मागच्या इलेक्शनमध्ये राणे कसे पडले..? 

२०१४ च्या निवडणुकांचा निकाल आला. धक्कादायक. ब्रेकिंग न्यूज च्या टॅगलाईनमध्ये सर्वात मोठ्ठी ब्रेकिंग न्यूज होती ती म्हणजे राणे पडल्याची. नारायण राणे पहिल्यांदा पडले. महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री, तळकोकणावर एकहाती सत्ता असणारा माणूस पडतो ही खरतर खूप मोठ्ठी बातमी होती. राज्यात भाजपची सत्ता आली. पाठिंब्याचा घोळ चालू राहिला. पण राणेंच्या पराभवाची चर्चा काही केल्या थांबत नव्हती. 

मागच्या वेळी कुठेकुठे कोणाकोणाला धक्का बसला हे विस्ताराणे मांडायचा विषय निघाला तेव्हा या विस्ता”राणे” मध्ये आम्हाला पहिला राणे सापडले. 

राणेंच्या पराभवाची मुख्य कारणे कोणती.. 

शिवसेनेला खऱ्या अर्थाने खिंडार पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छगन भूजबळ आणि नारायण राणे. या दोन्ही माणसांमुळे त्या त्या परिस्थितीत सेनेचे नुकसान झालं असलं तरी पुन्हा बाळासाहेबांच्या करिष्म्यावर सेने उभा राहू शकली हे वास्तव. 

३ जुलै २००५ रोजी राणेंनी उद्धव ठाकरेंवर वार करत सेना सोडली. त्यांनी कॉंग्रेसचा रस्ता पकडला तो मुख्यमंत्रीपदासाठी. कॉंग्रेस आपणाला मुख्यमंत्रीपद देईल हा त्यांचा फाजील आत्मविश्वास होता. हाच आत्मविश्वास त्यांना जसा राज्याच्या राजकारणात नडला तसाच तो कोकणातल्या म्हणजेच पर्यायाने त्यांच्या गल्लीतल्या राजकारणात देखील नडला. 

नोव्हेंबर २००५ साली आमदारकीच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणुक लागली होती.

या निवडणुकीत राणेंनी विरोधात उभा असणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केलं होतं. कोकणाला समाजवादानंतर सेनेची प्रथा लागली होती. या कोकणातल्या सेनेला सुरूंग लावण्याच काम राणे यांच्यामार्फत झालं. राणे कॉंग्रेसमध्ये होते तेव्हा सेनेला आव्हान देताना म्हणायचे संपुर्ण कोकण मी कॉंग्रेसमय करुन दाखवील. 

काही काळातच त्यांनी कॉंग्रेसअंतर्गत बंडाची तयारी केली. कॉंग्रेसच्या संस्कृतीच्या बरोबर विरोधी टोकाच हे राजकारण सुरू होतं. अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या हायकमांडला शिंगावर घेतलं. पण हि सेना संस्कृती नव्हती. काही काळातच आपली तलवार म्यान करुन राणेंना शांत बसणं क्रमप्राप्त ठरलं. 

२००९ सालची निवडणुक ही राणेंसाठी खऱतर टर्निंग पॉईन्ट होती. 

राणेंच्या परावभवाची कारणे शोधायला गेल्यानंतर त्यांची २१ अपेक्षित उत्तर आपणाला २००९ च्या इलेक्शनमध्ये मिळतात. 

राणे कॉंग्रेसमध्ये गेले त्यानंतरच्या काळात म्हणजे २००८ मध्ये वैभव नाईक यांनी सेनेत प्रवेश केला. बाळासाहेबांना उतारवयात त्रास देणाऱ्याला चांगलाच धडा शिकवायचा हे राज्यासाठी समीकरण म्हणून पुढं येत होतं. पण मतदारसंघातलं वातावरण नेमकं विरुद्ध होतं. राणे यांची एकाधिकारशाही आणि गुंडगिरी हि कोकणातल्या सरळमार्गी लोकांसाठी अडचणीची ठरू लागलेली. ज्याच्यावर अन्याय झाला तोच मोठ्या जोमाने उभा राहतो.

गॅंग ऑफ वासेपुरचं मिनी व्हर्जन इथे तयार झालेलं.

२२ जून १९९१ रोजी श्रीधर नाईक म्हणजेच वैभव नाईक यांच्या काकांचा भाडोत्री गुंडानी खून केला होता. राजकीय दहशत म्हणजे काय असते हे वैभव नाईक यांनी अगदी जवळून अनुभवलं होतं. त्याच वेळी श्रीधर नाईक यांच्या मारेकऱ्यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली. 

वैभव नाईकांची ही सल आणि बाळासाहेबांना उतारवयात मिळालेला त्रास ही समीकरणे अचूक जुळली. २००९ मध्ये राणेंच्या विरोधात वैभव नाईक यांना सेनेकडून उमेदवारी देण्यात आली. 

वैभव नाईक हे राणे यांच्यासाठी कधीच कडवे उमेदवार नव्हते.

राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक मुलगा काय करणात ही त्यांची मानसिकता होती. राणे यांना नडलेला हा अजून एक फाजील विश्वास होता. निवडणुकीत रंग भरू लागले. काल परवाचा पोरगा नडू लागल्यानंतर ऐन निवडणुकीत त्यांच्यावर पिस्तुल रोखण्याच काम करण्यात आल्याच सांगण्यात येत. २००९ चा निकाल लागला तेव्हा राणेंचा विजय झाला होता पण काल परवाच्या या पोराने देखील तब्बल ४७ हजार मत घेतली होती. 

२००९ च्या निवडणुकीमध्ये धाकटे राणे डॉ. निलेश राणे यांचे मताधिक्य ५० हजारांनी घटलं होतं. विधानसभेसाठी नवख्या म्हणून अवहेलना केलेल्या मुलाने ४७ हजार मते घेतली होती. त्याच काळात मतदारसंघ पुर्नरचना झाल्यामुळे संगमेश्वर मतदारसंघ रद्द झाला होता. इथे एक राणेसमर्थक वजा झाले. राजापूरमधून गणपत कदम तर कणकवलीमधून रवी फाटक पडले होते. 

२००९ च्या इलेक्शनमध्ये राणेसमर्थक आमदारांची संख्या होती एक आणि तेही स्वत: राणे. 

या निवडणुकीनंतर आत्मवलोकन करावं, मतदारसंघाची बांधणी करावी याकडे लक्ष न देता गुन्हेगारी वाढवणं, लोकांना दुखावणं याकडे राणे यांचा ओढा राहिला.  दिपक केसरकर यांच्याशी पंगा घेतल्यानंतर ते राज्य पातळीवर गाजू लागले. याचा फटका राणे यांनाच बसला. भास्कर जाधवाना दुखावण्याच काम देखील बिनबोभाटपणे चालूच होतं. राणेंचे समर्थक असणारे राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते हे २०१४ ची विधानसभा निवडणुक येण्यापुर्वीच त्यांच्यापासून दूर गेले. 

या दरम्यान राणे कुठे होते तर कॉंग्रेस अंतर्गत असणाऱ्या राजकारणात आपल्या पदरी काय पाडता येईल याचा विचार करत होते. त्याचवेळी वैभव नाईक कॉंग्रेसवर तोफ डागत सेनेचे जिल्हाध्यक्षपद निभावत होते. पण वैभव नाईकांची एकच अडचण होती ती म्हणजे जशाच तस उत्तर देण्यामध्ये त्यांची असलेली असमर्थता. 

वैभव नाईक जोपर्यन्त वासेपुरमधल्या सरदार खान सारखे समोर येत नाहीत तोपर्यन्त त्यांची डाळ पुर्णपणे शिजणार नव्हती.

कॉंग्रेस आणि राणेंवर आरोप करताना कॉंग्रेसला समोरासमोर प्रतिउत्तर देण्याच धोरणं वैभव नाईक यांनी आखलं. त्यासाठी त्यांनी कणकवली ठिकाण ठरवलं.  या ठिकाणी पोलिसांसोबत राडा झाला. राणेंना टक्कर देणारा राडा संस्कृतीतला नेता आपल्याकडे तयार आहे यावर विश्वास बसला तो खऱ्या अर्थाने याच प्रकरणात. 

वैभव नाईक २००९ च्या पराभवानंतर काय करत होते तर विविध मोर्चे काढत होते. पेट्रोलच्या दरवाढीबद्दल असणारा बैलगाडी मोर्चा असो किंवा मच्छिमाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मोर्चा असो. BSNL ची रेंन्ज नाही म्हणून BSNL ऑफिसला घेराव घालण्याच देखील त्यांनी काम केलं. इथेच बाजी पलटत गेली. 

२०१४ च्या निवडणुकांचा आकडा हाती आला तेव्हा राणेंच्या पारड्यात मते होती ६०,२०६ तर वैभव नाईक यांच्या पारड्यात मते होती. ७०, ५८२. वातावरण फिरलं आणि अखेर राणे पराभूत झाले. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.