नर्मदा परिक्रमा कशी केली जाते ?
नर्मदा परिक्रमा….!
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिक्रमांना खूप महत्व आहे. अयोध्या परिक्रमा, गिरनार परिक्रमा, कुरुक्षेत्र परिक्रमा, वृंदावन परिक्रमा, कैलास परिक्रमा. आणि या सगळ्यात नर्मदा परिक्रमेला तर अनन्यसाधारण असं महत्व आहे.
आज आपण समजून घेऊ की नर्मदा परिक्रमेला इतकं महत्व का आहे, इतिहास काय सांगतो आणि शिवाय ही परिक्रमा का, केव्हा आणि कशी केली जाते ?
आपल्याकडे 18 पुराणं आहेत पण यात नदी म्हणून फक्त एकच पुराण आहे, ते म्हणजे नर्मदा पुराण. शिवाय रामायण महाभारत आणि अशा अनेक पौराणिक ग्रंथांमधे सुद्धा नर्मदा नदीचं वर्णन केलं गेलंय. हिंदू धर्मात असं सांगितलं गेलय की या नदीच्या किनारी असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यावर माणसाला पुण्य मिळतं. नर्मदा ही अमरकंटक नावाच्या ठिकाणाहून मध्य भारतातल्या मैकाल टेकड्यांमध्ये उगम पावणारी पवित्र अशी नदी आहे आणि या नदीचं पावित्र्य इतकं आहे कि तिचा उल्लेख नर्मदा मैय्या असा केला जातो.
आता येऊया नर्मदा परिक्रमा या संकल्पनेकडे. परिक्रमा म्हणजेच प्रदक्षिणा. परिक्रमा हा संस्कृत शब्द आहे जो ‘परी’ म्हणजे आजूबाजूला आणि ‘क्रमा’ म्हणजे जाणं असा बनलाय… म्हणूनच नर्मदा परिक्रमा म्हणजे नदीची परिक्रमा. ही शतकानुशतकं अस्तित्वात असलेली हिंदूंची अध्यात्मिक आणि धार्मिक परंपरा आहे. ज्यात यात्रेकरू नर्मदा नदीचं पाणी कुपीत गोळा करून नदीकाठी कोणत्याही ठिकाणाहून आणि नदीच्या उजवीकडून चालायला सुरवात करतात.
जसं आपण मंदिरात प्रदक्षिणा घालतो तशीच प्रदक्षिणा नदीला किंवा पर्वताला सुद्धा घालतात आणि या प्रदक्षिणेलाच परिक्रमा असंही म्हणतात. या नदी भोवती परिक्रमा करण्याची प्रथा भारतभरात प्रचलित आहे. जवळ जवळ एक ते दीड लाखांहून अधिक प्रवासी दरवर्षी या परिक्रमेत सहभागी होताना दिसतात.
पण नर्मदेभोवती परिक्रमा करण्याची किंवा प्रदक्षिणा घालण्याची पद्धत नेमकी कोणी रुढ केली आणि सगळ्यात पहिल्यांदा ही परिक्रमा कोणी पूर्ण केली? तर असं म्हणतात की मार्कंडेय ऋषींनी सगळ्यात पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा एक खडतर तप म्हणून पूर्ण केली होती.. आणि म्हणूणच या परिक्रमेला अधिक महत्व प्राप्त झालंय.
मार्कंडेय ऋषींनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करताना तिला मिळणाऱ्या छोट्या छोट्या नद्यांनाही नर्मदेचच रूप मानलं. त्यामुळे त्यांनी नर्मदा परिक्रमा करताना त्या छोट्या नद्यांच्याही उगमापर्यंत जाऊन पुन्हा त्या नर्मदेला मिळेपर्यंत प्रवास केला आणि अशा प्रकारे कोणतीही नदी किंवा उपनदी न ओलांडता नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. नर्मदा नदीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मार्कंडेय पुराणामध्ये सांगितलय. मार्कंडेय ऋषींनी पृथ्वीवर २१हून अधिक वेळा प्रलयकाळ अनुभवला. मात्र या २१ प्रलयांमध्येही नर्मदा माता सुरक्षित रहिली, तिच्या अस्तित्वाला जरासुद्धा धक्का बसला नाही असं म्हटलं जातं.
ही संपूर्ण परिक्रमा सुमारे 3500 किलोमीटर लांब असल्याचा अंदाज आहे. नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे.. धरणं ओलांडणं किंवा इतर कुठल्याही कारणांमुळे यात्रेकरूंना काही वेळा लांबचा रस्ता धरून ही परिक्रमा पूर्ण करावी लागते.
त्यामुळे एखादी व्यक्ती कोणत्या मार्गाने जाते यावरही एकंदरीत हे अंतर अवलंबून असतं आणि वेळेचं म्हणाल, तर कोणत्याही व्यक्तीची शारीरिक क्षमता, चालण्याची क्षमता, त्या व्यक्तीचं वय या गोष्टी परिक्रमा किती वेळात पूर्ण होऊ शकते हे ठरवतात, साधारणत: अख्खी परिक्रमा पूर्ण करायला 105 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.
ही परिक्रमा सुरू कुठून केली जाते? किंवा परिक्रमेचा मार्ग काय असतो?
तर साधारणत: ही परिक्रमा मध्य प्रदेशातल्या ओंकारेश्वर पासूनच सुरू केली जाते किंवा करावी असं म्हणतात. स्थानिक रहिवासी तिथल्या त्यांच्या गावातूनही ही परिक्रमा सुरू करतात पण त्यांना सुद्धा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ओंकारेश्वरला यावच लागतं. ओंकारेश्वरला येऊन जलाचा अभिषेक करेपर्यंत ही परिक्रमा पूर्ण झाली, असं मानलं जात नाही. शिवाय या परिक्रमेचा आणखी एक नियम असा आहे की एखादी व्यक्ती ही परिक्रमा पूर्ण करत असताना नदी ओलांडून दुसऱ्या काठावर किंवा मध्यभागी जाऊ शकत नाही, ती एकसलग असावी लागते.
नर्मदा किनारी परिक्रमा मार्गात एक हजारहून अधिक तीर्थस्थानं आहेत. काही फेमस हॉल्ट्स सांगायचे झाले तर उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर, त्रिवेणी संगमाची मंदिरं; खर गोनचं नवग्रह मंदिर; भरुचमधलं अंकलेश्वर तीर्थ, मिठी तलाई आणि नरेश्वर धाम; भोपाळमधलं लक्ष्मी नारायण मंदिर; जबलपूरमधलं शंकराचार्य, त्रिपुरा सुंदरी, गवारी घाट आणि भेडा घाट; अमरकंटकमधलं प्रसिद्ध नर्मदाकुंड, लखनादोन मधलं ज्योतेश्वर महादेव मंदिर. अशी काही ठिकाणं आहेत.
ही परिक्रमा केव्हा केली जाते? तर कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ही परिक्रमा सुरू करतात.
साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर या परिक्रमेला सुरवात केली जाते.. तर पावसाळ्यात ही परिक्रमा बंद असते
पण ही परिक्रमा का करावी.. तर यामागे प्रमुख तीन करणं आहेत. भौगोलिक, धार्मिक आणि आध्यात्मिक. भौगोलिकरित्या नर्मदा नदी ही अतिशय स्थिर आहे आणि नर्मदा नदीकाठची जमीनही अतिशय सुपीक आहे. इथे अन्न धान्याची कधीच कमतरता भासत नाही आणि त्यामुळे नर्मदेकाठचं वातावरणही कायम प्रसन्न आणि पॉसिटीव्ह एनर्जि देणारं असतं.
धार्मिक महत्व म्हणजे साधारणतं: जिथून या परिक्रमेला सुरवात केली जाते आणि जिथे या परिक्रमेचा शेवट होतो ते मध्य प्रदेशांतलं ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
त्यामुळे या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी सुद्धा लोकं ही परिक्रमा पूर्ण करतात आणि आध्यात्मिक कारण सांगायचं म्हटलं तर ते म्हणजे परिक्रमेच्या प्रवासादरम्यांन मिळणार मानसिक स्थैर्य.
नर्मदाकिनारी अनेक हृषीमुनी पहिल्यापासून तप करण्यासाठी येत असत असं म्हटलं जातं, हृषीमुनींचे बरेचसे आश्रमही नर्मदेकिनारी पाहायला मिळतात, पांडवांनी, शंकर महादेवांनी, पवन पुत्र हनुमानाने सुद्धा नर्मदेकाठीच तपश्चर्या केली होती अशी मान्यता आहे..
केलेली पापं धुण्यासाठी माणसाला गंगेत तीन वेळा स्नान करावं लागतं. तर त्याच कारणासाठी यमुनेत सात वेळा स्नान करावं लागतं मात्र नर्मदा मैय्याचं नुसतं दर्शन घेतल्याने सुद्धा माणसाचं पापक्षालन होतं अशी मान्यता आहे आणि म्हणूनच नर्मदा परिक्रमेचं महत्त्व अधिक आहे.
हे ही वाच भिडू :
- अयोध्येनंतर आता ज्ञानवापीच्या निकालातही ‘कार्बन डेटिंग’ महत्त्वाचं ठरु शकतंय…
- हिंदू पौराणिक कथा आणि देवी देवतांवर आधारित असूनही ब्रम्हास्त्र बॉयकॉट का होतोय?
- आत्ता जिथे सीएसटीची इमारत आहे तिथे पूर्वी मुंबादेवी मंदिर होतं