अंतराळातल्या लघुग्रहावर सॅटेलाईट आपटून जगाला वाचण्याचा प्रयोग पार पडला
पृथ्वीला नष्ट करू शकेल अशी एखादी उल्का पृथ्वीकडे येत आहे आणि ती पृथ्वीला टक्कर देणारच तेव्हा एखादा सुपरमॅन येतो आणि त्या उल्केला दुसरीकडे वळवतो. असा सिन तुम्ही अनेकदा हॉलिवूड मुव्हीत बघितला असेल. पण अशाच प्रकारे आता या उल्कांना पृथ्वीकडे येण्यापासून थांबवलं जाऊ शकणार आहे.
पण हे काम कोणता सुपरमॅन करणार नसून पृथ्वीवरून पाठवण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.
नासाने अंतराळात पाठवलेला डार्ट उपग्रह पृथ्वीपासून १.१० कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या डायमॉर्फस नावाच्या लघुग्रहाला आपटलाय. पहिल्याच प्रयत्नात हा उपग्रह लघुग्रहाला धडक देण्यात यशस्वी ठरलाय. तर दुसरा उपग्रह अजूनही शाबूत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे हा दिवस ऐतिहासिक मानला जातोय.
हे तंत्रज्ञान आणखी विकसित झाल्यास भविष्यात पृथ्वीवर आपटणार असलेल्या अनेक लघुग्रहांची दिशा अंतराळातच बदलता येऊ शकते.
पण हा लघुग्रह आणि उपग्रहाचा आपल्याशी काय संबंध असा प्रश्न पडला असेल तर सोप्या शब्दात समजून घ्या.
अंतराळात अनेक ग्रह आणि तारे आहेत ते आपापल्या कक्षेत फिरत आहेत. त्या ग्रहांचा एकमेकांशी टक्कर होण्याचा काही संबंध नसतो. मात्र सूर्यमालेत लहान लहान असे असंख्य लघुग्रह आहेत. त्यापैकी लाखो तर सूर्याभोवतीच फिरतात पण यांची काही एक निश्चित सीमा नाही. ते त्यांची सीमा सोडून कधीही दुसऱ्या दिशेला वळतात आणि वेगवेगळ्या ग्रहांच्या दिशेने जातात. त्यांनाच आपण उल्का असे म्हणतो.
यातल्याच काही उल्का पृथ्वीच्या दिशेने येतात आणि पृथ्वीवर आपटतात. यातील बऱ्याचशा लहान आकाराच्या असतात त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात येईपर्यंत जाळून खाक होतात तर काही पृथ्वीवर आपटतात. त्यांच्यामुळे कोणत्याच प्रकारचा धोका निर्माण होत नाही.
पण ज्या उल्का मोठ्या आकाराच्या असतात त्यांच्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो.
अशीच एक १० किलोमीटर रुंदीची उल्का लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर आपटली होती त्यामुळे मोठा विस्फोट झाला. त्या विस्फोटाची राख वातावरणात पसरली आणि पृथ्वीवरील डायनासोर नष्ट झाले होते. अशा मोठ्या उल्का १० ते २० कोटी वर्षातून एकदाचा पृथ्वीवर पडतात. पण २५ मीटर आकाराच्या उल्का दर १०० वर्षांमध्ये एकदा पृथ्वीवर पडण्याची शक्यता आहे.
अलीकडेच २०१३ सालात एक १८ मीटर रुंदीची उल्का रशियामध्ये पडली त्यामुळे मोठा विस्फोट झाला होता. त्यामुळे शेकडो लोक जखमी झाले आणि मोठं नुकसान झालं होतं.
भविष्यात होणारे असे उल्कापात थांबवण्यासाठीच नासाने हा प्रयोग केला होता.
नासाने डबल एस्ट्रोइड रिडायरेक्शन टेस्ट म्हणजेच डार्ट नावाच्या उपग्रहाला अंतराळात पाठवलं होतं. तर त्याची माहिती मिळवण्यासाठी एलआयसीआयए क्यूब नावाचा आणखी एक उपग्रह होता. हे उपग्रह ज्या ठिकाणी पाठवण्यात आले तिथे दोन लघुग्रह होते. त्यात ७८० मीटर रुंदीचा डिडिमॉस हा मोठा लघुग्रह होता. तसेच १६० मीटर रुंदीचा डायमॉर्फस नावाचा लहान लघुग्रह डिडिमॉस भोवती फिरत होता.
या दोन लघुग्रहांमध्ये १.२ किलोमीटरचं अंतर असून. डीडीमॉस २ वर्ष १ महिन्याच्या कालावधीत सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. ग्रीक भाषेत डीडीमॉसचा अर्थ जुळे असा होतो. याचा शोध १९९६ मध्ये जो मॉन्टोनी यांनी लावला होता तर त्याच्या बाजूच्या डायमॉर्फसचा शोध २००३ मध्ये पेट्र प्रवेश यांनी लावला होता.
‘यात डायमॉर्फस आकार लहान असल्यामुळे त्याची सूर्याभोवती होणारी हालचाल अभ्यासास पूरक होती. त्याच्या हालचालींचं निरीक्षण कारण सोपं होतं. त्यामुळे या प्रयोगासाठी डायमॉर्फस निवड करण्यात आली. डायमॉर्फस पृथ्वीला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. केवळ प्रयोगासाठी त्याची निवड करण्यात आली होती.’ असं नासाने स्पष्ट केलंय.
या लघुग्रहामुळे समस्या नसली तरी पृथ्वीला समस्या निर्माण होऊ शकतील असे अनेक लघुग्रह अंतराळात आहेत.
आजपर्यंत अंतराळातल्या २६ हजार लघुग्रहांची गणना नासकडून करण्यात आली आहे. तसेच यातले कोणते लघुग्रह कोणत्या कालावधीत पृथ्वीवर येऊ शकतील याबद्दल सुद्धा अभ्यास करण्यात आलाय. मात्र त्यापलीकडे बाकीच्या लघुग्रहांचा अजून अभ्यास करायचा आहे. त्यामुळे ते केव्हा अचानक पृथ्वीच्या दिशेने येतील सांगता येऊ शकत नाहीत.
त्यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकारे उपग्रह पाठवून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्केची दिशा बदलण्याचा प्रयोग नासाकडून केला जात आहे. यात पृथ्वीवरून सोडण्यात आलेले उपग्रह एका विशिष्ट दिशेने जाऊन उल्केवर आदळतात. उपग्रहाच्या फोर्समुळे उल्केची दिशा बदलून ती दुसऱ्या बाजूला वळेल आणि पृथ्वीला असणारा धोका टाळला जाईल. यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये हा प्रयोग सुरु करण्यात आला होता.
सद्याच्या प्रयोगाबद्दल काही फोटो वगळता बरीचशी माहिती अजून मिळायची आहे. धूळ कमी झाल्यावर सॅटेलाईटवरील दुर्बिणीच्या आधारे सगळी माहिती गोळा करण्यात येत आहे. या क्रॅशमुळे डायमॉर्फस खड्डा पडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रयोगावर एकूण ३३० मिलियन डॉलर म्हणजेच २ हजार ६९२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. नासा अंतराळातील ४.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या दगडांच्या संशोधनावर जितका खर्च करत आहे, त्याच्या तुलनेत हा खर्च फारसा मोठा नसला तरी महत्वपूर्ण आहे.
भविष्यात हे तंत्रज्ञात चांगल्या पद्धतीने विकसित झाल्यानंतर याचा वापर पृथ्वीवर येणाऱ्या उल्कांना थांबवण्यासाठी केला जाईल. म्हणून या प्रयोगाकडे जगभरातील अनेकांचं लक्ष लागलंय.
हे ही वाच भिडू
- युपीच्या आकाशात UFO दिसले..तसं नाही हे कांड तर इलॉन मस्क करतोय…
- लोणारच्या विवरात असणाऱ्या या देवीला ऐतिहासिकच नाही तर भौगोलिक महत्व देखील आहे
- नासाने ब्रह्मांडाचं रहस्य शोधण्यासाठी सोडलेला स्पेस टेलिस्कोप आपल्या ठिकाणाला पोहचला आहे…