इंग्रजांनी भारतात नोटा छापण्यासाठी नाशिकचीच निवड का केली?

गेल्या काही दिवसांपासून नाशिकची करन्सी नोट प्रेस चर्चेत आली आहे. कडेकोट बंदोबस्त असताना ही दोन आठवड्यांपूर्वी इथून पाच लाख रुपयांच्या नोटा चोरीला गेल्या. पाचशे रुपयांच्या नोटांची दहा बंडले गायब झाल्यामुळे संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये खळबळ उडाली आहे.

नव्वद वर्षांपासूनचा भारतातला सर्वात जुना असलेला हा छापखाना.

आजही इथे दहा, वीस, पन्नास, शंभर व पाचशेच्या नोटांची छपाई होते. दिवसाला १५ ते १८ दशलक्ष नोटांछापल्या जातात. नाशिक प्रेसमधील नोटा ट्रक आणि रेल्वे वॅगनने रिझर्व्ह बँकेच्या देशातील १८ केंद्रांमध्ये जातात. रोज दोन- तीन वॅगन नोटा रवाना होतात. चलनव्यवस्थेत आजही महत्व राखून असलेल्या या छापखान्यात चोरी होणे हा देशाच्या सुरक्षिततेवर हल्ला असल्याचं मानलं जातं. अगदी दिल्लीत देखील सध्या हीच चर्चा आहे.

अशावेळी प्रश्न पडतो कि भारतातला नोटांचा पहिला छापखाना नाशिक येथेच का आहे? 

नाशिकच्या करन्सी छापखान्याचा इतिहास जाणण्यासाठी आपल्या शंभर वर्षे मागे जावे लागेल. तेव्हा भारतात इंग्रजांचं राज्य होतं. भारताच चलन इंग्रजांच्या हातात होतं. ते इंग्लंडमध्ये छापून यायचं. जेव्हा भारताची राजधानी त्यांनी कलकत्त्याहून दिल्लीला हलवली तेव्हा भारतात अनेक सुधारणा आणण्यास देखील सुरवात झाली.

प्राचीन काळापासून धार्मिक महत्व असलेल्या नाशिक गावाचं खरं स्थित्यन्तर घडलं इंग्रजांमुळे.

 मुंबई दिल्ली या दोन महानगरांना जोडणारी रेल्वे हे इंग्रजांनी नाशिकवरूनच नेली होती. इथे जवळच देवळाली लष्करी कॅम्प वसवलं होता. भारताच्या मध्यवर्ती असलेल्या या शहरात औद्योगिकीकरणास सुरवात याच काळात झाली. अनेक उद्योग वसत होते. धार्मिक तोंडवळा असलेल्या गावाचं रूप बदलत होतं. 

अशातच इंग्रजांनी १९२५ साली नाशिक मध्ये सिक्युरिटी प्रेस सुरु करायचं ठरवलं.

कारण होते भारतातले मोठमोठे उद्योगपती. नव्याने सुरु असलेल्या उद्योगांची भरारी देखील वाढली होती, व्यापार वाढला, आयात निर्यात वाढली. देशात चलनाचा तुटवडा पडत होता. प्रत्येक वेळी बँक ऑफ इंग्लंडकडे नोटांसाठी वाट बघत राहणे भारताला परवडत नव्हते. अशातच इंग्रजांनी भारतात इंपिरियल बँकेची स्थापना मध्यवर्ती बँक म्हणून केली होती. पण तिला अजूनही चलन छापण्याचे अधिकार नव्हते.

भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना व्हावी हि सुद्धा मागणी सुरूच होती पण त्याच्याही आधी नोटा छापणारे छापखाने सुरु व्हावेत असा आग्रह इंडियन मर्चंट चेम्बर व ब्युरोने धरला. शेवटी तत्कालीन व्हाइसरॉयने या मागणी पुढे मान तुकवत याबद्दल काही करता येईल का याची चाचपणी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला.

१९२२ साली मुंबईच्या टांकसाळीचे प्रमुख असलेले लेफ्टनंट कर्नल जी.डब्ल्यू.विलास आणि भारतीय सरकारचे प्रिंटिंग व स्टेशनरीचे कंट्रोलर एफ.डी.असुली या दोघांचा या आयोगात समावेश करण्यात आला होता. त्यांच्या रिपोर्टनुसार एका सिक्युरिटी प्रेसची टेस्टिंग करून उभारणी करायचं ठरलं.

१९२५-२६ साली भारत सरकारने बँक ऑफ इंग्लंडसोबतच करार रद्द केला आणि १ जानेवारी १९२८ सालापासून नाशिकच्या मुद्रणालयात छापल्या जाणाऱ्या नोटा वापरल्या जाणार असं नक्की झालं.

या सिक्युरिटी प्रेस साठी नाशिकचीच निवड का केली याला दोन कारणे होती.

पहिलं कारण म्हणजे नाशिकचे हवामान. इथल्या हवामानात अचानक कोणताही बदल व्हायचा नाही. एकदम भला मोठा पाऊस आलाय, अचानक तापमान वाढलंय किंवा कमी झालंय असं कधी घडत नसे. त्यामुळे इथला दमटपणा, हवेतली आर्द्रता याचं प्रमाण छपाईखान्यासाठी एकदम परफेक्ट होतं.

याशिवाय आणखी एक कारण म्हणजे नाशिक रोड हे संपूर्ण देशाला जोडलं जाणारं स्टेशन होतं. देशाच्या मध्यवर्ती असल्यामुळे  नोटांचा पुरवठा करणे  देखील सोपं होतं. शिवाय देवळालीला सैनिकी छावणी असल्यामुळे काही गडबड झाल्यास लष्कराला हालचाल करणे देखील सोपे जाणार होते.

या सगळ्या कारणांमुळे नाशिकची निवड झाली. नाशिक रोड स्टेशन जवळ सिक्युरिटी छापखाना सुरु करण्यात आला. आधी तिथे पोत्साची तिकिटे, स्टॅम्प व इतर सरकारी महत्वाची कागदपत्रे छापली जाऊ लागली, नंतर तिथेच मागच्या भागात नोटांच्या छपाई साठी मुद्रणालय सुरु करण्यात आले.

या छापखान्यात तयार झालेली पहिली नोट पाच रुपयांची होती. २८ ऑक्टोबर १९२८ रोजी कानपुर सर्कलमध्ये या नोटा वितरित करण्यात आल्या. पाच रुपयांच्या पाठोपाठ शंभर रुपयांची नोट देखील नाशिक रोडच्या छपाईखान्यात तयार होऊ लागल्या.

स्वातंत्र्यानंतर नाशिकच्या छापखान्याचा लोड कमी करण्यासाठी म्हैसूर, हैद्राबाद, होशंगाबाद, शाहबनी येथे देखील असे छपाईखाने उभे राहिले. मात्र आजही नाशिकच्या करन्सी नोट प्रेसचे महत्व अबाधित आहे. दोन हजार ची नोट वगळता सगळ्या चलनी नोटा इथेच तयार होतात.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.