अस्सल राज्यपाल नियुक्त : नरूभाऊ लिमये

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.

महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० साली झाली. महाराष्ट्रात द्विस्तरीय विधीमंडळ आहे. पैकी विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, विधासभेतील आमदारांचे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रतिनिधी निवडून जातात तर राज्यपालांकडून विविध क्षेत्रातील १२ सदस्यांची कलम १७१/ नुसार नियुक्ती होते.

हे सगळं झालं नागरिकशास्त्र, जे आपण विसरून टाकू आणि प्रॅक्टिकल मुद्यांवर येवू…

महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर दर सहा वर्षांनी जे १२ सदस्य निवडले जातात अशा व्यक्तींची आजतागायत एकूण संख्या होते १०६. आत्ता गंम्मत अशी की या १०६ पैकी १२-१३ व्यक्तीच वास्तविक त्या त्या क्षेत्राशी संबधित होत्या.

१०६ मधून निवडक १५-१६ वजा केले तर उर्वरीत ९० जण फक्त राजकीय पुर्नवसनासाठी आमदार झालेले.

असो तर अशाच १५-१६ जणांची माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करतोय,

याच नाव आहे अस्सल राज्यपाल नियुक्त.

या सिरीजमधलं आठवे नाव आहे, जेष्ठ पत्रकार नरुभाऊ लिमये.

स्वातंत्रसेनानी, जेष्ठ पत्रकार अशी ओळख मिळवलेले, नरहर वामन उर्फ नरुभाऊ लिमये. सोबतच राजकारणी आणि कॉंग्रेसी नेता अशी देखील त्यांची ओळख. ८ नोव्हेंबर १९०९ चा त्यांचा जन्म. मूळचे साताऱ्याचे आणि स्वातंत्र्यचळवळीतले यशवंतराव चव्हाण यांचे अत्यंत जवळचे सहकारी.

शालेय शिक्षण आटोपल्यानंतरच नरुभाऊंनी काँग्रेसचे कार्य करायला सुरुवात केली. व्यक्तीने एकदा राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली की आपोआपच त्याच्या संबंधी गैरसमजाचे वातावरण निर्माण होते. यावेळी सावध वृत्तीचा कार्यकर्ता या गैरसमजांना अवास्तव महत्त्व न देता आपल्या कार्यातच दंग राहतो. नरुभाऊंनी सार्वजनिक जीवनात वावरताना हे सुत्र आपल्या मनाशी पक्के बांधून ठेवले.

सातारच्या समर्थ साप्ताहिकातुन त्यांनी आपल्या लेखनाला प्रारंभ केला. पुढे ते त्या पत्राचे संपादक झाले. कालांतराने साप्ताहिकाचे क्षेत्र त्यांना अपुरे वाटू लागले आणि १९४८ मध्ये ‘प्रकाश’ हे दैनिक त्यांनी सुरू केले. त्याकाळी जिल्हा दैनिकांची आर्थिक स्थिती फारशी समाधानकारक नसे. तरीही तोटा सोसून नरुभाऊंनी हे दैनिक चालू सुरु ठेवले.

परदेशी घडामोडींबाबत लिहिणे हा नरुभाऊंचा आवडता छंद. १९३७-१९३८ च्या दरम्यान नरुभाऊंनी प्रथम स्पेनमधील यादवी युद्धाबद्दल लिहिले आणि त्यानंतर ते सतत यासंबंधीच्या विषयांवर लिहित राहिले. आग्नेय आशियातील राजकारणासंबंधीचे ‘लाल लाल पूर्व’ हे त्यांचे पुस्तक याच आवडीतून जन्माला आले.

पुढे भाऊसाहेब हिरे यांच्या मैत्रीमुळे पुण्यातील ‘लोकशक्ती’ या दैनिकाची जबाबदारी नरुभाऊंकडे आली. तेव्हापासून त्यांचे सातारा सुटले आणि ते पुण्याला स्थायिक झाले. पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या माडीवाले कॉलनीतील दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात ते राहत.

पण तरीही साताऱ्यातील अनेक संस्थांशी आणि माणसांशी त्यांचा जिव्हाळयाचा संबंध होता. तो त्यांनी कधीही कमी होऊ दिला नाही. आठवड्यातील एक दिवस त्यांनी सातारसाठी राखूनच ठेवला होता.

यशवंतराव चव्हाण हे नरुभाऊंचे जुने स्नेही. पण त्यांनी द्विभाषिक राज्याचा पुरस्कार केला तेव्हा त्यांचे हे मत आपल्याला मान्य नसल्याचे नरुभाऊंनी जाहीररित्या सांगितले. इतकेच नव्हे तर लोकशक्ती हे काँग्रेस पक्षाचे मुखपत्र असूनही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या धोरणाशी आपले जे मतभेद आहेत ते त्यांचा लोकशक्तीच्या स्तंभातुन उच्चार करताना कधी बिचकले नाहीत.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी तडजोड म्हणून डांगवर उदक सोडण्याची जेव्हा महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शविली तेव्हा ‘डांगला टांग मारू नका’ असे परखडपणे बजावताना नरुभाऊंनी कधीच भीड बाळगली नाही.

आमदार नरुभाऊ….

नरुभाऊ १९६२ पासून सभागृहात होते. सरकार दरबारी त्यांचे वजन आहे हे माहीत असलेला कोणी ना कोणी आपले गाऱ्हाणे घेऊन त्यांच्याकडे आला की नरुभाऊंमधला सार्वजनिक कार्यकर्ता जागा व्हायचा. भेटावयास आलेल्या माणसाला सांगतात,
“मी उद्या मुंबईला जाणार आहे. संबंधीत अधिकाऱ्याची गाठ घेऊन तो काय म्हणतो ते मी पाहतो. परवा सकाळी भेटायला या”

अशा एका दिवसात त्यांनी शक्य तितक्या जणांची गाऱ्हाणी मार्गी लावली.

आमदार झाल्यावर देखील त्यांनी त्यांच्यातील पत्रकार कायम जागा ठेवला. त्यामुळे ते नेहमी म्हणत असत, “आज मी आमदार आहे; पण हे पद केव्हा जाईल ते मला माहीत नाही. मी पत्रकार मात्र कायमचा आहे”

१९६७ साली आमदार असताना पुण्याच्या भरत नाट्य मंदिराच्या अधुनिकीकरणात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावर्षी थिएटर बांधण्यासाठी गृहखात्याची परवानगी मिळवून देण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. आणि अखेरीस ११ ऑक्टोंबर १९६७ ला गृहविभागाची परवानगी मिळाली.

एकदा शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्याच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शेजारच्या गोवा राज्याप्रमाणे कॅसिनो सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती. अर्थात, हे कॅसिनो मुंबईजवळच्या अरबी समुद्रात तरंगत्या जहाजाच्या स्वरूपात असणार होते.

ही चर्चा विधान परिषदेत सुरू असताना त्या वेळी आमदार असलेल्या नरुभाऊंनी जोरदार टीका करून सरकारला बजावलं होते, ‘‘या राज्यात काय तुम्ही रम, रमा आणि रमीची संस्कृती आणण्याचं ठरवलं आहे काय?’’ त्यांना जे अयोग्य वाटलं होतं, त्याविषयी त्यांनी इतक्‍या स्पष्टपणे सांगितले आणि ही चर्चा हाणून पाडली.

निवृत्तीनंतरचे भाऊ…

उतारवयात पत्रकारितेतून आणि राजकारणातुन निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाची जबाबदारी घेतली. आर्यभूषण प्रेस डबघाईला आला होती. तीन-चार वर्षं मेहनतीने त्यांनी ती नफ्यात आणली.

वय पुढे जात होते; पण निवृत्तीचा निर्णय नावालाच होता. सकाळी नऊच्या ठोक्‍याला ते नियमाने प्रेसवर जायचे. एकदा तिथल्या कामाचे नियोजन झाले, की नरुभाऊंचा पत्रप्रपंच सुरू होई. सत्ताधाऱ्यांना ते नेहमी खरमरीत पत्रे पाठवायचे. यात तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.

सायंकाळी मात्र डेक्कन जिमखाना क्‍लबवर जाऊन पत्त्यातला ब्रिजचा डाव त्यांचा कधी चुकला नाही. अनंतराव पाटील हे त्यांचे हक्काचे भिडू.

नरुभाऊंना मूल-बाळ नव्हते; पण त्यांच्या मित्राच्या मुलाकडे म्हणजे दिलीप पुंडे यांच्याकडे ते राहत असत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अगदी वडिलांसारखी त्यांची सेवा केली. पण वाढते वय आणि ढासळती तब्येत यामुळे अखेरीस त्यांचे ३० ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.

कॉंग्रेस पक्ष, राजकारण या क्षेत्रातील मुक्त वावर नरुभाऊंनी कधीच लपवला नाही. पण आपल्या पत्रकारितेच्या आड त्यांनी या गोष्टी कधीच आणल्या नाहीत. त्यामुळेच तर ते राजकारण्यांपेक्षा वेगळे आणि उत्तुंग व्यक्तीमत्व ठरतात. अशाच व्यक्तीमत्वांचा आपण आढावा या सिरीज मधून घेत आहोत.

लवकरच भेटूया पुढच्या भागात….

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.