नाशिकच्या साखर कारखान्याने भारतातला पहिला चॉकलेट ब्रँड बनवला: रावळगाव

आपल्या पिढीच बालपण एका विचित्र स्थित्यंतरातून गेलं. जागतिकीकरण नुकतच जाहीर झालेलं. परदेशी ब्रँडेड कंपन्या भारतात याव की नको असं करत करत चाचपडत पाऊल टाकत होत्या तर जुन्या भारतीय कंपन्या देखील त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःमध्ये अत्याधुनिक बदल करत होत्या. यातच होती चॉकलेट इंडस्ट्री.

टीव्हीवर एक अॅड लागायची, गोऱ्या घाऱ्या डोळ्यांची अर्चना जोगळेकर नाक फेंगाडत कोणाला तर रागवायची,

“शादी और तुम्हसे कभी नही.”

मग यायचा रावलगाव का पान पसंद. पान का स्वाद गजब की मिठास!! हे खाऊन अर्चना जोगळेकरचा मूड चेंज व्हायचा. तेच सेम शब्द अगदी लाजत मुरडत म्हणायची. पान पसंदचे अशा अनेक जाहिराती तेव्हा आल्या होत्या. रावळगाव एक मोठा ब्रँड होता.

त्यांच्या रावळगाव लिहिलेल्या पारदर्शक कागदामध्ये लाल, ऑरेंज, गोळ्या फेमस होत्या. पण मँगो मूड, पान पसंद या गोळ्यांनी आमच बालपण रंगीत केलेलं.

शाळेत जाताना पांढरा शर्ट आणि खाकी चड्डीच्या खिशामध्ये ही गोळी असायचीच, कोणाचा वाढदिवस असला की स्वस्तात मस्त असलेल्या याच गोळ्या कामी यायच्या. आजही कॅडबरी सिल्कच्या जमान्यात आपल्या पैकी प्रत्येकाला हे रावळगाव चॉकलेट आठवते.

पण रावळगाव गोळीची सुरवात कशी झाली हे माहित आहे काय? 

या चॉकलेट फॅक्टरीची स्थापना केली महाराष्ट्राचे भाग्यविधाते उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जहाजनिर्मिती कारखाना, लढाऊ विमाने बनवणारा हिंदुस्तान एरोनीटिक्स, रायफल कंपनी, कार बनवणारी प्रीमियर कंपनी सुरु करणारे वालचंद हिराचंद यांना चॉकलेट बनवावंस का वाटलं असेल?

वालचंद यांचे वडील सोलापुरातील मोठे अडत व्यापारी. वालचंद यांना त्या धंद्यात काही रस नव्हता. त्यांनी रेल्वेचे कंत्राट घेण्याच काम सुरु केलं. बार्शी लाईट रेल्वेलाईन टाकली. यानंतर बांधकाम व्यवसायात पडले. त्यात मिळालेल्या यशानंतर या दूरदृष्टीच्या उद्योगपतीने फक्त महाराष्ट्राच नाही तर भारताच भविष्य घडवणाऱ्या उद्योगधंद्याची सुरवात केली.

साधारण एकोणीसशे वीसच्या दशकात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथे जवळपास दीड हजार एकर जमीन त्यांना स्वस्तात मिळाली.

काहीही न पिकणारी पड पडलेली जमीन त्यांना अगदी नाममात्र किंमतीत मिळाली तर खरी पण तिथे करायचं तरी काय हा मुख्य प्रश्न होता. त्यांनी वेगवेगळ्या कृषीतज्ञांना, भूगर्भशास्त्रतज्ञांना बोलावलं. तिथे काय करता येईल याचा अभ्यास केला.

शेजारहून वाहणाऱ्या गिरणा कालव्याचा वापर करून जमीन पिकाऊ बनवण्यासाठी मेहनत घेण्यात आली. मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली, ती यशस्वी देखील झाली.

अखेर १९३३ साली तिथे रावळगाव शुगर फार्म लि नावाचा साखर कारखाना उभारण्यात आला. 

इंग्रजांच्या राजवटीचा काळ. अजून राज्यात सहकारी कारखान्याची सुरवात व्हायची होती. पूर्ण भारतात जवळपास ३० कारखाने होते. एवढ काय आपल्या इथल्या लोकांना साखर खाण्याची सवय नव्हती. चहाचा गृहप्रवेश हळूहळू होत होता. मग ही साखर खपणार तर कशी?

वालचंद यांनी आयडिया काढली की आपणच आपल्या साखरेपासून चॉकलेट गोळ्या बनवायच्या. 

साधारण १९४० च्या दरम्यान पहिल्यांदा खडीसाखरेचा प्रयोग केला. मग त्यात काही बदल करत गोळ्या, टॉफी, पेपरमिंट व इतर तत्सम वस्तूंची निर्मिती करता येईल का याची चाचपणी झाली. रावळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळ्यांचा कारखाना सुरु करण्यात आला. त्या गोळीला नाव देताना इथल्या गावच्या मातीची आठवण ठेवण्यात आली होती.

“रावळगाव”

पुढची अनेक वर्ष या नावाने गाजवली. भारताच्या गोळ्या चॉकलेटचा पहिला अधिकृत ब्रँड म्हणून रावळगाव आजही ओळखला जातो. 

अख्ख्या महाराष्ट्राच राजकारण हलवणाऱ्या साखर कारखाना उद्योगाची सुरवात वालचंद हिराचंद यांनी केलीच. पण आपण उत्पादन केलेला माल खपवण्यासाठी मार्केट कस तयार करायचं याचा एक आदर्श घालून दिला. त्यांनी त्याकाळात केलेलं मार्केटिंग ते नव्वदच्या दशकात फॉरेनच्या ब्रँडनां टक्कर द्यायला केलेल्या आक्रमक जाहिराती, क्वालिटी आणि मार्केटिंग या दोन्ही बाबतीत रावळगाव कधीच कमी पडल नाही.

पण वयोमानानुसार या चॉकलेटगोळीने देखील दम टाकला.

रावळगाव चॉकलेट बनलं यागोष्टीला आज जवळपास ऐंशी वर्षे झाली. अजूनही तुरळक ठिकाणी हे चॉकलेट मिळते. आपल्या अनेक पिढ्या या चॉकलेट गोळ्या खाऊन मोठ्या झाल्या. पण आपली पुढची पिढी तिची चव घेऊ शकेलं का माहित नाही. पण आपण ती गोड साखराळ चव विसरू शकणार नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.