सरकारी पैसे वाचावेत म्हणून पंतप्रधान स्वतः दुकानात जाऊन कॉम्प्युटरच्या फ्लॉपी खरेदी करायचे..

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. परदेशात शिकून आलेले तरुण राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले होते. त्यांना टेक्नॉलॉजीची प्रचंड आवड होती. त्यांनीच प्रयत्न केल्यामुळे भारतात संगणकाचे युग सुरु झाले. टेलिकम्युनिकेशन क्रांती झाली.

भारताच्या प्रत्येक व्यक्तीला कॉम्प्युटर हाताळता यायला पाहिजे हे राजीव गांधींचे स्वप्न होते. याची सुरवात प्रशासनापासून त्यांनी केली होती. प्रत्येक कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने इतकेच काय मंत्र्यांनी देखील संगणक शिकून घ्यावा असा त्यांचा आग्रह होता.

या वयात संगणक शिकावे लागत असल्यामुळे कित्येकजण नाराज असायचे. अनेकांनी फक्त औपचारिकता म्हणून या शिकवण्या लावल्या होत्या. फक्त एक माणूस होता जो वयाच्या साठीतही उत्साहाने कॉम्प्युटर शिकण्याच्या मागे लागला होता.

ते होते भारताचे तत्कालीन मानव संसाधन मंत्री पी.व्ही.नरसिंहराव

स्वातंत्र्यलढ्यापासून राजकारणात असलेले नरसिंहराव हे काँग्रेसचे बृहस्पती म्हणून ओळखले जायचे. त्यांचा परराष्ट्र धोरण, आर्थिक नियोजन, राज्यशास्त्राचा अभ्यास दांडगा होताच, पण ते तेलगू, हिंदी, कन्नड , मराठी इंग्रजी सोबतच फ्रेंच व इतर युरोपियन भाषांचे जाणकार होते. नाविन्याची त्यांना आवड होती.

येणारे नवे सहस्त्रक हे संगणकाचे असणार आहे आणि आपल्याला तरुणांच्या स्पर्धेत मागे राहायचे नाही हे रावांनी मनाशी पक्के ठरवले होते. त्यांनी म्हणूनच कॉम्प्युटर कसा असतो हे शिकून घेतलं आणि त्याचा वापर देखील सुरु केला.

एकदा एका सांस्कृतिक संस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी नरसिंह राव प्रतिनिधी मंडळासह मॉरिशसला गेले होते. मुंबई-मॉरिशस या पाच तासांच्या प्रवासाचे विमान कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर, तर परतीचे कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी होते.

पूर्वी परराष्ट्र मंत्रालयाचा एक अलिखित नियमच होता, की केंद्रीय मंत्र्याने परदेश दौऱ्यात आपल्याला फुरसत आहे असे दाखवायचे नसते. दिल्लीत प्रत्येक देशातील दूतावासाचा एक वार्षिक दिवस असतो आणि परराष्ट्रमंत्री वा तत्सम मंत्री भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्या वेळी राजशिष्टाचार अधिकारी त्या मंत्र्याला किती वाजता पोहोचायचे व किती मिनिटांनी निघायचे, हे अगोदरच सांगतो व तिथे त्याचा पाठपुरावा करतो.

कार्यक्रमाच्या दिवशीच पोहोचायचे म्हणून नरसिंह राव रात्री मद्रासला गेले आणि दुसऱ्या दिवशी सिंगापूर मार्गे मॉरिशसला गेले. सिंगापूरला विमान बदलायचे असल्यामुळे साडेतीन तासांचा अवधी होता.

आता मधल्या वेळात काय करायचं म्हणून भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री नरसिंह राव तेथील आपल्या राजदूतांसमवेत एका मोठय़ा मॉलमधील कॉम्प्युटर विक्री करणाऱ्या दुकानात गेले.

तिथे ते जवळपास अडीच तास होते.

त्यांचे तेव्हाचे स्वीय सचिव राम खांडेकर यांनी आपल्या पुस्तकात हा किस्सा सांगितला हे. ते म्हणतात,

 मी दर १५-२० मिनिटांनी मॉलमध्ये फिरून परत यायचो, तर यांची बैठक तिथेच! अडीच तास घालवून त्यांनी काही कम्प्युटरचे स्पेअरपार्ट आणि पंधरा वीस फ्लॉपी खरेदी केली. सर्व सामान घेऊन आम्ही हॉटेलमध्ये गेलो.

राम खांडेकर यांनी स्वतः देखील आपल्या मुलाच्या आग्रहामुळे एक व्हीसीआर खरेदी केला. त्यांनी  राजशिष्टाचार अधिकाऱ्याला एक सूटकेस काढून त्यात हे सर्व सामान भरायला सांगितले आणि नरसिंह राव यांच्या फ्लॉपीसारखे नाजूक सामान व्यवस्थित हातातील ब्रिफकेसमध्ये ठेवले.

ते सांगतात त्या वेळी भारतात व्हीसीआरची किंमत चाळीस-पन्नास हजार होती, तिथे केवळ पाच हजारला मिळाला. नरसिंह रावांनी सर्व वस्तू नीट ठेवल्याची व राजदूतांना पैसे दिल्याची खांडेकर यांच्याकडून खात्री करून घेतली.

मात्र त्या दुकानदारासकट अनेकांना भारताचे एवढे दिग्गज मंत्री स्वतः फ्लॉपी विकत घेण्यासाठी दुकानात कसे आले याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते.

पुढे सिंगापूर वरून मॉरिशसची त्यांची फ्लाईट आली. विमानात बसल्यानंतर थोडी फुरसत मिळाली तेव्हा नरसिंह रावांनी खांडेकरांना बोलावून घेतले आणि जोरका धक्का धीरेसे दिला. त्यांनी आपण स्वतः या दुकानात खरेदी का केली हे त्यांना सांगितलं.

 कॉपी केलेल्या फ्लॉपीज् इतर देशांत किती किमतीत करून देतात, तसेच कोणत्या फ्लॉपीज्ची कॉपी सिंगापूर सोडून इतर देशांत होत नाही, हे सर्व त्यांनी नीट समजावून सांगितले.

खांडेकरानीं कधी छोटे कॉम्प्युटर पाहिलेलेच नसल्यामुळे मान डोलावण्यापलीकडे ते काही करू शकले नाहीत. ते म्हणतात,

”  नरसिंह रावांचा हा अभ्यास १९८६-८७ सालचा.. म्हणजे देशात संगणक येण्यास सुरुवात झाली होती तेव्हाचा! देशाला असा विद्वान, सर्वज्ञानी शिक्षणमंत्री मिळाला आणि सखोल अभ्यास करून नवीन शिक्षण धोरण अमलात आणले गेले हे देशाचे भाग्यच नाही का?”

पीव्ही.नरसिंहराव यांनी हि प्रथा पंतप्रधान झाल्यानंतर ही चालवली. देशाची संपत्ती ही मंत्र्यांची खाजगी मालमत्ता नाही हे आपल्या कृतीतुन सिद्ध करणारे नरसिंहराव यांच्या सारखे नेते आजच्या घडीला दुर्मिळ झाले आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.