…आणि तेव्हापासून भगवान शंकराची मुलगी नर्मदा नदीची प्रदक्षिणा केली जाते

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना आईचा दर्जा देत खूप पवित्र मानलं गेलं आहे. त्यात धर्मग्रंथांनुसार सात पवित्र नद्यांचा समावेश होती. यात गंगा नदीला जास्त महत्त्व प्राप्त होतं कारण गंगा नदीला पापातून मुक्त करणारी नदी म्हटलं जातं. तर नर्मदा ही एकमेव नदी आहे जिची परिक्रमा केली जाते. नर्मदा नदीला मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनदायिनी म्हटलं जातं.

मात्र त्यातही मध्यप्रदेशमध्ये तिचा जास्त भाग येतो. मध्यप्रदेशच्या अमरकंटकमध्ये नर्मदा नदीचं उगम स्थान आहे. ज्याप्रकारे गंगा नदीला पुराणांमध्ये मोलाचे स्थान आहे, तसंच पुराणांमध्ये नर्मदा नदीच्या परिक्रमेला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. ही एकमेव अशी नाही आहे जी इतर नद्यांच्या विरुद्ध दिशेला वाहते.

पुराणात तिला ‘रेवा’ नदी म्हटलं जातं. तसंच रामायण, महाभारत आणि पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन अशा परदेशी ग्रंथातही तिचा उल्लेख आढळतो. पुराणात स्वतंत्र रेवा खंड देखील आढळतो. या नदीला भगवान शंकराची मुलगी देखील म्हटलं जातं. यामागे पौराणिक कथा अशी की, नदीचा उगम तांडव करताना महादेवांच्या घामातून झाला होता.

देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागाला विभागणाऱ्या नदीचं महत्त्व तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात आहे. तर पश्चिम दिशेला १,३१२ किलोमीटर ही नदी वाहते. या नदीच्या तीरावर प्राचीन तीर्थ स्थान आणि नगर आहेत. म्हणूनच गेल्या कित्येक शतकांपासून ही नदी भाविकांना आकर्षित करते. नर्मदा नदीची परिक्रमा करण्याची यात्रा खूप अवघड असते.

का केली जाते नर्मदा परिक्रमा?

परिक्रमेला ‘प्रदक्षिणा’ असं देखील म्हटलं जातं. साधारणतः एखादी जागा किंवा व्यक्तीच्या चारी बाजूंनी उजव्या साईडने फेरी मारण्याला प्रदक्षिणा असं म्हणतात. नर्मदा नदीची अशीच परिक्रमा केली जाते. तसं तर ही परिक्रमा का केली जाते आणि केव्हापासून याची सुरुवात झाली याबद्दल स्पष्टपणे इतिहासात दाखले उपलब्ध नाहीयेत. मात्र याबद्दल काही गोष्टींमध्ये असं सांगितल्या जातं की ऋषी मार्कंडेय यांनी सर्वप्रथम नर्मदा परिक्रमा केली होती. त्यांनी नर्मदेचं आणि तिच्या तीरावर असलेल्या सर्व तिर्थस्थानांचं माहात्म्य जाणून ही परदक्षिणा केली आणि याला पुण्याचं काम म्हटलं होतं.

तेव्हापासून त्यांचं अनुकरण करत भाविक ही प्रदक्षिणा करतात असं सांगितलं जातं. भाविक आयुष्यात शांतता लाभावी, त्यांच्या काही अपेक्षा असतील तर त्या पूर्ण व्हाव्या आणि आत्म जागृकता तसंच अध्यात्मिक ज्ञानासाठी नर्मदा परिक्रमा करतात असं म्हणतात.

कशा प्रकारे केली जाते ही नर्मदा परिक्रमा?

ही प्रदक्षिणा जवळपास दोन हजार सहाशे किलोमीटर लांब असते. यामध्ये नर्मदाकाठी असलेल्या संपूर्ण देवस्थानांचं दर्शन भाविक घेतात. ज्या ठिकाणावरून प्रदक्षिणा सुरू केली जाते त्याच ठिकाणी संपन्न होते. अमरकंटक इथे असलेल्या नदीच्या स्त्रोतापासून ही प्रदक्षिणा सुरू होते तर गुजरातमध्ये जिथे तिचा संगम होतो त्या ठिकाणाहून परत उगम स्थानावर येऊन प्रदक्षिणा संपते. अमरकंटक, ओंकारेश्वर आणि उज्जैन या तिर्थस्थानांचा यात समावेश होतो.

तसं तर प्रदक्षिना सुरू करण्याचा असा निश्चित वेळ नसतो मात्र जेव्हा भाविक संपूर्ण अंतर पार करतात तेव्हा प्रदक्षिणा पूर्ण झाली असं म्हटलं जातं. मात्र साधारणतः ही प्रदक्षिणा नोव्हेंबर महिन्यात सुरु केली जाते. तर पारंपरिक विधीनुसार प्रदक्षिणा तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसात पूर्ण करावी लागते. यादरम्यान भाविक अनवाणी पायांनी संपूर्ण अंतर पायी चालत कापतात. परंपरेनुसार लोक प्रदक्षिणा सुरू केलं की वाटेत येणारे गावं, वस्त्या, झोपड्या अशा ठिकाणी थांबून थोडा विश्राम करू शकतात.

अशी टप्प्या टप्प्याने यात्रा करावी लागते. ज्या ठिकाणी थांबू तिथे धर्म चर्चा, लोकांनां कथा सांगणं, कीर्तन, सत्संग अशा गोष्टी केल्या जात. म्हणजे संपूर्ण यात्रेत मन स्थिर आणि आध्यात्मिक तसंच सकारात्मक विचारांनी भरून ठेवायचं. यादरम्यान अनेक पथ्य असायची ज्यांचं कठोर पालन त्यांना करावं लागायचं.

या परिक्रमेदरम्यान ते नर्मदा नदीला पार करू शकत नाहीत. मनात द्वेषाची भावना आणायची नाही,अगदी निर्विकार भावनांनी प्रदक्षिणा करायची. केस कापायचे नाहीत. गृहस्थ चातुर्मासात प्रदक्षिणा करू शकत नाहीत. या दरम्यान कुणी दान दिलं तर ते घेऊ नये. स्वतः सोबत जास्त सामान घेऊन यात्रा सुरु करू नये. स्नान आणि पिण्यासाठी नर्मदेच्या पाण्याचा वापर करावा. आणि परिक्रमा जिथून सुरु केली तिथेच संपन्न होईल. परिक्रमा झाल्यावर भगवान शंकराचा अभिषेक करावा, अशा अनेक नियमांचा यात समावेश होतो.

मात्र आता परिस्थिती बदलली आहे. तरी देखील या प्रदक्षिणेला तेवढंच महत्त्व आहे. तेव्ह अनेक भाविक आजही प्रदक्षिणा करतात मात्र नवीन तंत्रज्ञनाचा वापर यात केला जातो. अनवाणी पायांनी जरी भाविक यात्रा करत असले तरी गाड्यांचा वापर प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी केला जातो.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.