तुकोबांच्या पादुका पालखीत ठेऊन त्यांनी पहिली वारी केली ती आजतागायत सुरू आहे.

पंढरीची वारी हेच मुख्य व्रत आणि विठ्ठल हाच कुळीचे दैवत समजून शेकडो वर्षापासून वारीची परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे. लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने सावळ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतात आणि ऊन-वारा, पाऊस-गारा याची कोणतीही फिकीर न करता कधी पंढरपूरला पोहचतात.

ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस॥ असे बहिणाबाईंनी म्हटले असले तरी त्यांच्याही अगोदरपासून पंढरीची वारी सुरू होती, असे उल्लेख सापडतात. 

अगदी ज्ञानेश्वरांचे आजोबा आपेगाव येथून तर नामदेवांचे आजोबा नरसी बामणी येथून पंढरीला वारीसाठी जात होतो, असा उल्लेख या दोन्ही संतांच्या चरित्रात सापडतो. त्यांच्याही पूर्वी पंढरीची वारी होतीच. मात्र ज्ञानदेव-नामदेवांनी वारक-यांची एकजूट करून एकत्रितपणे वारीची परंपरा सुरू केली. त्यापूर्वी आपापल्या गावावरून वारकरी निघत आणि थेट पंढरपूरला पोहोचत असत.

पालखीची परंपरा सुरु झाली ती संत तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज देहूकर यांच्यामुळे.

पंढरपूरच्या वारीची परंपरा तुकोबारायांच्या अनेक पिढ्यांमध्ये पूर्वीपासून सुरु होती. विश्वंभर बाबा हे या घराण्याचे मुळपुरुष. त्यांनीच विठ्ठल रखुमाई या स्वयंभू मूर्तीची स्थापना आपल्या वाड्यात केली. त्यांच्या पूर्वजांपासून चालू असलेली पंढरीची वारी तुकोबांनी दिंडी सोहळ्याच्या स्वरूपात त्यांचे चौदा टाळकरी आणि काही वारकऱ्यांच्या समवेत अखंड चालू ठेवली.

तुकोबांच्या नंतर हि परंपरा त्यांचे बंधू कान्होजी आणि तुकोबांचे पुत्र महादेवबुवा- विठ्ठलबुवा यांनी पुढे नेली. संत तुकारामांच्या पुत्रांच्या मनात या वारीत आपल्या बरोबर भागवत धर्माचे कळस तुकोबा आणि भागवत धर्माचे पाया ठरलेले ज्ञानोबा माऊली असावेत अशी मनोमन इच्छा होती. 

सोळाव्या शतकातल्या उत्तरार्धाचा हा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर आले होते. त्यांनी छत्रपतीपदाचा दरारा मुघल पोर्तुगीज इंग्रज आदिलशाही या सर्व शत्रूंमध्ये निर्माण केला होता.

१६८२ साली छत्रपती संभाजी महाराजांना व महाराणी येसूबाई यांना पुत्ररत्न झाले. या पुत्राचं नाव शाहूजी असं  ठेवण्यात आलं. असं म्हणतात की या पुत्राला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून तुकाराम महाराजांचे सुपुत्र महादेव महाराज देहूवरुन आले.

त्यांच्या या भेटी मागचे अजून एक कारण म्हणजे देहु ते पंढरपुर अशी संत तुकाराम महाराज यांची पालखी सुरु करावी ही त्यांची इच्छा. पण संभाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेली औरंगजेबाची मुघल सेने या महान कार्यासाठी अडथळा ठरू पाहत होती.

महादेव महाराजांनी शंभूराजांपुढे आपले मनोगत व्यक्त केले आणि आपली व्यथा पण सांगितली.

छत्रपतींनी तात्काळ या आषाढीवारी ला आपली संमती दर्शवली. स्वराज्याचे मावळे या पालखीस संरक्षण देतील अशी हमी देखील दिली.  संभाजी महाराजांनी तात्काळ याचा आदेश जागोजागी आपल्या दाभाडे इंगळे व इतर सरदार आणि मावळ्यांना पाठवला.

तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराजांनी इ.स.१६८५ साली पालखी सोहळा चालू केला.

पुढे औरंगजेबाने घडवून आणलेल्या संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील परिस्थिती आणखी चिघळली.  सैन्याच्या हालचाली सुरु असल्यामुळे पंढरपूर, महादेव स्थानेश्वर व देहू येथल्या यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरूंना सैन्याचा उपद्रव होत होता. हा उपद्रव कमी व्हावा म्हणून छत्रपती राजाराम महाराजांना नारायण महाराजांनी पत्राने कळवले होते आणि यावर छत्रपती राजाराम महाराजांनी यात्रेकरूंना उपद्रव होऊ नये व सुप्रवृत्तीने येऊ – जाऊ द्यावे म्हणून पत्र देखील लिहिले होते. 

पुढे हा त्रास वाढल्यावर तपोनिधी नारायण महाराजांनी स्वतःच्या हाती शस्त्र घेतले आणि  प्रतिकार केला. त्यांनी देहूजवळ असलेल्या सांगुर्डी गावात मुघल सैन्याला पळवून लावले असे  सांगितले जाते. म्हणूनच वारकरी संप्रदायात नारायण महाराजांना ‘सकळ वैष्णवा वाटे जीव की प्राण तो हा नारायण देहूकर’ असे संबोधले जाऊ लागले.

तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेऊन त्यांनी पहिली वारी केली ती आजतागायत सुरू आहे.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.