स्वतः लिहिलेलं टाईमटेबल फॉलो करणं बेंजामिन फ्रॅंकलिनला जमलं नाही, पण मोदींना जमलं

दहावीच्या पेपर आधी आपण फॉर्म फॉर्ममध्ये टाईमटेबल बनवलेलं असायचं, म्हणजे या दिवशी इतके तास या विषयाचा अभ्यास, मग थोडी झोप, मग पुन्हा अभ्यास. हे टाईमटेबल लिहिताना आपल्या मनात जो जोश असतोय, त्याची तुलना जगात कशाची केली जाऊ शकत नाही.

त्या क्षणाला हातात बोर्डाचा पेपर दिला असता, तर ऑक्टोबरला बसणारी लोकसंख्या निम्म्यानं कमी झाली असती.

आपला विषय बोर्डाच्या पेपरचा नाही, तो आहे टाईमटेबलचा.

आता सध्या आपल्यातले लई जण टाईमटेबल पाळत नसतील. कित्येकांची झोप समोरुन येणाऱ्या रिप्लायवर अवलंबून असते, तर कित्येकांची बिंज वॉचिंगवर. त्यामुळं आपण काय वेळेत झोपत नाही आणि दुसऱ्या दिवशीच्या टाईमटेबलचाही उदास करुन घेतो.

सध्या टाईमटेबलची आठवण येण्याचं कारण म्हणजे, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाला सल्ला दिला की, ‘तुम्ही टाईमटेबल पाळा आणि आपल्या कार्य आणि कार्यक्रमात फरक ठेवा.’

आता स्वतः मोदींनी टाईमटेबल पाळायची प्रेरणा जिथून घेतलीये, ते टाईमटेबल कुणी आखलंय?

तर बेंजामिन फ्रँकलिन.

फ्रँकलिन म्हणजे काय किरकोळ माणूस नाही. अमेरिकेतला मोठ्ठा नेता, तत्वज्ञ, अमेरिका स्थापन करणाऱ्यांपैकीचं महत्त्वाचं नाव, प्रकाशक, संशोधक इत्यादी, इत्यादी. तिकडच्या १०० डॉलरच्या नोटेवरही याचाच फोटो आहे.

फ्रँकलिनचा जन्म झाला १७०६ साली, तर मृत्यू झाला १७९० ला. आपल्या कारकिर्दीत त्यानं वैज्ञानिक क्षेत्रालाही भरपूर योगदान दिलं. त्यानं वीजेचा शोध लावण्यासाठी प्रयत्न केले होते. लाईटनिंग रॉडचा शोध त्यानंच लावला. बायफोकल लेन्सचा शोध लावत कित्येक जणांसाठी समोरचं चित्र स्पष्ट करण्याचं श्रेयही यालाच जातं.

राजकारणातही त्याची महत्त्वाची भूमिका राहिली. युनायटेड स्टेट्सचा अँबॅसिडर म्हणून फ्रान्स आणि स्वीडनला जाणारा तो पहिलाच माणूस होता. अमेरिकेचा पहिला पोस्टमास्टर जनरल म्हणूनही त्यानं काम पाहिलं. लिहायचं म्हणलं तर बरंच काही आहे, इतकं काय काय बेंजामिन फ्रँकलिननं करुन ठेवलंय.

सगळं लिहीत बसलो, तर वेळ जाईल. पण हे एवढ्या गोष्टी करायला बेंजामिन फ्रॅंकलिनकडे वेळ कसा काय असायचा? तर याचं उत्तर सापडतं, त्याच्या टाईमटेबलमध्ये. फ्रॅंकलिनचं दिवसाचं टाईमटेबल इतकं पद्धतशीर आखलेलं की आज जवळपास २५०-३०० वर्षानंतरही ते फॉलो करायला सांगितलं जातं.

पंतप्रधान मोदींनाही याच टाईमटेबल वरुन प्रेरणा मिळालीये, हे टाईमटेबल कसं होतं हे पाहुयात.

तर यात दिवसाचे सहा भाग केलेले आहेत. पहिला भाग पहाटेचा, सकाळी ४ वाजता उठायचं. ७ वाजेपर्यंत अंघोळ-बिंघोळ करायची, देवाची पार्थना करायची, नाश्ता करायचा आणि दिवसभरात काय करायचंय हे नक्की करायचं. स्वतःला प्रश्न विचारायचा की, आज मी काय चांगलं काम करू शकतो..?

मग ८ ते ११ मध्ये फक्त काम करायचं. १२ ते १ मध्ये जेवण करायचं, आपला खर्च वैगेरे गोष्टी पाहायच्या, एखादं पुस्तक वाचायचं.

पुढचा स्लॉट येतो २ ते ५. आता तुम्ही म्हणाल, इथं झोपायचं असणार. पण नाही, इथं करायचं काम.

संध्याकाळ होते, ६ ते ९ मध्ये. इथं लोकांशी बोलायचं, गाणी-बिणी ऐकायची, सगळ्या गोष्टी सॉर्टआऊट करायच्या आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला प्रश्न विचारायचा की, आज दिवसभरात मी कुठली चांगली गोष्ट केली.

मग १० वाजता घ्यायची झोप आणि परत सकाळी चार वाजता दिवस सुरू.

बेंजामिन फ्रँकलिनचं हे टाईमटेबल जगभरात प्रचंड गाजलं. अनेक लोकांनी ते फॉलो करायला सुरुवात केली. ‘लवकर निजे, लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभे,’ हा सुविचारही त्याच्याच टाईमटेबलवरुन आलाय, असंही कोण कोण म्हणतं.

पण महत्त्वाचं हे आहे की, स्वतः बेंजामिन फ्रँकलिन आपल्या टाईमटेबलबद्दल काय म्हणतो..?

तर त्यानं आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की, “माझ्या टाईमटेबलमुळं मला फार त्रास झाला. माझ्या असं लक्षात आलं की, एखाद्या माणसाचं काम वेळेत सुरू होऊन वेळेत संपेल असं एकसुरी असेल, तर हे टाईमटेबल प्रॅक्टिकल ठरू शकतं. पण एखाद्या माणसाला जर लोकांमध्ये मिसळायचं असेल, किंवा लोकांच्या गरजांनुसार त्यांना वेळ द्यायचा असेल, तर त्याला हे टाईमटेबल फॉलो करणं अवघड आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र फ्रँकलिनचं कौतुक करतात. ते म्हणतात,

”प्रत्येकानं फ्रॅंकलिन यांचं आत्मचरित्र वाचलं पाहिजे. ते कधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नव्हते, पण त्यांचं आयुष्य प्रचंड प्रेरणादायी आहे. मला त्यांच्या आयुष्यातून भरपूर प्रेरणा मिळाली आहे. प्रत्येकानं त्यांच्याकडून टाईम मॅनेजमेंट स्कील्स शिकणं गरजेचं आहे.”

थोडक्यात जे टाईमटेबल स्वतः लिहीणाऱ्या फ्रँकलिनला पाळणं अवघड गेलं, त्यातून मोदींनी प्रेरणा तर घेतलीच, पण सोबतच आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनाही त्याचाच धडा दिला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.