतृत्वाचा मोठा अनुभव या जोरावर कडवे शिवसैनिक नक्की खेचले जातील, असा राज ठाकरे यांचा होरा होता. याच जोरावर त्यांनी पक्ष स्थापन करण्यामागे आडाखे बांधले.

यावर हे ऐकायला छान वाटत असलं तरीही मला पाय जमिनीवर ठेवणं भाग होतं, असं राणेंचं म्हणणं होतं. त्यामुळे ते राज ठाकरेंना म्हणाले,

राज, मी एका ठाकरेंबरोबर सर्वस्व झोकून काम केलेलं आहे. ठाकरे कुटुंबात काम कसं चालतं, ते मला चांगल माहित आहे. पुन्हा एकदा तसाच अनुभव घेण्याची माझी तयारी आहे, असं काही मला वाटत नाही. काही झालं तरी शेवटी बोलून चालून तुम्ही ठाकरेच!

पुढच्या काळात देखील नारायण राणे आणि राज ठाकरे यांचे संबंध चांगले राहिले.

राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. ती शिवसेनेसाठी फार महत्वाची होती. एक प्रकारे अस्मितेची लढाई होती. तेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेसोबत होते. त्यामुळे राणेंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी कणकवलीला निघाले देखील. मात्र अर्ध्या वाटेवरूनच ते माघारी परतले. त्यांनी राणेंच्या विरोधात प्रचार करणं टाळलं.

आता नुकतंच नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी आपण त्यांना अभिनंदन करण्यासाठी फोन केला असल्याचं सांगितले होते. मात्र संपर्क झाला नसून आपण पुन्हा लावणार असल्याचं सांगितले होते. त्यामुळे एक प्रकारे आज १५ – १६ वर्षानंतर देखील दोघांमध्ये मैत्री असल्याचं दिसून आलं होतं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.