महाराष्ट्र, कर्नाटक की आंध्रप्रदेश ; हनुमान नक्की कुठे जन्मले…हा सर्वात मोठ्ठा प्रश्न आहे..

हनुमान नक्की कुठं जन्मले ? कर्नाटक? महाराष्ट्र? आंध्र प्रदेश? गुजरात, झारखंड की बिहार? 

हा प्रश्न निर्माण झाला कारण या राज्यातील महंत आमच्याच राज्यात हनुमान जन्मलेत म्हणून दावा करत आहेत. भगवान हनुमानाचे जन्मस्थान हे नाशिकमधील अंजनेरी नसून, कर्नाटकचे किष्किंधा असल्याचा दावा स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केला आणि या वादाला तोंड फुटलं…

अखेर हा वाद मिटवण्यासाठी नाशिक येथे आज धर्मसंसद बोलावली होती.

जिथे देशभरातले साधू-संत जमलेत. याच धर्म संसदेत निर्णय होणार होता कि हनुमान नक्की कुठे जन्मले.

या धर्मसभेत ज्या त्या राज्यांचे महंत, पुजारी जमलेत. त्यांनी हनुमान जन्मस्थळाचे पुरावे सादर केलेत. मात्र सभा होण्याआधी पासूनच नाटकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आसन व्यवस्थेवरून मान-अपमानाच्या गोष्टी सुरु झाल्या मात्र जन्म स्थळांवरून जेंव्हा दावे-प्रतिदावे सुरु झाले तेंव्हा मात्र दोन्ही पक्ष आपापल्या बाजूवर ठाम असून, कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते शेवटी धर्मसभा स्थगित करण्यात आली.

नाशिक मध्ये याबाबत शांतता व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून शहरात पोलिसांनी १४४ कलम लागू केले आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

कोणते राज्य काय दावा करत आहेत ? 

महाराष्ट्राचा काय दावा आहे ?

महाराष्ट्रात नाशिकच्या अंजनेरी हनुमानाचा जन्म झाला असल्याचे मानले जाते. याठिकाणी हनुमानाचे मंदिर देखील आहे.

येथे असलेल्या अंजनेरी गडाबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. सह्याद्री पासून वेगळ्या झालेल्या सातमाळा, त्र्यंबकेश्वर, सेलबारी, डोलबारी इत्यादी उपडोंगर डोंगर रांगेत अंजनेरी किल्ला वसला आहे. अंजनेरी गड हा हनुमानाचे जन्मस्थान असल्याच्या कथा प्रचलित आहेत. गडावर अंजनी मातेचे मंदिर आहे. लोक श्रद्धेने गडावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात. बाल हनुमानाने केलेल्या अनेक बाल करामती तसेच सूर्याला फळ समजून ते खाण्यासाठी पहिले उड्डाण याच पर्वतावरून घेतल्याची आख्यायिका आहे.

गडावर एक तळे आहे, ते हनुमानाच्या पायाच्या ठशामुळे तयार झाले असल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. या गडाला एक धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. अंजनी मातेच्या नावावरूनच गडाला आणि गावाला अंजनेरी हे नाव पडले आहे. बालेकिल्ल्यावर अंजनीमातेचे मंदिर आहे.  

अंजनीमातेच्या मांडीवर बालहनुमान बसला आहे. हनुमानाची अशी मूर्ती इतर कुठे बघायला मिळेल असे वाटत नाही. कदाचित हनुमाचे जन्मस्थान म्हटले जात असल्याने अशा मूर्तीची रचना केली असावी असं नाशिककर दावा करत आहेत.

कर्नाटकचा काय दावा आहे ?

हंपी इथून १५ किमी लांब एक गाव येते अनेगुंडी. अनेगुंडीला पूर्वी किष्किंधा होतं असं म्हणतात. या गावात सुग्रीव किल्ला, तारा पर्वत, तुंगभद्र नदी, श्रुंगऋषीचा आश्रम, शबरीची झोपडी, तसेच बालीचा किल्ला असे नैसर्गिक पुरावे आहेत.  

अनेगुंडी गावात आंजनेय पर्वत आहे. या पर्वताच्या शिखरावर हनुमानाचं प्राचीन मंदिर आहे. इथे सूर्य उगवण्याआधी डोंगरावर सोनेरी प्रकाश दिसतो आणि वाल्मीकीच्याच रामायणात नाही तर इतर सर्व रामायणांमध्ये असा उल्लेख आहे की, सोनेरी रंगाच्या पर्वताच्या शिखरावर हनुमानाचा जन्म झाला होता.

तसेच वाल्मीकी रामायणात लिहिलंय की किष्किंधा नगरी दगडांच्या टेकड्यांनी बनली होती. भौगोलिक पुरावे सांगतात की, किष्किंधामध्ये आधी मोठमोठ्या गुहा होत्या, आर्किओलॉजिकल पुरावे सांगतात कि, पुष्कळ गुहांमध्ये वानरांचे शिल्प कोरलेले आहेत जे आजही आढळतात. आजही इथे स्ट्रक्चर, दगड आणि गुहा येथे दिसतात.  

तसेच रावण जेंव्हा सीतामातेचे अपहरण करून नेट होता तेंव्हा तो पंपा नदीच्या किनाऱ्यावर नेट होता, ही तीच पंपा नदी आहे जीच्या किनाऱ्यावर किष्किंधा नगरी होती. या नदीचं आत्ताचं नाव म्हणजे तुंगभद्रा नदी. 

या सर्व जागा कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्याच्या गंगावती तालुक्यात किष्किंधामध्ये पाहायला मिळतात ज्या हनुमाच्या जन्मस्थळाशी संबंध दर्शवतात.

त्यामुळे असा दावा केला जातो कि, किष्किंधामधील नैसर्गिक पुरावे सांगतात कि येथेच हनुमानाचा जन्म झाला.

आता बघूया आंध्र प्रदेशातील तिरुपतीचा काय दावा आहे..

हनुमानाच्या जन्मस्थानावर दावा करणारे पहिले कोण होते तर ते म्हणजे, तिरुमला तिरुपती देवस्थानम TTD जे आंध्र प्रदेशातील तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरासह मंदिरांचे व्यवस्थापन करत असते.  

मागच्या डिसेंबरमध्ये, तिरुमला तिरुपती देवस्थानमने वैदिक विद्वान, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांची मदत घेऊन पॅनेल तयार केले आणि अभ्यास करून अहवाल सादर केला कि, हनुमानाचे जन्मस्थान हनुमानाचे जन्मस्थान तिरुमालामध्ये आहे.

तसेच या अहवालानुसार, इतिहास, पुराणे, शास्त्र असं सगळे संदर्भ सांगतात की, हनुमानाचे जन्मस्थान तिरुमालाच्या ७ डोंगरांपैकी एक अंजनाद्रीवरच आहे. किष्किंधा हम्पीच्या जवळ असण्यावर कुणाचं दुमत नाही. रामायणात लिहिलेल्या नुसार, सूर्यदेवाच्या आदेशाने हनुमान किष्किंधेला गेले होते आणि सुग्रीवाशी मैत्री केली होती.

थोडक्यात हनुमानाची जन्मभूमी तिरुमालाच्या अंजनाद्री डोंगर आहे आणि त्यांची कर्मभूमी कर्नाटकाची किष्किंधा आहे असं म्हणतात.

रामायणात सुमेरुशिखरांचलचा उल्लेख आढळतो. त्यात असं लिहिलंय की हनुमंताचा जन्म सुमेरुशिखरांचलात झाला. स्कंद पुराणानुसार, अंजनी मातेने अंजनाद्रीमध्ये तपश्चर्या केली म्हणून त्या पर्वताचे नाव अंजनाद्री झालं. तिरुमलामध्ये देवी अंजनीचे मंदिर आहे. आणि डोंगराचे नावही  अंजनाद्री आहे. त्यामुळे  हनुमानाचे जन्मस्थान तिरुमालाच आहे असे दावे केले जातात.

आता मुद्दा हा आहे कि, महाराष्ट्र,  कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यांकडे दावे, लोककथा, संदर्भ आणि पुरावे आहेत.

या ३ राज्यांशिवाय गुजरात, झारखंड आणि हरियाणात देखील हनुमाच्या जन्मस्थळाचा दावा केला जातोय मात्र इतिहास अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, या राज्यातील ठिकाणांचा रामायणात किंव्हा पुराणात उल्लेख नाही. 

ज्याप्रमाणे उत्तरेकडे अयोध्या हे हिंदूंचे सर्वात मोठे श्रद्धेचे केंद्र बनलेय तसे दक्षिणेतील किष्किंधा हे देखील एक मोठा धार्मिक आणि राजकीय मुद्दा म्हणून समोर येत आहे हे मात्र खरंय…

धर्म संसद म्हणजे काय ?

हनुमानाच्या जन्मस्थानावरूनच्या वादावर तोडगा काढण्यासाठी महंत श्री मंडलाचार्य पीठाधीश्‍वरचे स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी बैठक बोलावली, त्याला ‘धर्मसंसद’ असं नाव दिलं गेलं. या बैठीकीसाठी त्या त्या राज्यातील हनुमानाच्या जन्म स्थळांवर दावा सांगणारे महंत गोळा झाले होते.

तसेच नाशिक आणि त्रंबकेश्वर येथील मंदिरांमधील पुजारी, पुरोहित संघाचे अध्यक्ष, सनातन वैदिक धर्म सभाध्यक्ष यांच्यासह देशातले साधू, संतामध्ये ही चर्चा होणार होती.

या चर्चे आधी असं ठरवण्यात आलं होतं कि, देशभरातील सर्व साधू भगवान हनुमानाच्या जन्मस्थानाबाबत आपली मते मांडतील आणि त्यानंतर संसदेत जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल. मात्र हि बैठक सुरु झाल्यापासून ते शेवट्पर्यंत वादळी ठरली.. 

सभेपूर्वी सभास्थळी बसण्यावरून साधू महंतांमध्ये नाराजीनाट्य सुरु झालं हा वाद थांबलाच नाही तोच  भर सभेत साधू महंत हमरी तुमरीवर आले होते. वाद वाढतच होता हे पाहून पोलिसांनी मध्यस्थी केली अन सभा गुंडाळण्यात आली.

हनुमानाचे जन्मस्थळ नक्की कोणते याचा निकाल लावायला जमलेल्या शस्त्रास्त्र सभेत साधू अन महतांमध्ये राडा झाला मात्र निर्णय काय ठरला नाही.

हनुमान जन्मस्थळ नेमके कुठे हा वाद बाजूलाच राहिला अन इथे वेगळाच प्रकार पाहायला मिळाला.  पुढील बैठकीबाबत कोणत्याच गटाने अद्याप काही माहिती दिली नाही त्यामुळे हा वाद असाच भिजत राहतो कि त्यावर ठोस निर्णय लागतो कि नाही हे कळेलच..मात्र यावरून सामाजिक शांतता बिघडायला नको म्हणजे मिळवलं.. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.