आईसाठी एकमेकांची आई बहिण काढणारे लोक आपल्या आईची किंमत समजतात का ?

मोदींची आई साध्या राहणीमानामुळे देशासाठी आदराचा विषय आहे. मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांच्या आईच्या राहणीमानात काही फरक पडला नाही हे कौतुकाने माध्यमात सांगितलं जातं. चवीने वाचलं जातं. मोदी शपथविधीनंतर आईला भेटायला गेले तेंव्हा जवळपास देशातल्या सगळ्या पेपर आणि टीव्हीवर त्याची ठळक बातमी होती.

मोदी घराबाहेरच भेटले आईला.

खुर्चीत मायलेक दोघंच बसले होते. आणि भोवती सगळे कॅमेरा. एक मुलगा आपल्या आईला भेटायला गेला ही गोष्ट या देशात पहिल्यांदाच ब्रेकिंग न्यूज झाली होती. मोदींनी आईला भेट दिली. आईने त्यांना भेट दिली. पुढे खूप दिवस यावर देश चर्चा करत राहिला. अर्थात आपल्या देशात प्रत्येक गोष्टीत खुसपट काढणारे लोक आहेत. काही लोकांना ही ड्रामेबाजी वाटली. काही लोकांना अतिरेक वाटला मिडीयाचा. पण एकूण देशातल्या सामान्य माणसाला हे आवडलं होतं.

श्रावणबाळाच्या गोष्टी ऐकत मोठे झालोय आपण. आपल्याला हे आवडतंच.

पुढे मोदींची आई रिक्षाने प्रवास करते वगैरे गोष्टी माध्यमात यायला लागल्या. या गोष्टींची पण चर्चा झाली. मोदींच्या आईने मतदान केलं ते पण मिडीयाने दाखवलं. असं सगळं मोदींच्या मातृप्रेमाविषयी आपण बघत आलो. त्यांची ही बाजू एक सामान्य मध्यमवर्गीय म्हणून आपल्याला नेहमीच आवडत आली. पण काही लोकांना त्यात राजकारण दिसतं. एखाद्या माणसाच्या आईला आपण राजकारणाचा विषय कसं बनवू शकतो? वगैरे. इथून पुढे थेट मोदींनीच आपल्या आईंना राजकारणात आणलं जातय त्यावरुन टिका केली जातेय असा सुर पकडला. असो! 

पण ज्यांना मोदींच्या आईविषयी आदर वाटतो त्यांना राहुल गांधींच्या आई विषयी काय वाटतं?

सोनिया गांधी आता राजकारणातून जवळपास बाहेर आहेत. आता त्या नेत्या कमी आणि आई जास्त आहेत. त्यात गंभीर आजारी आहेत. उपचारासाठी राहुल गांधी त्यांच्यासोबत जात असतात. एका चांगल्या मुलासारखे ते वागताहेत. आजही प्रत्येक निर्णयात आईचा सल्ला घेतात. त्यांची राजकीय भूमिका किंवा त्यांचा राजकीय वकूब वेगळी गोष्ट आहे.

त्यांचं वक्तृत्व विनोदाचा विषय होऊ शकतं पण त्यांचं मातृप्रेम हा चेष्टेचा विषय कसा होऊ शकतो? सोनिया गांधी यांच्या परदेशात उपचाराची चेष्टा झाली. मग बीजेपीचे मनोहर पर्रीकर परदेशात गेले उपचाराला. मग रामदेव बाबा गेले परदेशात. तेंव्हापासून सोनिया गांधी यांच्या परदेशात उपचारावर विनोद बंद झाले. पण इतरांवर टीका थांबायला स्वतःच्या घरात काही दुर्घटना व्हायला पाहिजे का? सोनिया गांधींच्या राजकीय भूमिकेवर टीका व्हायलाच पाहिजे. पण आई आणि मुलाच्या विषयावर निर्लज्जपणे बोलणारी माणसं फक्त म्हशीच्या दुधावर वाढली की काय असं वाटायला लागतं.

एका मुलाने आपल्या आईची काळजी घेऊ नये का?

पूर्णवेळ राजकारण करत रहावं का? आपले वडील, आजीची हत्या अनुभवलेल्या राहुल गांधीना आईचं महत्व किती असेल हे आपल्याला जाणवायला हवं.

 

आपण रामायण महाभारत वाचलेली, ऐकलेली माणसं. आईच्या शब्दाखातर वनवासात गेलेला राम आपल्याला माहित आहे. आपल्याला आईचं महत्व कुणी सांगायची गरज नाही. पण दुर्दैवाने या देशात जी जी गोष्ट माता या नावाने जोडली गेलीय त्या प्रत्येक गोष्टीचे हाल बघवत नाहीत.

गंगामैया म्हणणारे माणसं आपण पण गंगेचे काय हाल करून ठेवलेत बघितलं का कधी? गोमाता म्हणतो पण कचराकुंडीतला कचरा खात रस्त्याने फिरणारया गाई सगळ्यात जास्त या देशात आहेत. हे सगळं का होतंय?

राजकारण. राजकारणाच्या नादात आपण एखाद्याच्या आई बद्दल बोलतोय हे पण विसरतो. एक पंतप्रधान आपल्या आईला भेटत असेल तर तो टीकेचा विषय नसतो. राहुल गांधी जर आईच्या उपचारासाठी सोबत जात असतील तर तो चेष्टेचा विषय नसतो. आणि ही चेष्टा करता करता दोन्ही बाजूचे टीकाकार जेंव्हा एकमेकांची आई बहिण करतात तेंव्हा तर लाज वाटते.

सोशल मीडियात कितीतरी चर्चेत हे दिसतं. मोदींची आई रिक्षात बसलेला फोटो होता. त्यावर चर्चा चालू होती. त्यात समर्थक आणि विरोधक एकमेकांची आई बहिण काढत होते. तेच पुन्हा राहुल आई सोबत परदेशात गेले त्या पोस्टवर पण दिसलं. मोदींच्या आईसाठी, राहुल गांधींच्या आईसाठी एकमेकांची आई बहिण काढणारे लोक आपल्या आईची किंमत समजतात का? जन्म दिल्याची लाज वाटत असेल या लोकांच्या आयांना. मोदी आणि राहुल गांधी यांच्याकडून सगळ्यात जास्त काय शिकण्यासारखं असेल तर ते आपल्या आईवर प्रचंड प्रेम करतात.

या दोघांसाठी एकमेकांची आयमाय काढणाऱ्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बाकी दोघांपैकी कुणीही सत्तेवर असलं तरी पेट्रोल स्वस्त होत नसतं. म्हणून आग लावा त्या राजकारणाला.

मोदी असोत किंवा राहुल गांधी हरले काय जिंकले काय जाणार आपल्या आईला भेटायला. या सोशल मिडीयाच्या भांडणात लोक मात्र आपल्या आईचा नको तसा उद्धार करून घेताहेत. भले आपण पंतप्रधानपदाचे दावेदार नाही. पण आपली आई आपल्याला पंतप्रधानापेक्षा कमी समजत नाही राव.             

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.