नरसिंह रावांनी मनमोहनसिंग यांना सांगितलं होतं, “यश मिळालं तर आमचं, अपयशाचे धनी तुम्ही!”

आज भारताने जागतिकीकरण स्वीकारले याला ३० वर्षे पूर्ण झाली. २४ जुलै १९९१ रोजी भारताचे तेव्हाचे अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारणारं ऐतिहासिक अर्थसंकल्प लोकसभेत मांडले होते.

या जागतिकीकरणामुळे भारताच्या फक्त अर्थकारणातच नाही तर समाजकारणात, राजकारणात अमुलाग्र बदल घडून आला.

भारताचा इतिहास नव्याने लिहायचा झाला तर १९९१ पूर्वीचा भारत आणि १९९१ नंतरचा भारत असे सरळ सरळ दोन भाग करता येतील. या क्रांतीचे जनक होते डॉ. मनमोहनसिंग!!

डॉ. मनमोहन सिंग हे खरे तर अर्थकारणी. त्यांचा आणि राजकारणाशी थेट संबंध कधी आला नव्हता. भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशा देशाच्या अर्थव्यवस्थेशी थेट संबंध येणाऱ्या पदांवर त्यांनी काम केलं होत.

पण त्यांचा राजकारणात प्रवेश तेव्हाचे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्यामुळे झाला.

राजीव गांधींच्या अकाली मृत्यूनंतर सोनिया गांधीनी राजकारणात येण्यास नकार दिला, कॉंग्रेसमध्ये अनेक मोठे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. पण योगायोगाने नेतृत्व आलं निवृत्त झालेल्या पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कडे.

नरसिंहराव हे कॉंग्रेसचे जुने जाणते नेते. एकेकाळचे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री. इंदिरा गांधींच्या काळात त्यांनी देशाच गृहमंत्रीपद भूषवल होत. परराष्ट्रव्यवहार, नियोजन, अर्थ या सगळ्या विषयांवर त्यांचा अभ्यास मोठा होता. अनेक भाषा जाणणारे नरसिंहराव जनतेची नस पकडण्यात देखील वाकबगार होते.

नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने केंद्रात सत्तेत पुनरागमन केलं. 

तो काळ मोठा धामधुमीचा होता. सरकारी तिजोरी रिकामी पडली होती, डॉलरची गंगाजळी आटली होती. चलनवाढीचादर १७% वर पोहचला होता. पंजाब मधील दहशतवाद अजून संपला नव्हता. रामजन्मभूमीचे आंदोलन पेटले होते.

राव पंतप्रधान बनले खरे पण त्यांच्या जवळ बहुमत अगदी काठावरचे होते. कॉंग्रेसमधलेच अनेक नेते त्यांना घालवून पंतप्रधान बनण्यास उत्सुक होते. एवढी वर्ष राजकारण कोळून पिलेल्या नरसिंहराव यांनी मात्र मंत्रीमंडळाची रचना एवढी चातुर्याने केली की कोणाला बंड करण्याचे सामर्थ्य मिळू नये.

त्यांचे विरोधक असणाऱ्या अर्जुनसिंह, माधवराव शिंदे यांना कमी महत्वाची खाती दिली होती, एन.डी.तिवारी यांना मंत्रीमंडळात स्थान दिले नव्हते, पवारांना संरक्षण तर शंकरराव चव्हाण यांना गृह खाते दिले.

मुख्य प्रश्न अर्थमंत्रालयाचा होता. खर तर जुने अनुभवी अभ्यासु नेते असलेले प्रणव मुखर्जी यांची या पदासाठी दावेदारी ठरली असती. पण नरसिंहराव यांनी सगळ्यांना चक्रावणारा निर्णय घेतला.

राजकारणाबाहेरच्या डॉ. मनमोहनसिंग यांना हे पद द्यायचे.

मनमोहन सिंग यांना त्यांनी हे पद स्विकारण्यासाठी तयार कसे केले याचा सुद्धा एक किस्सा प्रसिद्ध आहे. 

नरसिंहराव यानी मनमोहनसिंग यांच्या सोबत पूर्वी काम केलं होत. त्यांना माहित होत की भारताचा अर्थमंत्री होण्यासाठी ते तयार होणार नाहीत. म्हणून त्यांना मनवायला जयराम रमेश यांना त्यांच्या घरी पाठवल.

रात्रीचे १० वाजून गेले होते. तो पर्यंत मनमोहनसिंग यांना या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे जेवण करून ते झोपी गेले होते. जयराम रमेश त्यांच्या घरी पोहचले तेव्हा सिंग यांच्या असिस्टंटने त्यांना सांगितल,

“जाइये, अभी सर सो रहे हैं. और हां, अब सर कहीं काम नहीं करेंगे. डिस्टर्ब मत करिए. सर कल ही फ्लाइट से आए हैं. बहुत थके हैं.” 

जयराम रमेश कोड्यात पडले. ते घेऊन आले होते तो निरोप अगदी गोपनिय होता यामुळे त्या असिस्टंटला सांगूनही उपयोग नव्हता. त्याच्याशी थोडी हुज्जत घातली पण असिस्टंट मनमोहन सिंग यांना न उठवण्यावर ठाम होता. अखेर जयराम रमेश तेथून परत आले.

पुन्हा पहाटे ५ वाजता त्यांनी मनमोहन सिंग यांना फोन केला. यावेळी खरच काही तरी इमर्जन्सी आहे हे जाणवून पीएने सिंग यांना उठवलं व त्यांच्याकडे फोन दिला. जयराम रमेश यांनी त्यांना फोनवरच अर्थमंत्री होण्याबद्दलच सगळ सांगितल.

ही ऑफर ऐकून झोपेत असलेल्या मनमोहन सिंग यांनी अच्छा एवढाच रिप्लाय दिला आणि फोन ठेवला.

त्यादिवशी मनमोहनसिंग यांनी संपूर्ण विचार केला. राजकारणात जाणे, तिथले छक्केपंजे हे त्यांच्या प्रकृतीला झेपणारे नव्हते. पण देश आर्थिक संकटात सापडला होता, आपला एवढ्या वर्षाचा अनुभव, ऑक्सफर्डमधले गोल्ड मेडल, अर्थशास्त्राचा अभ्यास जर देशाच्या काम येणार नसेल तर काय उपयोगाचा? अस म्हणून त्यांनी अखेर अर्थमंत्री पदाच हलाहल स्वीकारायचं ठरवलं.

जेव्हा त्यांची पंतप्रधानांशी भेट झाली तेव्हा सगळ सविस्तर बोलण झाल. मनमोहनसिंग यांना नरसिंहराव यांनी संपूर्ण मोकळीक दिली होती. त्यांच्या कारभारात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही यांचे आश्वासन दिले. फक्त एकच अट घातली,

“आपण आर्थिक उदारीकरणासारखं मोठ पाऊल उचलतोय. ते जर यशस्वी झाल तर याच क्रेडीट आमच आणि जर ते अपयशी ठरल तर ते श्रेय फक्त आणि फक्त तुमच्या माथ्यावर टाकण्यात येईल.”

ही राजकारणाची अपरिहार्यता होती. तेव्हाचा भारत समाजवादी विचासरणीच्या पगड्याखाली होता. अर्थव्यवस्था खुली करणे हे अनेकांना पटणार नाही, त्याचा महाप्रचंड विरोध होणार डाव्या उजव्या पक्षांबरोबरच कॉंग्रेसमधूनही या निर्णयाविरुद्ध आगपाखड होणार हे नरसिंहराव यांनी गृहीत धरलं होत.

तरीही ते धाडस त्यांनी करायचं ठरवलं होत फक्त जर ते चुकल तर त्याचा बळीच बकरा बनणार होते मनमोहन सिंग.

डॉ. मनमोहन सिंग यांचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास खूप मोठा होता व स्वतःवर विश्वास देखील  प्रचंड होता. त्यांनी ही रिस्क घेतली. नरसिंहराव यांनी मनमोहनसिंग यांच्या प्रत्येक निर्णयाला खंबीर पाठींबा दिला.

या दोघांनी अत्यंत आणिबाणीच्या प्रसंगी सगळे विरोध पचवून भारताच्या अर्थव्यवस्थेची नौका दलदलीतून बाहेर काढण्याचा पराक्रम केला. आज आपण जागतिकीकरणाची बरीवाईट फळे चाखतो त्याच श्रेय नरसिंहराव यांच्या दूरदृष्टीला व डॉ.मनमोहनसिंग यांच्या शिस्तबध्द अभ्यासपूर्ण अंमलबजावणीला जात हे नक्की.

मात्र आजही मनमोहनसिंग आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात,

“आर्थिक सुधारणांचे खरे जनक पी.व्ही.नरसिंहराव हे होते.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.