नरेंद्र मोदी कुत्सितपणे म्हणाले,” विलासराव देशमुखांच्या तब्येतीची चौकशी करायला आलोय.”

भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख म्हणजे ते पॉवरफुल राजकारणी आहेत. अगदी २४ तास त्यांच्या डोक्यात राजकारण घुमत असतं. ज्यांनी त्यांच्याशी वैर पत्करलं त्यांना निष्ठुरपणे संपवण्यात ते आघाडीवर असतात. हे आजकाल नाही तर राजकारणात आल्यापासून त्यांची हीच ओळख राहिलेली आहे.

हि गोष्ट आहे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते तेव्हाची.

मोदींच्या राजकीय आयुष्यातील सर्वात वादग्रस्त प्रकरण म्हणजे २००२ सालची गुजरात मध्ये पसरलेली हिंदू मुस्लिम दंगल. अयोध्येवरून परतणाऱ्या साबरमती एक्सप्रेसमधल्या कारसेवकांच्या डब्याला गोध्रा येथे आग लागली. जवळपास ५८ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे खवळून उठलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्य पेटवलं. कित्येक निरपराध मुस्लिम कुटूंबीय देखील यात जळून खाक झाले.

असं म्हटलं गेलं कि या दंगली रोखण्यासाठी राज्य सरकार व पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. या आरोपांमुळे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ढासळली. त्यांच्यावर टीकाच वर्षाव होऊ लागला. असं म्हणतात कि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी देखील मोदींवर नाराज होते. त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली होती. पण अडवाणी व इतर नेत्यांच्या पाठिंब्यामुळे मोदींचे पद वाचले.

मात्र काँग्रेसने नरेंद्र मोदींच्या विरोधात आपली विरोधाची धार कमी केली नाही. त्यांनी भाजप हा पक्ष कसा मुस्लिम विरोधी आहे हे ठसवण्यासाठी नरेंद्र मोदी हटाव मोहीम तीव्र केली.

त्याकाळी गुजरातच्या शेजारच्या तिन्ही राज्यात काँग्रेसची सत्ता होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नरेंद्र मोदी यांना सर्व बाजूनी घेरलं. विलासराव देशमुखांनी तर गुजरातमध्ये जाऊन मोदींवर जोरदार टीका केली.

मोदी विसरणाऱ्यातले नव्हते. त्यांनी हि गोष्ट लक्षात ठेवली.

असं म्हणतात कि जेव्हा दंगली पेटल्या होत्या तेव्हा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेजारी राज्य म्हणून राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्राकडे पॉलिसी मदत मागितली होती. पण दिग्विजय सिंग आणि अशोक गेहलोत आणि दिग्विजय सिंग यांनी हि मदत दिलीच नाही. तर विलासरावांनी मदत पाठवली पण ती अपुरी होती असा मोदींचा आरोप होता.

३ जानेवारी २००३ रोजी विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश याचा तुझे मेरी कसम हा सिनेमा रिलीज झाला. आपल्या मुलाचा पहिलाच सिनेमा म्हणून विलासरावांनी जंगी सेलिब्रेशन केलं. पण हि गोष्ट त्यांच्या पक्षातील विरोधकांना पचनी पडली नाही. गेले काही वर्ष विलासरावांच्या मुख्यमंत्रीपदाविरुद्ध काँग्रेसमधून कारवाया सुरु होत्या. खरं तर त्यांच्या कारभारावर कोणी बोट ठेवेल अशी स्थिती नव्हती. कोणतेही आरोप नव्हते पण काही तरी चमत्कार घडला आणि दिल्लीतून विलासरावांना राजीनामा देण्याचे आदेश आले.

विलासरावांनी हा धक्का पचवला आणि आपली मुख्यमंत्रीपदाची सूत्रे त्यांचेच एकेकाळचे खास मित्र सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सोपवली.

योगायोग असा कि नेमके याच वेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मुंबईमध्ये आले होते. त्यांच्यासाठी भाजपने शिवाजी पार्कमध्ये जंगी सभा आयोजित केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे युती असूनही या सभेला एकही शिवसेनेचा नेता उपस्थितीत नव्हता. दंगलीमुळे जगप्रसिद्ध झालेले नरेंद्र मोदी नवे हिंदू हृदय सम्राट म्हणून पहिल्यांदाच मुंबईच्या दौऱ्याला आले होते.

शिवाजी पार्कमध्ये भव्य असा स्टेज उभारण्यात आला होता. लाखोंच्या संख्येने गर्दी जमली होती. नरेंद्र मोदी यांची अत्यंत फिल्मी स्टाईलमध्ये एका भव्य कमळ फुलाच्या मधून स्टेज वर एंट्री झाली. पहिल्यांदाच गुजरात बाहेरच्या एखाद्या सभेत मोदी बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरवातच विलासराव देशमुखांवर टीका करून केली.

ते म्हणाले,

“मी मुंबईत विलासराव देशमुख यांच्या प्रकृतीची चौकशी करायला आलोय.

विलासरावांनी गुजरातमध्ये येऊन माझ्या विरुद्ध आरोप केले होते. आज त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. फक्त विलासरावंच नाही तर काँग्रेसची सत्ता असलेल्या सर्व १४ राज्यांमध्ये मी जाणार आहे आणि सगळ्यांची झडती घेणार आहे.”

मोदी या भाषणात गुजरात दंगली बद्दल देखील बोलले. मीडिया विकासाच्या ऐवजी दंगलीचा उल्लेख करून गुजरातची प्रतिमा बिघडवत आहे असा आरोप त्यांनी केला. सोनिया गांधींना इटली कि बेटी म्हणून हिणवत त्यांनी हिंदुत्वाची देशाला असलेली आवश्यकता सांगितली.

या भाषणात नरेंद्र मोदी यांनी लालूप्रसाद यादव आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली. मोदी म्हणाले,

“ते म्हणतात कि राज्यात प्रवेश केल्या केल्या मला अटक करण्याची भाषा बोलली जाते. बिहार आणि महाराष्ट्रात लोकशाही अशीच चालवली जाते का हाच सवाल मला जनतेला विचारायचा आहे.”

एकूणच शिवाजी पार्क मधील नरेंद्र  मोदी यांची सभा प्रचंड यशस्वी ठरली. मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री बंगल्यावर जाऊन भेट देखील घेतली पण भारताचा भावी हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांची चर्चा झालीच. एका नव्या वादळाची हि सुरवात होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.