नरेंद्र मोदी देखील आंदोलनातून मोठे झाले, सरकारे पाडली होती…

२० डिसेंबर १९७३. गुजरातमधील सर्वात जुनं इंजिनीरिंग कॉलेज म्हणजे लालभाई दलपतभाई अभियांत्रिकी. अहमदाबादमध्ये असलेल्या या सरकारी अनुदानित सुप्रसिद्ध कॉलेजमध्ये काही विद्यार्थी उपोषणाला बसले होते. कारण होतं हॉस्टेलच्या फी मध्ये झालेली २०% ची वाढ.

तस बघायला गेलं तर नेहमी आपण नेहमी कॉलेजमध्ये अशा टाईपचा विद्यार्थ्यांचा आणि संस्थाचालकांचा वाद पाहत असतो पण त्यावेळचं उपोषण चांगलंच गाजलं. सरकारने हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला पण विद्यार्थी मागे हटायला तयार नव्हते. तेव्हाच्या मीडियाने देखील या आंदोलनाला प्रसिद्धी दिली.

हळूहळू या आंदोलनाचा वणवा पेट घेऊ लागला. एल.डी.कॉलेज पाठोपाठ ३ जानेवारी १९७४ रोजी गुजरात विद्यापीठातील विद्यार्थी देखील यात उतरले. विद्यापीठात उपोषणास सुरवात झाली. त्या दिवशी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात वाद झाला. त्याच रूपांतर संघर्षात झालं, पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ठोकून काढले. 

७ जानेवारी पासून गुजरातमधील सर्व कॉलेज या विद्यार्थ्यांनी बंद पाडले. त्यांच्या मुख्य मागण्या वाढलेले मेस आणि होस्टेलचे दर याबद्दल होत्या. पण हे आंदोलन चिघळत गेले. रेशन शॉप मधील वाढलेल्या किंमती आणि त्यामुळे वाढलेली महागाई यामुळे वैतागलेल्या सामान्य नागरिकांनी देखील अहमदाबादमध्ये या आंदोलनात सहभाग घेतला. यात कामगार संघटना देखील उतरल्या.  

बघता बघता हे आंदोलन राज्यव्यापी बनले. या आंदोलनाला नाव देण्यात आले,

” गुजरात नवनिर्माण आंदोलन”

२५ जानेवारी रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला. सरकारने हे आंदोलन दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ठिकठिकाणी आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेला. ४४ गावांमध्ये कर्फ्यू जाहीर केला गेला. परिस्थिती इतकी चिघळली की तिला सावरण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले.

जवळपास १०० लोक मारले गेले, हजारो जण जखमी झाले. तब्बल ८ हजार जणांना अटक करण्यात आली. शेवटी आंदोलकांपुढे हात टेकून पंतप्रधान इंदिरा गांधींनी गुजरातचे सरकार बरखास्त केले आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली.

बांगलादेश निर्मितीच्या युद्धात पाकिस्तानला हरवल्यापासून इंदिरा गांधींची लोकप्रियता आभाळाला भिडली होती त्याला पहिल्यांदा हादरा देण्यात आला होता.

हे आंदोलन सुरु झाले मुख्यतः विद्यार्थ्यांच्या उपोषणामुळे. या आंदोलनाला मुख्य शक्ती दिली होती आरएसएसच्या विद्यार्थी शाखेने म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने. त्या आंदोलनात रस्त्यावर उतरून लढणारा एक तरुण कार्यकर्ता संघाच्या नेत्यांपुढे चमकला,

“नरेंद्र दामोदरदास मोदी “

वय असेल तेवीस-चोवीस. ते काही या कॉलेजचे विद्यार्थी नव्हते. हायस्कुलमध्ये असतानाच त्यांनी शिक्षण सोडून दिलं होतं आणि देशकार्यासाठी बाहेर पडले होते. घरच्यांनी त्यांचं लग्न करून दिलं पण या बंधनात ते फार काळ टिकले नाहीत. सन्यास स्वीकारून हिमालय वगैरे फिरले आणि सत्तरच्या दशकात पुन्हा गुजरातला परतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी काम सुरु केलं.

१९७३ साली सिद्धपूर पाटणमध्ये भरलेल्या पहिल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन काम केलं. तिथून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये ओळखले जाऊ लागले होते. गुजरात नवनिर्माण आंदोलनाने तर त्यांच्या नावाची वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊ लागली.

या आंदोलनामुळे आरएसएस आणि एबीव्हीपी या संघटना गुजरातच्या तळागाळात जाऊन पोहचल्या.

इंदिरा गांधींनी धडकी भरवणाऱ्या आंदोलनाची ताकद जयप्रकाश नारायण यांनी ओळखली. ते १९७४ च्या फेब्रुवारी महिन्यात गुजरात येथे आले. नरेंद्र मोदी सांगतात की 

या काळात त्यांची जयप्रकाश नारायण यांच्याशी अहमदाबाद येथे अनेक भेटी झाल्या. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.

जयप्रकाश नारायण यांनी या विद्यार्थी आंदोलनाला देशव्यापी बनवायचं ठरवलं.  पुढचा टप्पा बिहारमधल्या विद्यार्थी आंदोलनातून समोर आला. हळूहळू याचा वणवा इतका पेटला की इंदिरा गांधींनी संपुर्ण देशात आणीबाणी लागू केली.

नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या विरोधातही सक्रिय भूमिका बजावली. ते गुजरात मध्ये लोक संघर्ष समितीचे जनरल सेक्रेटरी बनले. आणिबाणीमध्ये भूमीगत होऊन त्यांनी आंदोलनाचा झेंडा उंच केला. असं म्हणतात कि आणीबाणीच्या संघर्षात  सुखावून नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व घडलं. गुजरात नवनिर्माण आंदोलनाने त्यांच्या राजकारणाचा पाया रचला तर पुढे  जन्म भूमी साथीच्या रथ यात्रेने त्यांना राष्ट्रीय पातळीवरचा नेता बनवलं. एका साध्या कार्यकर्त्यापासून ते गुजरातचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान पदाचा प्रवास या आंदोलनाच्या मुशीतून तयार झालाय हे नक्की. 

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.