आईच्या पोटात असताना आंदोलनाचं वारं झेलणारा भारतीय माणूस आफ्रिकेचा सर्वोच्च जज बनलाय

भारत आणि दक्षिण आफ्रिका, दोन्ही देशांचे संबंध तसे फार जुने. म्हणजे अगदी महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांच्यापासून. महात्मा गांधी यांना आफ्रिकेत वर्णद्वेषाचा सामना करावा लागला आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आजही आफ्रिकेत भारतीय नागरिक मोठ्या संख्येनं आहेत. एवढंच नाही, तर तिथल्या एका सर्वोच्च पदावरही आता एका भारतीय नागरिकाची नियुक्ती झाली आहे.

भारतीय वंशाचे नरेंद्रन जॉडी कोलापेन यांची दक्षिण आफ्रिकेचं सर्वोच्च न्यायालय असणाऱ्या कॉन्स्टिट्यूशनल कोर्टाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे.

नरेंद्रन जॉडी यांची नियुक्ती झाल्याची घोषणा, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सायरील राम्फोसा यांनी केली. नव्या वर्षाच्या सुरुवातीला ते पदभार स्वीकारतील.

हे नरेंद्रन जॉडी आहेत कोण?

१९८२ मध्ये त्यांनी आफ्रिकेत वकीली करायला सुरुवात केली. त्यांनी कायम लोकाभिमुख काम करण्यावर भर दिला. १९९३ मध्ये जॉडी यांनी ‘लॉयर्स फॉर ह्यूमन राईट्स’ या संस्थेत प्रवेश केला आणि अवघ्या दोन वर्षांतच ते नॅशनल डायरेक्टर बनले.

त्यांच्या कामाचा आवाका इतका होता की, १९९७ मध्ये ते साऊथ आफ्रिकेच्या मानवाधिकार आयोगात नियुक्त झाले, जॉडी यांनी २००२ ते २००९ या कालावधीत मानवाधिकार आयोगाचे चेअरमन म्हणूनही काम पाहिलं.

वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थामधून त्यांनी मानवाधिकारांच्या रक्षणासाठी काम केलं. जगभरातल्या वेगवेगळ्या देशात होणारं मानवधिकारांचं उल्लंघन आणि त्या संबंधित समस्यांवर त्यांनी युनायटेड नेशन्स आणि हॉवर्ड यूनिवर्सिटी अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. आता सर्वोच्च पदावर नियुक्त होण्याआधीही त्यांच्या दोन वेळा याच पदासाठी मुलाखती झाल्या होत्या. मात्र त्या असफल ठरल्या. जॉडी यांनी कॉन्स्टिट्यूशनल कोर्टात कार्यकारी न्यायाधीश म्हणूनही काम केलं आहे.

भारतीय वंशाचे असल्याचा अभिमान त्यांनी एका भाषणात बोलून दाखवला होता. १५० वर्षांपूर्वी भारतातून दक्षिण आफ्रिकेमध्ये कामगारांना आणण्यात आलं होतं. या कामगारांसोबत त्यांची स्वतंत्र ओळख, संस्कृती आणि धर्म या गोष्टी भारतात आल्या. या गोष्टींची लाज बाळगण्याची काहीच गरज नाहीये, उलट याचा अभिमानच असायला हवा. भारतीय वंशाच्या आफ्रिकन नागरिकांनी हे राष्ट्र घडवण्यात कायम अग्रेसर असायला हवं.

आंदोलनाचा वारसा

१९५६ च्या ऑगस्ट महिन्यात आफ्रिकेतील सर्व जाती, धर्म आणि वंशाच्या २० हजार महिलांनी प्रेटोरियामधल्या युनियन बिल्डींग्सवर मोर्चा काढला होता. तत्कालीन सरकारनं काढलेल्या ‘पास लॉ’ च्या विरोधात त्यांनी हा मोर्चा काढला होता. या मोर्चामुळं आफ्रिकेत महिला आंदोलनाची ठिणगी पडली, अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यात जॉडी यांच्या आईचाही समावेश होता. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांच्या आईला दोनदा जेलची हवा खावी लागली. जॉडी सांगतात हे सगळं घडलं तेव्हा त्यांची आई गरोदर होती आणि तेव्हापासूनच त्यांची समाजाशी नाळ जोडली गेली.
जॉडी यांच्याबद्दल अभिमान बाळगावा अशी आणखी एक गोष्ट म्हणजे महात्मा गांधी अफ्रिकेत असताना सुरु झालेल्या काँग्रेस ऑफ बिझनेस अँड इकोनॉमिक्स या संस्थेने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

आता जॉडी यांच्या नियुक्तीमुळे भारत आणि अफ्रिकेतील संबंध आणखी दृढ होण्यात कशी मदत होईल हे येत्या काळात पाहावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.