मोदी एकदा चक्क राजीव गांधींना भेटायला गेले होते, अहमद पटेलांनी गाठ घालून दिली होती..

अहमद पटेल यांना काँग्रेसचा शातीर दिमाग म्हणून ओळखलं जायचं. गुजरातच्या पंचायत समितीचा सदस्य अवघ्या पंचविसाव्या वर्षी जनता लाटेत खासदार म्हणून निवडून आला आणि इंदिरा गांधी संजय गांधी यांच्या नजरेत भरला. पुढे सत्ता आल्यावर त्यांना दिल्लीला मंत्रिपदासाठी बोलवण्यात आलं. त्यांनी मात्र मंत्रिपद घेतलं नाही त्याच्या ऐवजी पक्ष संघटनेत काम सुरु केलं.

राजीव गांधी राजकारणात आल्यावर त्यांचा पॉलिटिकल सेक्रेटरी म्हणून अहमद पटेल यांची नियुक्ती झाली. पुढे राजीवजी पंतप्रधान बनल्यावर देखील अहमद पटेल सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत असायचे. तेव्हापासूनच काँग्रेसच्या देशपातळीवरच्या राजकारणात अहमद पटेल यांचं नाव गाजत होतं.

oscar fer 25nov jLwDyHo

याच काळात  गुजरातमध्ये आणखी एक तरुण नेता आपलं नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी धडपडत होता,

नाव नरेंद्र दामोदरदास मोदी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले नरेंद्र मोदी तेव्हा भाजपमध्ये आपला जम बसवत होते. विद्यार्थी आंदोलनापासून नावाजलेले, आणीबाणीच्या काळात कारावासात जाऊन आलेले मोदी राजकारणात आले तेव्हा त्यांचे राजकीय गुरु होते खासदार शंकर सिंह वाघेला.

शंकर सिंह वाघेला हे गुजरातच्या राजकारणातील दिग्गज नाव. ते राष्ट्रीय पातळीवर भाजपचे सेक्रेटरी होते आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष होते. गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाला रुजवण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरु होती. यात त्यांच्या सोबत असायचे नरेंद्र मोदी.

वाघेलांकडे एक जुनी बुलेट होती. नरेंद्र मोदी यांना या बुलेटवर मागे बसवून ते राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरायचे. मोदींना राजकारणाचे धडे त्यांनी या प्रवासातच शिकवले असं म्हणतात. हि गुरुशिष्याची जोडी भाजप मध्ये चांगलीच गाजत होती. 

शंकरसिंह वाघेला त्याकाळात राज्यसभेचे खासदार होते. जेव्हा कधी त्यांना काही कामानिमित्त दिल्लीला जायचं असायचं तेव्हा नरेंद्र मोदी त्यांच्या सोबत असायचे. रेल्वे मध्ये खासदारांना प्रवासासाठी दोन तिकिटे मिळायची. वाघेला आणि मोदी या दोन तिकिटावरून प्रवास करायचे.

659 F87sa6 000762

शंकर सिंह वाघेलांच्या थोरल्या मुलीचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा भाजपच्या नेत्यांना आमंत्रण देण्यासाठी ही जोडगोळी दिल्लीला आली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून ते केंद्रातल्या सगळ्या भाजप नेत्यांना आमंत्रणे देण्यात आली. वाघेला परत गुजरातला निघणार इतक्यात कोणी तरी त्यांना म्हणालं, पंतप्रधानांना देखील आमंत्रण द्या.

पण पंतप्रधानांपर्यंत पोहचायचं तरी कस ?

अखेर अहमद पटेल यांना संपर्क करण्यात आला. नरेंद्र मोदींची आणि अहमद पटेलांची जुनी ओळख असावी. मोदी त्यांना बाबुभाई म्हणून हाक मारायचे. त्यांच्याच मध्यस्थीने वाघेला आणि मोदी पंतप्रधान राजीव गांधीच्या भेटीला आले.

या भेटीच्या साक्षीदार तेव्हाच्या राज्यसभेच्या उपसभापती नजमा हेपतुल्ला देखील होत्या. अहमद पटेलांशी त्यांची आणि त्यांच्या पतीची खास मैत्री होती. या भेटीत अहमद पटेलांनी राजीव गांधींना नरेंद्र मोदी यांची ओळख करून दिली. त्यावेळी  काही राजकीय चर्चा झाल्या का याचे संदर्भ मिळत नाहीत. फक्त लग्नाचे आमंत्रण देण्याइतपतच ही भेट मर्यादित असावी.

या भेटीनंतर मोदी आणि शंकरसिंह वाघेला अहमद पटेल यांच्या घरी जेवणासाठी देखील गेले.

पुढे राजकारणाची गणिते बदलत गेली.मुख्यमंत्रीपदावरून शंकर सिंह वाघेला आणि नरेंद्र मोदी यांच्यात भांडण झालं. मोदींना केंद्रात पाठवण्यात आलं, तिकडे पक्ष फोडून वाघेला शेवटी मुख्यमंत्री बनले.

केंद्रात मोदी प्रवक्ता म्हणून जम बसवत होते. तेव्हा असं सांगितलं जातं की मोदींना या काळात मदत करणाऱ्यांमध्ये अहमद पटेल देखील होते. मोदी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगतात की,

“त्या काळात मी अनेकदा बाबू भाई (अहमद पटेल) यांच्या घरी जेवणासाठी जायचो. त्यांच्याकडची खिचडी मला फार आवडायची. पण पुढे काहीतरी झालं आणि त्यांनी माझे फोन देखील उचलायचं बंद केलं.”

अहमद पटेल यांनी मात्र याचा स्पष्ट इन्कार केला. ते म्हणाले,

नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत. माझी आणि त्यांची आजवर एकच भेट झाली आहे आणि ती देखील ऐंशीच्या दशकात राजीव गांधींच्या साक्षीने झाली आहे. २००२ च्या दंगली पूर्वी आणि नंतर आम्ही कधीच एकटे भेटलो नाही. 

२०१४ च्या निवडणुकीआधी मोदींनी आपल्या मुलाखतीमध्ये केलेला अहमद पटेलांचा उल्लेख तत्कालीन  दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी कापून टाकला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.