पंतप्रधानांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न पडायचा, “ये खांडेकर कौन है?”

हा किस्सा आहे पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असतानाचा..

पंतप्रधानांना त्यांच्या जुन्या बंगल्यावर सतत येऊन भेटणाऱ्या एका मित्राचा पंतप्रधानांच्या स्वीय साहाय्यकाच्या खोलीत फोन आला. त्याने नरसिंह रावांना फोन जोडून देण्यास सांगितला. तेव्हा स्वीय साहाय्यक म्हणाले,

‘‘ठहरो, खांडेकर साहब से पुछते है.’’ ​

पलीकडची व्यक्ती रागात म्हणाली,

‘‘खांडेकर कौन होता है?”

ज्यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी आज सर्व माध्यमांमध्ये पसरली आहे, ज्यांनी आपली कारकीर्द अशा दोन नेत्यांसोबत व्यतीत केली ज्यांच्यामुळे देशाला कलाटणी मिळाली. त्यापैकी एक यशवंतराव चव्हाण आणि दुसरे नरसिंहराव.

त्यापैकीच पंतप्रधानपदी नरसिंहराव यांचे अत्यंत विश्वासपात्र म्हणून त्यावेळेस राम खांडेकरांची ओळख होती. नरसिंहरावांच्या कारकिर्दीत देशात अनेक घडामोडी घडल्या.अनेक ऐतिहासिक निर्णय झाले. राम खांडेकर त्या निर्णयांचे साक्षीदार होते.

तर खांडेकर कोण होते,कसे होते हे त्यांच्याच आठवणीतून…

पंतप्रधानांना स्वतःचे मोजे घालायला देणारा राम..

नरसिंह राव पंतप्रधान असताना तीन दिवसांच्या इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी सकाळी १० वाजता राणी एलिझाबेथशी पंतप्रधानांची भेट ठरली होती. नरसिंह रावांची बकिंगहॅम पॅलेसला जाण्याची तयारी सुरु होती.  खांडेकरांनी सहज त्यांच्या बेडवर ठेवलेल्या कपड्यांकडे नजर टाकली. त्यातले एक गोष्ट त्यांना खटकली. पंतप्रधानांच्या कपड्यांशी त्यांचे मोजे मॅच होत नव्हते. पण हे त्यानं सांगायचं कस? तरीही हिंमत एकवटून खांडेकर म्हणाले,

‘‘तुमचे मोजे सूटला मॅच होत नाहीत. आणि राणीला भेटावयास जायचे असल्याने ते बदलून याल का?,’’

हि आठवण सांगताना खांडेकर म्हणतात, त्यावेळी पंतप्रधानांच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून तर मी पुतळ्यासारखा स्तब्धच झालो. काही सुचेचना. नरसिंहरावांचे उत्तर होते,

‘माझ्याकडे दुसरे मोजे नाहीत. हेच आहेत.’’

राम खांडेकर मग पंतप्रधानांचे सचिव असलेल्या दामोदरन् यांच्याकडे गेले आणि पाचएक मिनिटे काही बोललेच नाहीत. हे पाहून त्यांनी विचारले,

‘‘अरे, क्या हुआ?’’

खांडेकरांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं. पंतप्रधानांचे उद्गार ऐकून त्यांनासुद्धा हसावे की रडावे, हे समजत नव्हते. अखेर राम खांडेकरांनीच आपल्या खोलीत जाऊन स्वतःजवळचे नवीन मोजे त्यांना दिले. सुदैवाने ते मॅच होत होते. ते सांगतात,

“नरसिंह रावांकडे गेल्यापासून त्यांच्या स्वभावाची आणि प्रवृत्तीची पारख करत गेल्याने कपडय़ांच्या बाबतीतील असा प्रकार होण्याची शक्यता गृहीत धरून बूट सोडून इतर कपडय़ांचा एक संच मी कार्यालयात व प्रवासात सदैव माझ्याजवळ बाळगत असे.”

पंतप्रधानांच्या खिशात हळूच पैसे कोंबणारा राम..

राम खांडेकरांनी नरसिंहराव यांच्या साधेपण बद्दल आणखी एक आठवण सांगितली आहे.

“कपडय़ांप्रमाणेच पैशाचेही! त्यांच्या खिशात कधीच एक पैसाही नसे. एकदा ते पंतप्रधान असताना आम्ही अजमेर दर्ग्यात दर्शनासाठी गेलो होतो. तिथे दोन दर्गे होते. मोटारीतून उतरल्याबरोबर हळूच मी दोन्ही ठिकाणी टाकायचे पैसे निरनिराळे करून त्यांच्या खिशात ठेवले आणि त्यांना समजावूनही सांगितले.”

पहिल्या दर्ग्याचे दर्शन घेऊन पाच-दहा मिनिटांनी पुढच्या दर्ग्याच्या दर्शनाला गेलो, तर रावांनी मला जवळ बोलावून सांगितले की,

‘‘मी दोन्हीकडचे पैसे तिथेच टाकून दिले.’’

बाजूला जाऊन पुन्हा माझ्याजवळचे पैसे काढून त्यांच्याजवळ जाऊन कोणाच्या नकळत मी त्यांच्या खिशात टाकले. कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा रीतीने अशी कामे करावी लागत असल्याने मला नेहमी त्यांच्या जवळूनच चालावे लागत असे. त्यांनाही इतकी सवय झाली होती, की काही देणेघेणे असले की मागे न पाहताच ते हात करीत.

नरसिंह रावांच्या मुलीने केलेल्या प्रतापाबद्दल खांडेकर लिहितात,

पंतप्रधानपद गेल्यानंतर नरसिंह राव पूर्वीच्या – म्हणजे ‘९, मोतीलाल नेहरू मार्गा’वर राहण्यास आले, तेव्हा तेथे चपराशांना राहण्यासाठी असलेल्या खोल्यांपैकी दोन खोल्या खांडेकरांनी स्टोअर रूमसाठी घेतल्या होत्या. नरसिंह रावांना मिळालेली उपरणे, शाली, शेले आदी सर्व भेटवस्तू या ठिकाणी ठेवल्या होत्या. तसेच इतर पुस्तके, कागदपत्रेही होती.

एकदा पी.व्ही. नरसिंह राव वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार होते. तेव्हा त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांची मुलगी हैद्राबादवरुन दिल्लीला आली. नरसिंह राव जाण्यापूर्वी पूर्ण तपासणी करण्यासाठी ‘एम्स’मध्ये दाखल होते.

त्यावेळी कोणत्यातरी खासगी सचिवाने त्या मुलीला सांगितले की, खांडेकर येथील सामान घेऊन जातात. त्या मुलीने हे ऐकून कुलुपांवर सही केलेला कागद चिकटवला आणि निरोप ठेवला की

‘माझ्या परवानगीशिवाय कोणीही खोली उघडायची नाही.’

जेवण करून राम खांडेकर बंगल्यावर गेल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या नजरेस आणण्यात आली. ते कुलूप व त्यावरील निरोप वाचून खांडेकरांना अपमानित झाल्याप्रमाणे वाटलं. कसलाही विचार न करता त्यांनी सरळ चार महिन्यांची सुट्टी व नंतर नोकरीचा राजीनामा नरसिंह रावांच्या नावे लिहला व घरी निघून आले. खासगी सचिव मंडळींना ही अपेक्षा नसावी !

राम खांडेकर आपल्या आठवणींमध्ये सांगतात,

“हा अपमान सहन न होऊन माझा  रक्तदाब खरोखरच एकदम वाढला होता. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जावे लागले होते आणि विश्रांतीचा सल्ला मिळाला होता.”

नरसिंह रावांना अर्ज मिळताच त्यांनी राम खांडेकरांना बोलावणे पाठवले.

त्यांनी निरोप दिला, ‘मला बरं नाही म्हणून येणे शक्य होणार नाही.’

दोन दिवस राम खांडेकर न गेल्यामुळे नरसिंह रावांनी परत निरोप पाठवला की,

‘‘खांडेकरांना सांगा, त्यांना शक्य नसेल तर मी उद्या जाण्यापूर्वी येऊन जाईन.’’

हा त्यांचा मोठेपणा झाला पण खांडेकरांच्या दृष्टीने हे योग्य नव्हते. नाइलाजाने ते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याकडे गेले. सुदैवाने ती मुलगीसुद्धा तिथे होती. नरसिंह रावांनी विचारले,

‘‘हे काय आहे?’’

राम खांडेकर म्हणाले,

‘‘माझ्या निष्ठेबद्दल, इमानदारीबद्दल जिथे शंका घेतली जाते, अविश्वासाने पाहिले जाते तिथे नोकरी करणे मला कधीही शक्य नाही. हा अपमान माझ्या सहनशीलतेच्या बाहेर आहे. आपण तर स्वप्नातही अशी शंका घेतली नाही. आता मला जाऊ द्या.’’

मग जे घडले ते त्यांनी सांगितले. नरसिंहराव म्हणाले,

‘‘मी नाही का अनेक आरोप सहन करीत आलो आहे?’’

यावर खांडेकरानीं त्यांना सांगितले की,

‘‘त्यात आणि यात फार फरक आहे. मीसुद्धा अनेक आरोप सहन केलेत हे आपण जाणताच. इथे तुमची मुलगीच संशय घेते आहे.’’

यानंतर जवळपास दहा-पंधरा मिनिटे त्या मुलीचा नरसिंह रावांनी असा समाचार घेतला, की तिला देवच आठवले. डोळ्यांतून गंगा-यमुना वाहू लागल्या, त्या आटेनात. नरसिंह राव त्यांना म्हणाले,

‘‘सर्व विसरा व उद्यापासून बंगल्यावर जा. मी अधूनमधून टेलीफोन करीन.’’

राम खांडेकर म्हणतात आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांचा मान राखण्यासाठी पोटच्या मुलीचीही पर्वा न करणारे मंत्री आज आढळतील का? शोधून बघा!

या व अशा किश्श्यांवरुन समजत की खांडेकर कोण होते. सत्तेच्या वर्तुळात राहूनही सत्तेची नशा चढू न देता, आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहणाऱ्या निरलस आणि तत्त्ववादी व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली..

राम खांडेकरांचे किस्से त्यांच्याच लेखणीतून…

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.