नरेंद्र मोदींच्या यशाचं ब्रेन समजली जाणारी संस्था त्यांच्या अपयशाचं श्रेय देखील घेईल..?

सध्या केंद्रात एक मोठी राजकीय घडामोडी घडली. ती म्हणजे नुकताच झालेला मंत्रिमंडळाचा विस्तार. यात पंतप्रधान मोदींकडून अनेक नव्या चेहऱ्यांना आखाड्यात उतरवण्यात आलं आहे. सोबतचं तब्बल डझनभर मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासारखी भाजपची अनेक दिग्गज आणि निष्ठावंत नाव आहेत.

मात्र सध्या अनेक राजकीय तज्ञ आणि माध्यमांमधील बातम्यांनुसार या राजकीय उलथापालथी आणि मंत्र्यांचे राजीनामे घेण्यामागचे कारण म्हणजे सध्या कोरोनामुळे हाताळणीतील अपयश आणि त्यामुळे भाजपच्या आणि प्रामुख्याने पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला बसलेला धक्का.

त्यातच मोदी आपल्या प्रतिमेबद्दल बरेच कॉनशस असतात हे भारताने अनेक वेळा बघितले आहे.

पण आता एका गोष्टीवर सोशल मिडीयावर जोरात चर्चा चालू आहे. या चर्चेनुसार या अपयशाचं आणि त्यातुन प्रतिमेला धक्का बसण्याचं खापर केवळ मंत्र्यांवर फोडलं जात आहे. पण या मागचे मेन ब्रेन वेगळेच आहे. हे ब्रेन अपयशी झाले की त्याचं खापर मंत्र्यांच्या माथी मारलं जात आहे असं देखील या चर्चेत सांगितले जात आहे.

कोण आहे हे ब्रेन?

तर सोशल मिडीयावर सांगितल्या प्रमाणे हे ब्रेन म्हणजे

‘विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन’

तसं तर सोशल मीडियावर दिवसभरात अनेक गोष्टी सांगितल्या जातात. यात व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमधील अनेक जण आपलं ज्ञान जगाला वाटत फिरत असतात. पण त्यातील खऱ्या गोष्टी किती आणि खोट्या किती हे सांगणं आमचं काम आहे. 

आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी संस्था आहे का? तर नक्कीच आहे. मग आता या विवेकानंद इंटरॅशनल फाऊंडेशन आणि पंतप्रधान मोदींचा काय संबंध? तर संबंध आहे. मोदींच्या टिममधील अगदी देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापासून ते त्यांच्या मुख्य सचिवांपर्यंतचे अनेक प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री हे या संस्थेचे सक्रिय सदस्य आहेत.

इथं भुवया उंचावणारी गोष्ट म्हणजे स्वतः अजित डोवाल जे मोदींचे कान आणि डोळे समजले जातात ते विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनचे संस्थापक आहेत.

आता ते कसं? तर हे फाउंडेशन म्हणजे कन्याकुमारी स्थित ‘विवेकानंद केंद्राचा’ एक भाग आहे. १९७० च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी महासचिव एकनाथ रानडे आणि प्रचारक पी. परमेश्वरन यांच्या अध्यक्षतेखाली या विवेकानंद केंद्राची स्थापना झाली होती. पुढे आयबीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर डोवाल यांनी २००९ मध्ये दिल्लीत विवेकानंद फाउंडेशनची स्थापना केली.

यानंतर यात अनेक आयएएस, आयपीएस, वैज्ञानिक, आणि सैन्यातून निवृत्त झालेले अधिकारी सहभागी होतं गेले. कदाचित त्यामुळेच या फाऊंडेशनला स्वयंसेवक संघाचा थिंक टॅंक म्हणून ओळखलं जात असावं.

प्लॅनिंग आणि इंटलेक्चुअल इनपुट देणं हे या संस्थेचं मुख्य वैशिष्ट्य

काँग्रेसच्या काळामध्ये देशात जी दोन आंदोलन सर्वाधिक गाजली ती म्हणजे बाबा रामदेव आणि अण्णा हजारे यांची भ्रष्टाचार विरोधी आंदोलन. पडद्याच्या पाठीमागून या आंदोलनाची संपूर्ण रणनीती आणि इंटलेक्चुअल इनपुट देण्याचं काम या विवेकानंद फाउंडेशननेच केलं असल्याचं सांगितलं जातं.

अजित डोवाल हे या आंदोलनांचा आणि आपला संबंध नसल्याचं सांगतं असले तरी दुसऱ्या बाजूला रामदेव बाबा स्वतः सांगतात कि,

“आम्ही काळ्या पैशाविरोधातील आंदोलनादरम्यान अनेक संघटनांची मदत मागत होतो तेव्हा विवेकानंद फाउंडेशनने आमची बरीच मदत केलील”.

अण्णा हजारे आणि त्यांच्या टीममधील सदस्यांना देखील याच संस्थेनं एकत्र आणलं असल्याचा दावा केला जातो. याच आंदोलनानंतर देशभरात काँग्रेस विरोधी वातावरण तयार होऊन भाजपला पूरक वातावरण तयार झाल्याचं बघायला मिळालं होतं.

लालकृष्ण आडवाणी, गोविंदाचार्य, गुरुमूर्ति असे सगळे संघ आणि भाजपचे वरिष्ठ नेते आणि विचारवंत, प्रचारक यांचा देखील या संघटनेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग असल्याचं बघायला मिळतं.

या संस्थेच्या सल्लागार मंडळावर सध्या कोण कोण आहे?

सगळ्यात पहिलं नाव येत ते म्हणजे सध्याचे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल अनिल बैजल, प्रसारभारतीचे चेअरमन डॉ. ए सूर्यप्रकाश, माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल, जेएनयुचे माजी प्र. कुलगुरू कपिल कपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगलोरचे माजी प्राध्यपक आर. वैद्यनाथन या सगळ्यांचा या संस्थेच्या सल्लागार मंडळात समावेश आहे.

आता मोदींच्या टिममधील कोण कोण सदस्य या संघटनेशी संबंधित आहे?

१. नागेश्वर राव : 

२०१६ मध्ये सीबीआयमध्ये आलेले नागेश्वर राव पुढे सीबीआयचे अंतरिम संचालक झाले. ते देखील या संस्थेशी संबंधित आहेत. इंडिया फाउंडेशन आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. या संस्थांच्या व्यासपीठांवरून त्यांनी अनेकदा भाषण देखील दिली आहेत.

२. पी. के. मिश्रा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सध्याचे मुख्य सचिव पी. के. उर्फ प्रमोदकुमार मिश्रा यांचा देखील विवेकानंद फाउंडेशन सोबत थेट संबंध दिसून येतो. याआधी ते कृषी विभागाचे सचिव होते. ते विवेकानंद फाउंडेशनसोबत सिनियर फेलो म्हणून जॉईन झाले होते.

३. राजीव चंद्रशेखर :

राजीव चंद्रशेखर हे सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले आहेत. याआधी ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून भूमिका पार पाडत होते. त्यांनी आजवर २०१६ च्या केरळ विधानसभा निवडणुका, २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकामध्ये योगदान दिले आहे.

यानंतर त्यांचं सगळ्यात मोठं योगदान होते ते म्हणजे २०१९ मध्ये भाजपचे व्हिजन आणि जाहीरनामा तयार करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीमध्ये राजीव चंद्रशेखर यांचा समावेश होता.

४. नृपेंद्र मिश्रा

२०१९ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव असलेले नृपेंद्र मिश्रा हे देखील या संस्थेशी थेट संबंधित होते. ते त्याआधी ट्रायचे माजी चेअरमन म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे. ते या संस्थेच्या थेट कार्यकारिणी परिषदेवर कार्यरत होते.

या संस्थेशी संबंधित लोक मुख्य ८ क्षेत्रांमध्ये काम करतात.  

यात पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक अभ्यास, आंतरराष्ट्रीय संबंध, तंत्रज्ञान आणि विज्ञान, शेजारील राष्ट्रांचा अभ्यास, गव्हर्नन्स आणि राजकीय अभ्यास, आर्थिक अभ्यास, ऐतिहासिक अभ्यास, मीडिया स्टडीज अशा क्षेत्रांचा समावेश आहे.

आता या सगळ्या नावांवरून तर स्पष्ट दिसून येत कि नरेंद्र मोदींच्या टीममध्ये अनेक सदस्य या संस्थेशी संबंधित आहेत. त्यामुळे या संस्थेचा प्रभाव सरकारवर आणि सरकारच्या निर्णयांवर आपल्याला दिसून आला तर त्यात आश्चर्य वाटायला नको. सोबतच जसं २०१४ साली यशाचं श्रेय घेतलं होतं तसं आता कोरोना काळातील अपयशच श्रेय हि संस्था घेणार का असा देखील प्रश्न आहे?

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.