पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशाला आज कामाच्या ५ गोष्टी मिळाल्या आहेत…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने देशासह जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. मोदींचा हा वाढदिवस भव्यदिव्य करण्यासाठी भाजपकडून मागच्या बरेच दिवसांपासून तयारी सुरु होती. या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारकडून काही महत्वाच्या योजनांची देखील सुरुवात करण्यात आलीय. त्याचबरोबर देशातील भाजपशासित राज्यांनी देखील काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

मात्र हाच वाढदिवस ग्रँड करण्यामुळे देशाला ५ महत्वाच्या आणि कामाच्या गोष्टी मिळाल्या आहेत, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

१. एक दिवसात रेकॉर्डब्रेक २ कोटी लोकांचे लसीकरण : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त २० दिवसांचा मेगा इव्हेन्ट आयोजित करण्यात आला आहे. याच नाव आहे, ‘सेवा आणि समर्पण अभियान’. पुढच्या ७ ऑक्टोबर पर्यंत हे अभियान चालणार आहे. याअंतर्गत लसीकरण मोहीम, रक्तदान शिबीर, गरीब वस्त्यांमध्ये जाऊन फळ आणि इतर अत्यावश्यक सामान पोहोचवणे अशा कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

याच अभियानाचा भाग म्हणून भाजपकडून आज १.५ कोटी लसीकरणाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले होते. मात्र दुपारी १:३० वाजेपर्यंतच हा आकडा १ कोटीच्या पुढे गेला होता. त्यानंतर ३:३० वाजेपर्यंत हा आकडा १.६० कोटीच्या पुढे गेला होता. तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हा आकडा २ कोटींच्या पण पुढे गेला होता. एका दिवसात २ कोटी लोकांचे लसीकरण हे आजपर्यंतचे रेकॉर्डब्रेक लसीकरण आहे.

२. रेल्वे कडून कौशल विकास योजनेची घोषणा : 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांसहित रेल्वेमंत्र्यांनी देशासाठी रेल्वे कौशल विकास योजनेची घोषणा केली आहे.

समाजातील वंचित घटकांचा कौशल्य विकास हे पंतप्रधान मोदी यांचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्याच निमित्ताने रेल्वे कौशल विकास योजना सुरु करण्यात येत आहे. याचा लाभ जवळपास ५० हजार लोकांना होणार आहे, असं म्हणतं मंत्री वैष्णव यांनी या योजनेची घोषणा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या योजनेचा लाभ सर्वांना निशुल्क मिळणार आहे.

३. गोव्याच्या ७१ अनाथालय, वृद्धाश्रम आणि रुग्णांना मिळाली आर्थिक मदत : 

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल मदत निधीतून ७१ अनाथालय आणि वृद्धाश्रमांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. राजभवनाकडून एक परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. सोबतच राज्यपालांनी राज्यपाल विवेकाधीन निधीतून डायलेसिस करणाऱ्या ७१ रुग्णांना देखील मदत जाहीर केली आहे.

४. हिमाचल प्रदेशासाठी १५ मोबाईल मेडिकल युनिट :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि मनसुख मंडविया यांनी हिमाचल प्रदेशासाठी १५ मोबाईल मेडिकल यूनिट देऊ केले आहेत. या मेडिकल यूनिटच्या मदतीने हिमाचल प्रदेशच्या लोकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनुराग ठाकूर म्हणाले कि १७ गाड्या आधीपासून सुरूच होत्या. पण आता यात आणखी १५ गाड्यांची भर पडणार आहे. यामाध्यमातून पुढच्या ५ वर्षात २१ लाख लोकांना आरोग्य सुविधा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

५. ७१ बालकांची मोफत ओपन हार्ट सर्जरी : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम ग्राउंड असलेल्या गुजरातमध्ये देखील या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमध्ये पंतप्रधान बिमा सुरक्षा योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास २५ हजार लोकांना जोडलं जाणार आहे.

तर गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ५०० किलोमीटरचा प्रवास करत गुजरातच्या अहमदाबाद, मेहसाणा, वडोदरा आणि सुरत या चार शहरांमधील कार्यक्रमांना हजेरी लावली. सोबतच पाटील यांनी ७१ लहान मुलांच्या मोफत ओपन हार्ट सर्जरीच्या अभियानाची सुरुवात केली.

या व्यतिरिक्त देखील भाजपकडून अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या यादीत वाढ देखील होऊ शकते. मात्र भाजपकडून वाढदिवस जंगी करण्याच्या कार्यक्रमामुळे सर्व सामान्यांचा फायदा झाला आहे हे नक्की.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.