त्या घटनेपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संघर्षाला अधिकृतपणे सुरुवात झाली

नारायण राणे उद्धव ठाकरे संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. फडणवीसांवरील उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युतर देण्यासाठी नारायण राणे पुढे आले आहते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करण्यास सुरवात केली आहे.

मात्र हा दिसणारा संघर्ष केवळ भाजप-शिवसेना एवढ्या पुरताच मर्यादित नसून या वादाला आणि संघर्षाला नारायण राणे-उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक वादाची किनार देखील आहे. राणे भले आता भाजपमध्ये आणि केंद्रात मंत्री असतील.

मात्र या दोघांमधील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अगदी राणे शिवसेनेत असल्यापासून.

काही जुन्या संदर्भावरुन आपल्या लक्षात येत की ९० च्या दशकातचं उद्धव ठाकरे यांनी राजकीय व्यासपीठावर वावरायला सुरुवात केली होती. प्रचारामध्ये सहभाग देखील असायचा. पण त्यानंतर १९९७ च्या आसपास उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली. त्यावर्षी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकांपासून त्यांनी राजकारणात उघडपणे सहभाग घ्यायला सुरुवात केली.

दुसऱ्या बाजूला याच काळात नारायण राणे शिवसेनेत एक फायर ब्रॅन्ड नेते म्हणून उदयास आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतील आणि अगदी पहिल्या फळीतील नेते म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. शाखाप्रमुख, नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद आणि मंत्रीपद असा चढत्या आलेखाप्रमाणे प्रवास करत त्यांची मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल सुरु होती.

मात्र जरी उद्धव ठाकरे यांचा अधिकृत राजकीय प्रवेश हा १९९७ आणि त्यानंतरच्या काळात झाला असला तरी ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ या पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगितल्यानुसार

१९९५ पासूनचं शिवसेनेत उघडपणे दोन गट होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते.

आता या गटबाजीला वादाची अधिकृत किनार दिसायला सुरुवात झाली ती १९९९ मध्ये नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यानंतर. कारण राणेंना मुख्यमंत्री बनवणं हे उद्धव यांना फारसं रुचलं नसल्याचं सांगितलं जातं. त्याच वर्षी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये शिवसेनेचं एक शिबीर झालं होतं. त्यावेळी तिथं मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

तेव्हा उद्धव पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते,

मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल.

त्यानंतरच दोघांच्यात अस्वस्थतेला सुरुवात झाली. पुढे मुदतपुर्व विधानसभा विसर्जित झाल्यानं १९९९ च्या निवडणूका जाहिर झाल्या. नारायण राणेंना अवघं नऊ महिन्यांचं मुख्यमंत्रिपद मिळालं. या निवडणुकीत सेना-भाजप युतीचा काठावर पराभव झाला. नारायण राणेंनी आपल्या ‘No Holds Barred – My Years in Politics’ आत्मचरित्रात या पराभवाचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलं.

हाच पराभव उद्धव ठाकरे अणि नारायण राणे यांच्यातील संघर्षाची अधिकृत ठिणगी मानली जाते. याबद्दल त्यांनी आपल्या पुस्तकात सविस्तर लिहून ठेवलं आहे.

राणेंनी लिहील्याप्रमाणे, महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने घेतला होता. १९९५ पासून सरकार चालवल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवताना १७१ – ११७ असा फॉर्म्युला ठरवला. शिवसेनेने आपल्या कोट्यामधून १० जागा इतर मित्र पक्षांना देण्याचं ठरवलं होतं.

यानंतर शिवसेनेच्या उमेदवारांची नावं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीनिशी ‘सामना’मध्ये गेली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ती पाहिली. या यादीमध्ये उद्धव यांनी परस्पर १५ उमेदवारांची नावं बदलली आणि आम्हा सर्वांना अंधारात ठेवून निर्णय घेतला असा आरोप राणे करतात.

महत्त्वाचं म्हणजे ज्या १५ उमेदवारांची नावं उद्धव यांनी बदलली होती, त्यांपैकी ११ उमेदवार हे अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षांतून लढले आणि विजयी देखील झाले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे ६९ उमेदवार निवडून आले. हे ११ बंडखोर विजयी आमदार पक्षात असते, तर सेनेच्या आमदारांची संख्या ८० झाली असती. भाजपचेही ५६ आमदार निवडून आले होते. त्यामुळे अपक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करणं युतीला शक्य झालं असतं. पण ही संधी उद्धव ठाकरे यांच्यामुळे हातातून गेली.

यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक ७५ जागा मिळवलेल्या कॉंग्रेसनं नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केली. १३३ जागांचं बळ जमलं आणि काही अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. विलासराव देशमुख पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

मात्र यानंतरच्या काळात पुढे देखील अनेक प्रसंगांमध्ये नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिसून आला होता. यात मग २००२ साली विलासराव देशमुखांचं सरकार पाडण्याची फसलेली योजना असेल किंवा, २००३ मधील महाबळेश्वर अधिवेशनात झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या निवडीला राणेंनी केलेला विरोध.

यातुनचं २००४ पासून पर्यंत साचलेल्या सगळ्याचा स्फोट झाला २००५ मध्ये. त्यावर्षी राणेंनी १० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली आणि पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

आज या सगळ्या घटनांना जवळपास २ दशकांहून अधिक काळ लोटला आहे. पुलाखालून बचरं पाणी वाहत गेलं आहे. पण तरीही नारायण राणे, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष तसुभर देखील कमी झालेला नाही. उलट तो वर्ष वाढत जातील तसा वाढतचं गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.