राणेंसारख्या रांगड्या शिवसैनिकाला शेकापच्या दत्ता पाटलांनी विधानसभेत बोलायला शिकवलं..

नारायण तातू राणे. अगदी चड्डीत असल्यापासून बाळासाहेबांचा कार्यकर्ता. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरून राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणे यांचं नाव पुढं असायचं. शिवसेना प्रमुखांच्या सभेला नारायण राणे आणि हनुमंत परब हि दुकली  एकच हार घेऊन ती बाळासाहेबांच्या गळ्यात घालायची. 

चेंबूरमध्ये या दोघांना हऱ्या नाऱ्याची गॅंग म्हणून ओळखायचे. छोट्या मोठ्या चोऱ्या करणे तिकीट ब्लॅक करणे असे अनेक उद्योग त्यांनी लहानपणी केले होते. दहावी नंतर शिक्षण सोडलेल्या राणेंनी पुढे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये नोकरी पकडली. लीलाधर डाके यांनी त्यांना सेनेत आणलं. 

शिवसेनेत त्यांच्या आक्रमक स्वभावाला खरा न्याय मिळाला. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना नगरसेवक होण्याची संधी दिली. भाजपच्या डॉ. मजुमदार या लोकप्रिय नेत्याला त्यांनी निवडणुकीत पाडलं. इथून नारायण राणे यांची नवी इनिंग सुरु झाली.

 पुढे महापौर छगन भुजबळांनी त्यांना बेस्टचा अध्यक्ष बनवलं. खरं तर अनेक जेष्ठ नेते असताना राणेंच्या सारख्या कमी अनुभव असणाऱ्या नगरसेवकाला थेट बेस्टचा अध्यक्ष करणे अनेकांना बुचकाळ्यात टाकणारे होते. राणेंची इमेज आदेशावरून रस्त्यावर लढणारा कट्टर शिवसैनिक अशी होती. त्यांच्या सारख्या साध्या कार्यकर्त्याला हे पद झेपेल का याबद्दल अनेकांना साशंकता होती. खुद्द बाळासाहेब याच्या विरोधात होते. ते गंमतीने भुजबळांना म्हणाले देखील,

“अरे नारायणला चेअरमन बनवून बेस्ट फोडायचा विचार आहे काय तुमचा ?”

पण छगन भुजबळ आपल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं’

“हा चांगला मुलगा आहे. आपल्या पक्षाच्या बैठकीला सुद्धा अभ्यास करून येतो. तो चांगलं काम करील. तुम्ही बेस्टची धुरा त्याच्याकडे सोपवा.”

बेस्टचा अध्यक्ष म्हणून नारायण राणेंनी चमकदार कामगिरी केली. बेस्टच्या कामगारांमध्ये तर ते प्रचंड लोकप्रिय बनले. राणेंवर खुश होऊन बाळासाहेबांनी त्यांना मालवणमध्ये विधानसभा लढवायला लावली. बाळासाहेबांचा शब्द प्रमाण मानून राणे मालवणला गेले आणि जिद्दीने निवडणूक जिंकून देखील दाखवली.

इथून राणेंच्या जीवनातला नवीन अध्याय सुरु होत होता.

खरं तर नारायण राणे यांची मूळ प्रकृती रांगडी आणि रोखठोक. भाषा देखील तशीच शिवसेनेच्या आक्रमकतेला साजिशी. ते आमदार तर बनले पण विधानसभेत कामकाज असं असतं ? इथे कस बोलायचं, कोणते प्रश्न विचारायचे हे त्यांना बिलकुल ठाऊक नव्हतं.

त्या काळात सत्ताधाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री शरद पवार,रायभान जाधव यांच्यासारखे फर्डे वक्ते होते तर विरोधी बाकांवरून ऍड.दत्ता पाटील, केशवराव धोंडगे, गणपतराव देशमुख असे शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते होते.

नारायण राणे यांनी विधानसभेमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा विरोधीपक्षाच्या बाजूला पाचव्या रांगेमध्ये त्यांना आसन देण्यात आलं. ते सांगतात पहिल्या टर्ममध्ये मला भाषण करायची विशेष संधी मिळाली नाही पण मी एक नियम पाळला. सभागृह सुरू होताना आतमध्ये प्रवेश करावयाचा आणि ते संपल्याशिवाय बाहेर पडायचे नाही. या माझ्या सवयीमुळे या सर्व दिग्गजांची भाषणे मला ऐकावयास मिळाली आणि त्यातून माझी जडणघडण झाली व अनुभव गाठीला आला. 

त्या वेळी विधानसभेमध्ये मनोहर जोशी, छगन भुजबळ यांच्या सारखे दिग्गज नेते शिवसेनेकडून भाषण करत असल्यामुळे राणेंच्यासारख्या नवीन व तरुण आमदारांना वेळ मिळत नसे. कधी दोन मिनिटे तर कधी तीन मिनिटे. 

पहिल्या पाच वर्षांमध्ये राणे यांना शेकापचे नेते ऍड. दत्ता पाटील यांचे सतत मार्गदर्शन लाभले. 

दत्ता पाटील म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून डाव्या विचारांचे पाईक असणारे सर्वसामान्यांचे थोर नेते. दि.बा.पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्या सोबत त्यांनी रायगड जिल्ह्याला शेकापचा बालेकिल्ला बनवला.  

दत्ता पाटील यांनी २७ वर्षे विधानसभेत अलिबागचे प्रतिनिधीत्व केले. १९८७ ते १९८९ या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून संसदीय कामकाजावर ठसा उमटविला. भरदार आवाज, धारदार वक्तृत्व, हजरजबाबीपणा यांच्या जोरावर, संसदीय आयुधांचा अचूक वापर करीत त्यांनी विधानसभा गाजवली.

त्यांना आपल्या कोकणातल्याच असलेल्या आणि खटपट्या असलेल्या नारायण राणे यांचं प्रचंड कौतुक असायचं. राणेंना लागेल ती मदत करण्यास ते नेहमी आघाडीवर असत. यामध्ये कधीही कोणताही अहंकार आडवा आला नाही. राणे शिवसेनेत आहेत, ते वयाने खूप लहान आहेत या गोष्टींचा विचार न करता त्यांनी भरभरून मदत केली.

नारायण राणे सांगतात,

मी भाषण करीत असताना ते माझ्या पाठीमागे येऊन बसत आणि भाषण संपल्यानंतर पाठीवर थाप देत असत. अनेकदा सभागृह संपल्यानंतर ते मला माझ्या हाताला धरून विधिमंडळाच्या ग्रंथालयात घेऊन जात. तेथील कर्मचाऱ्यांना ते यांना अमुक वाचायला द्या, अमुक टिपण्या द्या, अमुक कात्रणे द्या असे सांगत. विधिमंडळातील माझ्या पहिल्या पाच वर्षांच्या काळात ते माझे मार्गदर्शक होते, एवढेच नव्हे तर माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता अशी माझी त्यांच्याबद्दलची भावना आहे. 

त्या विधानसभेच्या शेवटच्या वर्षी शिवसेनेने राणेंना पहिल्या बाकावर आणले. त्यावेळचे अध्यक्ष कै. मधुकरराव चौधरी यांनी त्यांना आपल्या दालनात बोलावून घेतले व पांच वर्षांतील त्यांच्या कामकाजाबद्दल कौतुक केले. 

राणे म्हणतात, त्या कौतुकातूनच मला पुढील जीवनाची प्रेरणा मिळाली असे मी समजतो.

पाच वर्षांपूर्वी फक्त दहावी पस असलेला रस्त्यावर उतरून राडा करणारा शिवसैनिक अशी ओळख असलेले नारायण राणे पुढच्या टर्म मध्ये मंत्री बनले. इतकंच काय चारच वर्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील बनवलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.