महापालिकेच्या शाळेत शिपाई असणारे नारायण सुर्वे मराठी साहित्यातले कबीर झाले….

शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली…..

अशा अनेक कवितांची रचना करणारे मराठी साहित्यविश्वातले कबीर म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे.

नारायण सुर्व्यांमुळे मराठी कवितेला नवीन वळण लागलं. जन्म झाल्यापासूनच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी होत राहिल्या आणि जगण्याच्या अशा पद्धतीतून त्यांची कविता बहरत गेली आणि तितकीच ती आक्रमक सुद्धा झाली.

नारायण सुर्वेंना मराठी भाषेतला कबीर म्हणलं गेलं याच्यामागे मोठी गोष्ट आहे. १९९९ साली नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर सन्मान नावाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार नारायण सुर्वेंसाठी खास होता कारण जेव्हा त्यांना पुरस्कार मिळाला ते वर्ष कबिरच्या जयंतीचं ६०० वं वर्ष होतं. कबिरचं नातं आणि सुर्वेंचं नातं अगदीच साम्य होतं. 

१९२६-२७ च्या काळात गंगाराम सुर्वे यांना चिंचपोकळीच्या गिरणीसमोर एक लहान मुलं टाकून दिलेल्या अवस्थेत सापडलं. गंगाराम सुर्व्यांना मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी ते बाळ उचलून घरी आणलं. त्याच नाव ठेवलं नारायण आणि त्या बाळाला काशीबाई आणि गंगाराम सुर्वे या जोडप्याने आईबापाची माया देत वाढवलं. कमालीचे दारिद्र्य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यांतून नारायण सुर्वे यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले.

घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. नारायण सुर्वे ज्यावेळी चौथी पास झाले त्याचवेळी त्यांच्या घरचे मूळगावी परतले नारायणाच्या हातावर १० रुपये ठेवून आणि सुर्वे पुन्हा एकटे पडले.

मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी नारायण सुर्वे एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. पुढे ते मुंबईच्या महापालिकेच्या शाळेत शिपाई झाले. 

नारायण सुर्वे १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे “सुर्वे मास्तर’ झाले. पुढे त्यांची लेखणी बहरली. मार्क्सवादी विचारांचे सुर्वे पुरस्कर्ते होते, मार्क्सवादाचा मोठा पगडा त्यांच्यावर होता. समाजपरिवर्तनाच्या अनेक कविता त्यांनी लिहून कविता विश्व हादरवून टाकले.

नारायण सुर्वे आणि कबीर यांच्यातही काही बाबतीत साम्य होतं. कबीर अनाथ. त्यांच्या आईनं त्यांना नदीच्या किनाऱ्यावर सोडून दिलं होतं. सुर्वेही गंगाराम सुर्वे यांना चिंचपोकळीतल्या गिरणीसमोर सापडले. त्यामुळे दोघांच्या लिखाणातही जनसामान्यांविषयीचा कळवळा ओतप्रोत भरलेला. कबीराशी सुर्व्यांचं साम्य आहे ते असं.  

१९५८ मध्ये नवयुग मासिकांत सुर्वेंची डोंगरी शेत माझं गं मी बेणू किती हि कविता छापून आली त्यावर पुढे गाणंसुद्धा बनवण्यात आलं. नारायण सुर्वे यांनी लिहिलेली अनेक पुस्तक आणि कविता गाजल्या. ऐसा गा मी ब्रम्ह, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन, पुन्हा एकदा कविता, माझे विद्यापीठ आणि सनद हि त्यांची बेस्ट सेलर पुस्तके होती.

हृदयनाथ मंगेशकरांनी सुर्व्यांच्या कविता गाणी तयार करण्यासाठी मागितल्या होत्या पण सुर्व्यांनी सांगितलं, आपल्या कवितांना कुणाही संगीतकाराला चांगल्या चाली लावता आल्या नाही तरी उत्तम, पण त्यासाठी मी शब्द मोडून देणार नाही. 

१६ ऑगस्ट २०१० रोजी मराठीतला एक अस्सल प्रतिभावंत कवी निखळला. कबीराचा आपल्या जीवनाशी संबंध जोडताना ते लिहितात,

संत कबीरालाही त्याच्या आईने नदीकाठी सोडले; कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला…त्यालाही त्याची जात सांगता आली नाही आणि मलाही….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.