वर्षाला १५-२० देश पायाखाली तुडवणारे मोदीजी तब्बल १६ महिन्यांनी बाहेर पडलेत..!

काल वडिलांना म्हणालो, लय कंटाळा आलाय. एक ट्रिप गोव्याला मारून यावी म्हणतो. तसपण सगळं सुरू झालय. तस “आई कुठे काय करते” मालिका बघत बसलेल्या आमच्या बाबानं पाठीमागनं रिमोट फिकून मारला आणि जोरात खेकसले,

मोदींकडे बघं, गेले सोळा महिने देश सोडला नाय त्या माणसानं आणि तूला लगीच घर टोचाय लागलं काय ? 

म्हणजे आत्ता सगळ्या गोष्टी भूतकाळच वाटू लागल्यात, मोदी बाहेरच्या देशात जायचे. मग भारी भारी फोटो यायचे. मग तिथले NRI लोकं मोदी मोदी म्हणून ओरडायचे. मग मोदी साहेब फेसबुकच्या मालकापुढं कंठ दाटून दुख: मांडायचे. फेसबुक, ट्विटरवर नुसता धुरळा व्हायचा असल्या गोष्टीला खरच लय महिने झाले की.

सगळं कस डोक्याला ताण देऊन आठवाय लागतय. 

इतक्यात मोदी बांग्लादेशातकडे झेपावल्याची बातमी आली. मग पप्पांना सांगितल आत्ता आम्ही पण गोव्याला जाणार. तुम्ही मोदींसोबत तुलना करताय म्हणूनच मोदी किती फिरतेत तो टेडा पण काढला.

मागील वर्षाच्या म्हणजे २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात नरेंद्र मोदीजी ब्राझीलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून परतले होते. त्यानंतर मार्च पासून भारतात कोरोनाचं थैमान सुरू झालं. मागच्या नोव्हेंबर पासून मोदी कोणत्याही फॉरेनच्या देशात गेले नाहीत. गंमत अशी की या काळात एस जयशंकर आणि राजनाथ सिंह हे दोघंही फॉरेनचा दौरा करुन आले आहेत. रशिया आणि इराणच्या दौऱ्यावर हे दोन केंद्रीय मंत्री गेले होते.

अस असतानाही मोदींनी देशाच्या बाहेर पाय ठेवले नाहीत हे विशेष. 

२०१४ 

तर मे २०१४ च्या एन्डिंगला मोदी साहेब पंतप्रधान झाले. त्यानंतरच्या चारच महिन्यात ते अमेरिका सहित पाच देशांच्या दौऱ्यावर गेले. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ च्या दरम्यानच्या ११ महिन्यांमध्ये ते एकूण २४ देशांच्या दौऱ्यावर गेले.  सुरवातीला ते म्यानमार, ऑस्ट्रेलिया, फिजी, नेपाल तर मार्चमध्ये सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूरमध्ये गेले होते. 

२०१५

२०१५ च्या सुरवातीच्या तीन महिन्यात ते युरोप आणि फ्रांस, जर्मनीत गेले. याच दौऱ्यात राफेल विमानाची चर्चा झाली होती. फ्रांन्सचे PM ओलांद यांनी या भेटीत मोदी साहेबांनी अंबानी साहेबांना सौद्यात सामील करून घ्यावं असा प्रस्ताव दिला होता असा खुलासा केलेला. त्यानंतर २०१५ च्या सप्टेंबरमध्ये मोदी साहेबांनी अजून १४ देश शोधून काढले. कॅनाडा, चीन, मंगोलिया, दक्षिण कोरिया, बांग्लादेश, “स्थान वाली सिरीज” करत ते अमेरिकेत गेले.

UAE मध्ये ३४ वर्षानंतर जाणारे ते पहिले पंतप्रधान देखील झाले. नोव्हेंबर मध्ये मोदी साहेब इंग्लडला गेले. तिथून तुर्की मलेशिया, सिंगापूर मारून डिसेंबर मध्ये त्यांनी फ्रान्स, रशिया आणि अफगाणिस्तान आवरलं. 

गणपतीपुळ्याला जाताना कसं मध्येच मार्लेश्वर करुन जाऊ वाटतं असाच एक किस्सा या दरम्यान घडला. २५ डिसेंबरला काबूल वरुन येताना अचानक ते मोदी पाकीस्तानात उतरले आणि नवाज शरीफ यांना भेटले. 

२०१६

२०१६ सालचे पहिले दोन महिने भारतातच काढले. त्यानंतर मार्चमध्ये मोदी साहेब बेल्जियमला गेले. एप्रिल महिन्यात साऊदी अरब. त्याचबरोबर मार्च २०१६ ला त्यांनी अमेरिकेत आण्विक सुरक्षा शिखर संमेलनात सहभाग नोंदवला. मे ते सप्टेंबर दरम्यान १५ देश टिपले. यामध्ये अफगाणिस्तान, अमेरिका सहित उज्बेकिस्तान, इराण, स्विजरलैंड, मॅक्सिको, मोजाम्बिक, टांझानिया, केनिया, व्हिएतनाम आणि चीन होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांनी पूर्व एशिया शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी लाओस गाठलं.

२०१७

आत्ता २०१७ सुरवातीला युपीचं इलेक्शन लागल्याने मोदी साहेब परत निवडणूकींच्या कार्यक्रमात व्यस्त राहिले. नाही म्हणायला या टप्यात देखील थायलंड आणि जापान हे देश त्यांनी उरकून घेतले. त्यानंतर यूपीच्या इलेक्शन झाल्या.

निकाल लागल्यानंतर एक महिन्यानंतर त्यांनी पून्हा परदेश दौरे सुरू केले. आणि पुढच्या पाच महिन्यात ११ देश टप्यात आणले. मे महिन्यात श्रीलंक, मे एन्डिंगला जर्मनी, स्पेन आणि रशिया. जून महिन्यात फ्रांस. त्यानंतर कजाखस्तान,अमेरिका, नेदरलॅंड. जुलै महिन्यात इस्त्रायल, सप्टेंबरमध्ये चीन आणि म्यानमार हे देश कवर करण्यात आले. नोव्हेंबरमध्ये ते फिलिपाईन्सला गेलेले. 

२०१८

२०१८ साला उजाडताच जानेवारीत जॉर्डन, UAE, ओमान, पॅलेस्टाईन देशांचा दौरा झाला. ५८ वर्षानंतर भारतीय पंतप्रधान पॅलेस्टाईनमध्ये गेले, ३० वर्षांनतर कोणतातरी भारतीय पंतप्रधान जॉर्डनला तर १० वर्षांनंतर ओमानला गेला. त्यानंतर स्वीडन,इंग्लड, जर्मनी आणि चीनचा दौरा आटोपला. पुढच्या पाच महिन्यात १० देश झाले त्यात नेपाळ दोनदा झाला. नोव्हेंबर २०१८ मध्ये सिंगापूर, मालदीव, अर्जेंटिना आवरलं आणि २०१८ साल संपल. 

२०१९

त्यानंतर २०१९ इलेक्शनचं वर्ष. तरिही फेब्रुवारीत दक्षिण कोरिया टिपला. त्यानंतर तीन महिने इलेक्शनमुळे भारतात राहिले. इलेक्शन झाल्या झाल्या परत यात्रा सूरू झाल्या. या वेळेला पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानाने बहरिनला भेट दिल्याचं सांगण्यात आलं. निवडून आल्यानंतर त्यांनी ११ देश टप्यात घेतले. 

त्यानंतर आलं २०२० 

२०१९ च्या शेवटापासून ते मार्च पर्यन्त ते बाहेर गेले नाहीत. याचं कारण CAA व NRC असल्याचं सांगण्यात येतं. मार्च मध्ये मोदी साहेब बांग्लादेशला जाणार होते पण कोरोना आला आणि प्लॅन फिस्कटला, त्यानंतर युरोप देखील कॅन्सल झाला. १५ नोव्हेंबर २०१९ साली ते ब्राझीलवरून आले होते.

अखेर मोदीजी आज दिनांक २६ मार्च २०२१ रोजी बांग्लादेशाकडे झेपावले. सकाळी साडेदहाच्या सुमारास ते बांग्लादेशात पोहचले.

सोळा एक महिने होतं आले आणि मोदी साहेब फॉरेनला गेले नव्हते. पंधरा-सोळा महिन्यानंतर बांग्लादेशला का असेना अखेर मोदी साहेब फॉरेनला गेले.

पण आमचे फादर आम्हाला लय भारी वाक्य बोलले, मोदी तिथे जावून कायतरी करतात तरी. तुम्ही गोव्याला जावून काय — करणाराय..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.