ऑक्सफर्ड वगैरे विसरा, या डिजिटल युगात खांडबहाले डिक्शनरीच मोबाईलमध्ये लागते….

इंग्रजी म्हणल्यावर आपली गाळण उडते, मनातल्या मनात आपण जबरी इंग्लिश बोलू शकतो पण एखाद्या व्यक्तीसमोर इंग्रजी बोलायची म्हणल्यावर आपण फेल होतो. ज्या भाषेचं दडपण ग्रामीण भागातल्या मुलांना वाटत राहिलं त्यावर उपाय म्हणून नाशिकच्या भिडूनं डिजिटल डिक्शनरी बनवली तीही २२ भाषांमधली. जाणून घेऊया हि यशोगाथा.

नाशिकजवळील महिरावणी येथील एका शेतकरी कुटुंबात सुनील खांडबहाले यांचा जन्म झाला. घरात गरिबी पाचवीला पुजलेली, घरात सगळे अशिक्षित होते. पण सुनील यांच्या वडिलांनी मुलांना शिकवण्याचा निर्धार केला होता. सुनील खांडबहाले यांना मुळात चित्रकलेची आवड होती पण चांगले मार्क मिळाल्याने वडिलांनी त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंस्ट्रुमेंटेशनचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं. 

मराठी माध्यमात शिकलेल्या सुनील खांडबहाले यांना इंग्रजी भाषा सुरवातीलाच जड जाऊ लागली. आता इंग्रजी हा असा विषय होता ज्यामुळे सुनील यांच्या वर्गातल्या दोन तीन लोकांनी तो विषय इंग्रजी येत नाही म्हणून सोडला होता. सुनील यांच्या डोक्यातही हाच विचार घोळत होता पण घरच्यांच्या अपेक्षा त्यांना माघारी फिरू देत नव्हत्या.

यावर उपाय काय म्हणून सुनील आपल्या प्राध्यापकांना भेटले तेव्हा शिक्षकांनी त्यांना डिक्शनरीचा सल्ला दिला. सुनील खांडबहाले यांनी डिक्शनरीचा आधार घेत घेत परीक्षा पास केल्या आणि शेवटी जेव्हा अभ्यासक्रम संपला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि पास होणाऱ्या टॉप विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं नाव आहे. डिक्शनरीचा नाद त्यांना चांगलाच जडला होता. 

सुनील यांच्या मनात विचार आला कि ज्या मित्रांनी इंग्रजीमुळे दुसरी साईड घेतली त्या मित्रांसाठी आपण एक डिक्शनरी बनवू. सुनील खांडबहाले यांनी डिक्शनरीच्या फोटोकॉपी बनवायला सुरवात केली. त्यावरच्या नोट्स, निरीक्षणे अशी सगळी माहिती गोळा करून त्यांनी त्याच पुस्तक छापायचा निर्णय घेतला.

पण त्यावेळी कॉम्प्युटरचं युग नव्यानेच सुरु झालं आणि मग सुनील खांडबहाले यांनी डिजिटल डिक्शनरी बनवण्याचं ठरवलं. महिनाभर कॉम्प्युरच फॅड समजून घेऊन, पुस्तकांचा आधार घेऊन सुनील यांनी ऑनलाईन इंग्रजी-मराठी-इंग्रजी शब्दकोश जारी केला. या उपक्रमाचं तुफ्फान कौतुक झालं. आणि लवकरच सुनील यांना हाच उपक्रम विविध भाषेंसाठी राबवावा म्हणून अनेक विद्यापीठांनी आणि भाषा तज्ज्ञांच्या विनंत्या आल्या.

आज घडीला सुनील यांनी आणि त्यांच्या टीमने स्थानिक भाषांसाठी इंग्रजी आणि त्याउलट जवळपास २२ भाषांसह त्यांचे शब्दकोश तयार केले आहेत. आता सुनील यांचं लक्ष्य जागतिक दर्जाच्या जितक्या भाषा आहेत त्या सगळ्या मराठी मुलांना आणि इतर भाषिक मुलांना त्यांच्या भाषेत उपलब्ध व्हावेत म्हणून ते प्रयत्नशील आहेत. हा सगळा प्रयत्न यासाठी आहे कि इंग्रजीची गरज पडली नाही पाहिजे आणि आपापल्या भाषेतून लोकांना संवाद साधता येईल. 

हा सगळा प्रवास सुनील यांनी १३ वर्षाच्या संघर्षमय पद्धतीने पूर्ण केला आहे. अधिकची माहिती आणि डिक्शनरीसाठी त्याच्या सेटअप फाईल्स त्यांची वेबसाईट khandbahale.com वर उपलब्ध आहे. प्ले स्टोरवर खांडबहाले नावाने त्यांच्या ऍप आहेत.

२०१३ साली महाराष्ट्र युथ आयकॉन हा पुरस्कार सुनील खांडबहाले यांना देण्यात आला होता. याच वर्षी एमआयटीचे प्राध्यापक रमेश रासकर यांच्यासोबत त्यांनी कुंभथॉनची स्थापना केली होती. २०१४ साली मुंबई विद्यापीठाच्या संयोगाने सुनील खांडबहाले यांनी मोबाइलच्या वापरासाठी इंग्रजी ते संस्कृत थिसॉरस विकसित केलं.

संस्कृत भारती हा जगातला पहिला संस्कृत रेडिओ सुनील खांडबहाले यांनी तयार केला. असे अनेक उपक्रम सुनील यांनी राबवले आहेत.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.