राजकारणातून संन्यास घ्यायला लागलेल्या नेत्याने थेट पंतप्रधान म्हणून पुनरागमन केलं

१९८९ च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत त्यांनी प्रचंड बहुमत मिळवलं होतं. त्यांचा पाच वर्षांचा कारभार सकारात्मक होता, तरुण पंतप्रधान आयटी क्रांती द्वारे देशाला एकविसाव्या शतकाकडे घेऊन जात आहे असं चित्र जगापुढे होते होतं. मात्र अचानक एक बॉम्ब पडला आणि राजीव गांधी सरकार त्याचा सामना करू शकलं नाही.

तो आघात होता बोफोर्स तोफ घोटाळ्यांच्या आरोपाचा.

राजीव गांधी यांच्या विरुद्ध एकेकाळचे त्यांचेच सहकारी व्ही.पी.सिंग यांनी जोरदार मोहीम हाती घेतली. ८९च्या निवडणुकीत या आरोपांचा काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यांचे अनेक खासदार पराभूत झाले. १९७ संख्येनिशी काँग्रेस सर्वात मोठी पार्टी ठरली मात्र त्यांच्याकडे सत्ता स्थापनेएवढं संख्याबळ नव्हतं.

शेवटी जनता पक्षाच्या पाठिंब्यावर व्ही.पी.सिंग पंतप्रधान बनले.

त्याकाळात राजीव गांधींच्या सर्वात जवळच्या सहकाऱ्यांमध्ये नाव घेतलं जायचं पी.व्ही.नरसिंह राव यांचं. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय सांभाळलेल्या नरसिंह राव यांनी राजीव गांधींच्या काळात शिक्षण मंत्री म्हणून चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी सुरु केलेली नवोदय विद्यालये संपूर्ण देशभरात पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखली जायची.

सतरा भाषांचे जाणकार असलेले पीव्ही नरसिंह राव काँग्रेसमध्ये बृहस्पती म्हणून ओळखले जायचे. त्यांचा संपर्क संपूर्ण देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये होता. म्हणूनच ते खासदारकीला महाराष्ट्रातील रामटेक येथे उभे राहायचे आणि निवडून देखील यायचे. 

१९८९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक मोठमोठे नेते पराभूत झाले पण नरसिंह राव मात्र निवडून आले. सत्ता गेल्यामुळे अनेक काँग्रेस नेत्यांची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशांप्रमाणे झाली होती. नरसिंह राव मात्र स्थिप्रज्ञ होते.

मंडल अयोग लागू करणाऱ्या जनता दलाचे व्ही. पी.सिंग सरकार फार काळ टिकले नाही. त्यांच्या नंतर जनता दलाच्याच चन्द्रशेखर यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. काँग्रेसने या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. पण एका मामुली कारणामुळे राजीव गांधी व चंद्रशेखर यांच्यात गैरसमज झाले आणि हे सरकार देखील कोसळलं.

१९९१ साली पुन्हा निवडणूक जाहीर करण्यात आल्या.

राजीव गांधी नव्या ऊर्जेने या मध्यावधी निवडणुका जिंकण्यासाठी तयारीने उतरले. मागच्या वेळी झालेल्या चुका रीपीट करायच्या नाहीत हे त्यांनी मनाशी ठरवलं होतं. जुन्या कालबाह्य झालेल्या नेत्यांची तिकिटे नाकारण्यात आली. ताज्या दमाने राजीव गांधी प्रचाराला उतरले.

ज्या जुन्या नेत्यांची तिकिटे कापली होती त्यात एक नाव होतं पीव्ही नरसिंह राव यांचं 

राजीव गांधींचे खंदे समर्थक असलेल्या नरसिंह राव यांचं तिकीट कापल्यामुळे कित्येकांना धक्काच बसला. नरसिंह राव यांचे स्वीय सहायक राम खांडेकर हे आपल्या एका लेखात म्हणतात,

१९९१ च्या मेमध्ये लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्या आधीच्या दोन वर्षांत नरसिंह रावांच्या जीवनात आणखी एक गोष्ट घडली होती. त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती. महत्त्वाचे म्हणजे, नरसिंह रावांना त्यांची काँग्रेस कुठेच दिसत नव्हती. बहुतेकांमध्ये स्वार्थासाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती, हेवेदावे, सत्तासंघर्ष हेच प्रामुख्याने दिसत होते. यामुळे नरसिंह राव कष्टी होतेच; आता तर त्यांना प्रकृती अस्वास्थ्याचे कारणही मिळाले होते.

१९९१ च्या निवडणुका न लढवण्याचा आपला निर्णय नरसिंह रावांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्याने राजवजींनी तो मान्यही केला.

मात्र राजीव गांधींनी नरसिंह रावांना दिल्लीच्या मुख्यालयात प्रचार यंत्रणेसाठी उघडलेल्या विभागाची जबाबदारी मात्र दिली होती. गेल्या कित्येक वर्षांप्रमाणे काँग्रेसचा प्रचाराचा जाहीरनामा नरसिंह रावंच बनवत होते. पण तरीही त्यांची राजकीय संन्यासाची तयारी सुरु होती. अनेकजण दावा करतात की हा संन्यास त्यांच्यावर लादलेला होता.

ते काहीही असलं तरी या काळात त्यांनी हळूहळू आपली पुस्तके, सामान वगैरे हैदराबादला पाठवण्यास सुरुवात केली होती. 

राव या निवडणुकीपासून दूर होते मात्र ते आधी ज्या रामटेक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते, तिथल्या उमेदवाराने त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांनी दोन दिवसांसाठी तरी मतदारसंघात प्रचारासाठी यावे असा आग्रह धरला होता. नरसिंह राव यांनी हा आग्रह मान्य केला आणि दिल्लीतील काम संपवून शेवटचे दोन दिवस (२० व २१ मे) ते प्रचारासाठी रामटेकला गेलेसुद्धा!

२१ मे हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचारसभा आटोपून नरसिंह राव नागपूरला परतले.

साडेदहा वाजता ते नागपूरचे सर्किट हाऊस असलेल्या रविभवनला परतले. ते थकले होते म्हणून ताबडतोब झोपण्यास गेले. खांडेकर यांची बेडरूम त्यांच्याच शेजारी होती. ते दुसऱ्या दिवशीची तयारी करत होते.

एवढय़ात फोनची घंटी खणखणली. तिथे सहसा फोन येत नसे आला तर फक्त दिल्लीवरून. तरीही खांडेकर यांनी उचलला.

पलीकडे बोलणाऱ्याने बातमी सांगितली. ही बातमी जबरदस्त धक्का देणारी होती,

‘राजीव गांधी असॅसिनेटेड’!

नरसिंह रावांना उठवून ही बातमी सांगणे अवघड होते, पण पर्याय नव्हता. खांडेकरांनी कसेतरी धाडस केले,

‘‘साहेब, एक दु:खद बातमी सांगायची आहे. राजीवजींच्या हत्येची..’’

खांडेकरांचे ते शब्द ऐकताच कधी नव्हे ते मूर्ख आहात का असे शब्द नरसिंहरावांच्या तोंडून बाहेर पडले.

नरसिंह राव यांची अवस्था पाहून खांडेकर तर घाबरलेच होते. काहीच सुचेना. ते तयार होऊन येईपर्यंत सिव्हिल सर्जनला फोन करून सर्व परिस्थितीची कल्पना देऊन डॉक्टर व रुग्णवाहिका पाठवून देण्यास सांगितले.  नरसिंह राव आवरून बाहेर आले आणि म्हणाले,

‘‘आता सविस्तर सांगा काय झाले ते.’’

तेवढय़ात, मीडियामधून पुन्हा फोन आला. त्यांनी तोपर्यंत आलेली सविस्तर बातमी राव यांना सांगितली. ते ऐकून त्यांच्या तोंडून केवळ इतकेच शब्द निघाले,

‘‘देशाचे फार नुकसान झाले आहे.’’

अनेक कार्यकर्ते, आमदार हळूहळू जमा झाले. जवळपास तासभर चर्चा सुरू होती. नरसिंह राव बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांना रात्रीच दिल्लीला जायचे होते पण खास विमानाची सोय होऊ शकली नव्हती.

त्याकाळी नागपूरमध्ये पत्रकारिता करत असलेले जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर आपल्या आठवणींमध्ये सांगतात,

आम्ही पोहोचलो तर चुरगळलेले धोतर नेसलेले आणि बंडी घातलेले रावसाहेब एका सोफ्यावर बसलेले होते. शेजारी तांब्याचा तांब्या-फुलपात्र होते. रणजित देशमुख, याकुब नावाचा मुंबईचा पत्रकार तेथे होते. जीव गेल्यागत विजेने प्रकाशलेल्या खोलीत नजरेत भरला तो रावसाहेबांचा म्लान चेहेरा आणि कपाळावर आठ्यांचे जाळे.

दिल्लीला लगेच कसे जाता येईल यासाठी त्यांची आणि रणजित देशमुखांची फोनाफोनी सुरु होती. रवी भवनच्या ऑपरेटरने डायरेक्ट लाईनही दिलेली नव्हती..सरकारी संथ लयीत ऑपरेटर फोन लावून देत होता.

अखेर नरसिंह राव यांना त्यांचा अतिशय घरोबा असलेल्या एन पी के साळवे यांच्याकडे मुक्कामासाठी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ७.४० च्या विमानाने ते दिल्लीला पोहचले. तिथून नरसिंह राव सरळ सोनियाजींना भेटण्यास गेले. तिथे पक्षाचे अनेक नेतेसुद्धा अगोदरच पोहोचले होते.

राजीवजींचे पार्थिवही दिल्लीत पोहोचले होते. ते तीन मूर्ती इथे लोकांच्या दर्शनासाठी ठेवल्यानंतर नरसिंह राव घरी आले.

राम खांडेकर सांगतात त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख, उदासी स्पष्ट दिसत होती. नवीन पक्षाध्यक्ष निवडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या, परंतु त्यात गती नव्हती. चर्चा सुरू झाल्या. पक्षाध्यक्ष नेमण्याची घाई यासाठी की, राजीवजींच्या मृत्यूमुळे पुढे ढकलल्या गेलेल्या काही लोकसभेच्या जागांसाठी प्रचाराची रूपरेषा तातडीने आखण्याची गरज होती.

राजीवजींच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या काही परदेशी प्रतिनिधींनी परत जाण्यापूर्वी २५ तारखेला सकाळी नरसिंह रावांची भेट घेऊन सहवेदना व्यक्त केलीच; परंतु इतर गोष्टींबाबतही चर्चा केली. तोवर अध्यक्षपदी त्यांची निवडही झाली नव्हती, पण अध्यक्ष नरसिंह रावच होतील अशी त्या परदेशी प्रतिनिधींची खात्री असावी.

देशाची आर्थिकच नव्हे, तर सर्व क्षेत्रांतील परिस्थिती गंभीर, चिंताजनक होती. त्यातून बाहेर येण्यासाठी सक्षम आणि खंबीर व्यक्तीची निवड होण्याची गरज होती. या पदासाठी काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून अध्यक्षपदाच्या घोडय़ावर आरूढ होण्यास सज्ज होते.

मात्र, नरसिंह राव यात नव्हते. ते शांत राहून चर्चा ऐकत होते.

काँग्रेसचा अध्यक्ष हाच पुढे देशाचा पंतप्रधान होणार याची सगळ्यांना खात्री होती. अर्जुन सिंह, एन डी तिवारी, शरद पवार असे अनेक नेते जीवापाड प्रयत्न करत होते. पण सर्वाधिक खासदारांचा पाठिंबा अनुभवी असलेल्या पीव्ही नरसिंह राव यांच्याच पाठीशी होता.

शेवटी राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी यांना मत विचारण्यात आलं आणि त्यांनीही नरसिंह राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. सर्व विरोध शांत होऊन नरसिंह राव अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे अध्यक्ष बनले. 

काही काळापाठीमागे राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार करत असलेले राव कोणाच्या ध्यानी मनी नसताना निकालानंतर देशाचे पंतप्रधान झाले.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आंध्रचे मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात गृह, सरंक्षण,परराष्ट्र यासारखी महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद भूषविलेल्या रावसाहेबांना काँग्रेसने १९९१च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीही दिलेली नव्हती ! आम्ही पोहोचलो तर चुरगळलेले धोतर नेसलेले आणि बंडी घातलेले रावसाहेब एका सोफ्यावर बसलेले होते. शेजारी तांब्याचा तांब्या-फुलपात्र होते. रणजित देशमुख, याकुब नावाचा मुंबईचा पत्रकार तेथे होते. जीव गेल्यागत विजेने प्रकाशलेल्या खोलीत नजरेत भरला तो रावसाहेबांचा म्लान चेहेरा आणि कपाळावर आठ्यांचे जाळे . दिल्लीला लगेच कसे जाता येईल यासाठी त्यांची आणि रणजित देशमुखांची फोनाफोनी सुरु होती. रवी भवनच्या ऑपरेटरने डायरेक्ट लाईनही दिलेली नव्हती..सरकारी संथ लयीत ऑपरेटर फोन लावून देत होता.

बहुदा तेव्हा गिरीश गांधी हेही तिथे होते किंवा आम्ही निघत असतानाच आले असावे…असे काहीसे आठवते, पण ते असो. ज्यांना दिलीला जाण्यासाठी लगेच विमान मिळत नाही तो हा माणूस उद्या देशाचा पंतप्रधान होणार असल्याचे विधीलिखीत लिहिले गेलेले आहे याचा पुसटसाही संकेत आम्हाला मिळालेला नव्हता

Leave A Reply

Your email address will not be published.