खुद्द पंतप्रधानांचे नातेवाईक कोट्यवधींच्या घोटाळ्यात अडकले होते

भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा, असं स्वप्न अनेकांनी पाहिलं. त्यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न देखील वेळोवेळी केले गेले. गोष्ट जरा खटकेल पण देशात घोटाळे, भ्रष्टाचाराची साखळी खूप मोठी आहे. या घोटाळ्यात अनेकांना जेलची हवा खावी लागली, तर काहींची सूटका झाली. पण त्याकाळात गाजलेल्या त्याप्रकणांनी एकचं बाजार उठवला होता. 

असाच एक घोटाळा नरसिंह राव यांच्या पंतप्रधान कार्यकाळात उघडकीस आला होता, ज्याने सगळ्यांचीच झोप उडवली होती. 

राष्ट्रीय फर्टिलायझर्स लिमिटेड या भारतीय कंपनीने कार्सन लिमिटेड या तुर्कस्तानमधील कंपनीला नियमांची पूर्तता न करता १३३ कोटी रुपयांच्या युरिया खरेदीचं कंत्राट दिलं आणि या व्यवहारात तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे नातलग गुंतले असल्याचं १९९५ च्या अखेरीस उघडकीस आलं आणि सर्वत्र खळबळ उडाली.

राष्ट्रीय फर्टिलायझर्स लिमिटेडने तुर्कस्तानमधील कार्सन लिमिटेड या कंपनीला २ लाख टन युरियाखरेदीचं कंत्राट सप्टेंबर १९९५ मध्ये देऊ केलं होतं. विशेष म्हणजे या कंत्राटाची १३३ कोटी रुपयांची संपूर्ण रक्कम म्हणजे ३.७६ कोटी डॉलर्स २९ नोव्हेंबर, १९९५ रोजी आगाऊ देऊनही टाकली होती.

हा संपूर्ण व्यवहार बँक गॅरंटीशिवाय झाला होता आणि व्यवहार करताना निर्देशित सर्व नियम डावलले गेले होते. एवढंच नव्हे; तर ज्या स्विस बँकेमार्फत हे व्यवहार झाले, त्यांनी आक्षेप घेऊनही स्टेट बँक व रिझर्व्ह बँक यांनीही त्याची दखल न घेतल्याचे आरोप झाले.

या व्यवहारांकडे या दोन प्रमुख बँकांनी दुर्लक्ष का केलं हा प्रश्न पुढेही अनुत्तरित राहिला. या सर्वांवर कडी होईल अशी गोष्ट म्हणजे सर्व पैसे आगाऊ मिळाल्यानंतरही कार्सन लिमिटेडने युरियाच्या ऑर्डरची पूर्ती केलीच नाही. त्यामुळे कंपनीचे दोन वरिष्ठ अधिकारी ट्यूनके अलान्कस आणि सिहान करान्सी यांनी या रकमेचा घोटाळा केला, असं मानलं गेलं.

या घोटाळ्यात अलान्कस याने भारतातील राजकीय नेते, त्यांची मुलं आणि नोकरशहा यांच्या मदतीने हा सारा घोटाळा घडवून आणला गेल्याचे आरोप झाले.

१९९६ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे आल्यानंतर त्यांनी नरसिंह राव यांचे नातेवाईक बी. संजीव राव, माजी केंद्रीय मंत्री रामलखन सिंग यादव यांचे चिरंजीव प्रकाशचंद्रा, कार्सन लिमिटेडचे ट्यूनके अलान्कस आणि सिहान करान्सी, राष्ट्रीय फर्टिलायझर्स लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक सी. के. रामकृष्णन, माजी कार्यकारी संचालक दिलबाग सिंग, कार्सनचे भारतातील एजंट एम. सांबशिव राव, तसंच डी. एम. गौड आणि ब्राझिलियन नागरिक ए. ई. पिंटो एवढ्या जणांवर आरोपपत्र दाखल केलं.

पुराव्याअभावी नरसिंह राव यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रभाकर राव यांच्यावर मात्र तेव्हा कारवाई होऊ शकली नाही. पुढे डिसेंबर १९९८ मध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने त्यांना अटक केली. पंतप्रधानपदी अटल बिहारी वाजपेयी आल्यानंतर या घोटाळ्याच्या तपासाला वेग आला आणि घोटाळ्यातील पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र राष्ट्रीय फर्टिलायझर लि.ने ऑर्डरपोटी देऊ केलेले पैसे बुडाले ते बुडालेच.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.