आणीबाणीच्या काळात मोदी काय करत होते ?

२५ जून १९७५ च्या मध्यंतरी रात्री भारतात आपत्कालीन घोषणा करण्यात आली. घोषणा होती आणीबाणी लागू केल्याची. जवळपास १८ महिने भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांसह त्यांच्या सर्व विरोधकांना कैद केले होते. त्या १८ महिन्यांत इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस सरकारच्या हुकूमशाहीच्या विरोधात देशभरात मोठे आंदोलन झाले. ते चालविण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अग्रेसर होती.

आणीबाणी लागू होताच संघाच्या सर्वोच्च नेतृत्वाला तुरुंगात टाकण्यात आले होते. पण या काळात त्यांचे अनेक प्रचारक भूमिगत झाले होते. आणि त्यांनी इतके छुप्या पद्धतीचे इतके जोरदार आंदोलन केले की ते इंदिरा गांधी आणि संपूर्ण कॉंग्रेससाठी डोकेदुखी बनले होते.

या प्रचारकांमध्ये भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ही होते.

१९७८ मध्ये मोदींनी संपूर्ण १८ महिने भूमिगत राहून ज्या प्रकारे चळवळ चालविली, त्याविषयीच्या आठवणी त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत. हे मोदींचे पहिले पुस्तक होते. आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर साधना प्रकाशनाने गुजरातीमध्ये ‘संघर्षमा गुजरात’ या नावाने ते प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातले अनेक मनोरंजक किस्से लिहिले आहेत. त्यातले अर्धे अधिक किस्से तर त्यांच्या आणीबाणीच्या चळवळीतल्या भूमिकेबद्दल आहेत.

आंदोलनाच्या सुरुवातीच्या दिवसांचे वर्णन करताना मोदी म्हणतात,

“संघ कार्यालय हे आमच्या प्रचारकांच निवासस्थान होतं. ४ जुलै रोजी संघावर बंदी घालण्यात आली. आणि संघाच्या कार्यालयावर सरकारने कब्जा केला. म्हणून मी आणि संघाचे प्रांत प्रचारक, श्री केशवराव देशमुख दोघेही श्री वसंतभाऊ गजेन्द्रगडकर यांच्याकडे राहत असू.”

जॉर्ज फर्नांडिस हे देखील त्या काळातील भूमिगत नेत्यांपैकी एक होते. त्यांनी आणि मोदींनी चळवळीचा समन्वय साधण्यासाठी अतिशय मनोरंजक पद्धतीने भेट घेतली. मोदींनी आपल्या पुस्तकात या घटनेचं वर्णन केल आहे.

एक पिवळ्या रंगाची फियाट कार दाराजवळ थांबली. त्या गाडीतून मोठ्या शरीराचा, चुरगळलेला कुर्ता घातलेला, डोक्यावर हिरवा कपडा परिधान केलेला, पट्टेदार छापईचा आणि मनगटावर सोन्याच्या साखळीच घड्याळ घातलेला, तोंडावर दाढी असलेला मुसलमान फकीर उतरला.

‘बाबा’ च्या नावे ओळखला जाणारा जॉर्ज खाली उतरला. त्या दिवसांत आणीबाणीच्या संघर्षातल्या  संबंधित साथीदारांना भेटणे देखील एक आनंददायक प्रसंग असायचा. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि आम्ही संघर्ष करत राहिल्याबद्दल एकमेकांचे अभिनंदन केले. मी त्यांना गुजरात आणि माझ्याकडे असलेल्या इतर प्रांतांची माहिती दिली.

यानंतर मोदी लिहितात,

‘त्या भेटीनंतर मी श्री. जॉर्ज यांच्याशी सतत संपर्कात होतो. मी त्यांची नानाजी (संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री नानाजी देशमुख) यांच्याशी भेट घडवून आणली. नानाजी आणीबाणीचे नेतृत्व करणाऱ्या लोक संघर्ष समितीचे मंत्री होते. आणि इंदिरा सरकार त्यांना शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करत होत्या.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आणीबाणीच्या विरोधात जे भूमिगत साहित्य वितरीत करण्यात आले ते प्रामुख्याने गुजरातमध्ये छापण्यात आले. हे कसे शक्य झालं याची माहिती देताना मोदी म्हणतात,

“संघाचे भूमिगत प्रचारक श्री किशनभैया राजस्थानहून अहमदाबाद येथे राजस्थान लोक संघर्ष समितीच्या वतीने साहित्य प्रकाशित करण्यासाठी गुजरात मध्ये आले. त्यांच्यासाठी हिंदीमध्ये २ लाख मासिके छापून राजस्थान गाठणे हे एक आव्हान होते. मी आणि जनसंघाचे संघटनमंत्री श्री. नाथाभाई झगडा यांनी या कार्यासाठी योग्य प्रेस शोधण्यास सुरवात केली. हिंदी भाषेत एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य छापले जाऊ शकते, अशी प्रेस गुजरातमध्ये मिळणे कठीण होते.”

दोन दिवसाच्या सततच्या शोधा नंतर एका प्रेसच्या मालकाने या कामास सहमती दर्शविली. आम्ही एकदासा नि:श्वास सोडला. विचार केला की एकदा का छापून होऊ दे मग पुढचं पुढं पाहू. मासिके छापण्यास सुरवात झाली. दोन लाख मासिके छापून झाली.

मासिके छापून झाल्यानंतर, अहमदाबादमधील चार वेगवेगळ्या ठिकाणी काळजीपूर्वक ठेवल्या गेल्या. यानंतर राजस्थानमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन कामगार येऊन रिकाम्या अंथरुणातून ही मासिके घेऊन जायचे. जेव्हा हे साहित्य राजस्थानमध्ये वितरित केले गेले होते, तेव्हा तेथील पोलिसांनी छापलेले प्रेस शोधण्यासाठी राज्यभर छापे टाकले.

दुसर्‍या घटनेचा संदर्भ देताना मोदींनी लिहिले आहे की,

‘आमच्या भूमिगत योजनेचे सहयोगी स्वयंसेवक श्री नवीननभाई भावसार यांना अटक करण्यात आली. भूमिगत संघर्षाशी संबंधित काही महत्त्वाची पत्रे पोचताच पोलिसांनी श्री. नवीनभाई यांच्या घरी छापा टाकला. श्री परिंदू भगत, श्री गोविंदराव गजेंद्र गडकर आणि श्री विनोद गजेंद्र गडकर यांनाही त्यांच्याबरोबर ताब्यात घेण्यात आले. सर्वांची कसून चौकशी केली गेली. पत्रिकेवर प्रेषकाचे नाव ‘प्रकाश’ लिहिलेले होते.

(प्रकाश हे मोदींचे टोपणनाव होते.) सरकारला हे नाव धारका बद्दलही कळले. आता माझ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी पकडलेल्या सर्व लोकांना विविध प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या. बऱ्याच युक्त्यांनंतरही या लोकांनी पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही.

मोदींनी या पुस्तकात सांगितले की, आणीबाणीच्या दरम्यान ते एक शीख म्हणून वावरत होते. स्वत:चा वेष वापरत असताना संन्याशाच्या वेषात ही त्यांनी या चळवळीतील आपली जबाबदारी पार पाडली. याकाळात त्यांनी पोलिस अटक टाळण्यासही प्रयत्न केले होते.

‘कुछ निजी बातें’ या पुस्तकाच्या परिशिष्ट ४ मध्ये या पुस्तकाचा परिचय देताना मोदी लिहितात की, ‘हे माझे पहिले पुस्तक आहे. हे पुस्तक लेखक म्हणून नव्हे तर युद्धाचा सैनिक म्हणून लिहिले आहे. भूमिगत संघर्षाबद्दलच्या काही कठीण प्रश्नांची गुरुकिल्ली म्हणून ते लिहिले असून, त्या प्रश्नांची उत्तरे  आतापर्यंत अनुत्तरीतच आहेत.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.