आपल्यापेक्षा १४ वर्ष मोठ्या पाकीस्तानी मुलीच्या तो प्रेमात पडला……

सिनेमा कोणताही असो, भुमिका कितीही मोठी अथवा छोटी असो. कोणताही सिनेमा स्वतःच्या अभिनयाने व्यापुन टाकणारा भारतीय सिनेसृष्टीतला एक प्रतिभासंपन्न कलाकार म्हणजे नसीरुद्दीन शाह.

आज नसीरचा वाढदिवस. नसीरने वयाची सत्तरी ओलांडली आहे. गेली चाळीसहून जास्त वर्ष तो सिनेइंडस्ट्रीत स्वतःचं विशेष स्थान टिकवुन आहे. 

नसीरच्या काॅलेजच्या वेळची गोष्ट. अलीगढ विद्यापीठात नसीर कला शाखेत शिकत होता. याचवेळी शिकताना परवीन मुराद या तरुणीबरोबर नसीरची गाठ पडली. नसीर त्यावेळी २० वर्षांचा तर परवीन ३४. वयाचं बंधन न येता दोघांमध्ये प्रेम जुळलं. 

परवीनचं कुटूंब फाळणीआधी कराचीत राहत होतं. परवीनची आई अलीगढ विद्यापीठात शिकवत होती. फाळणीनंतर परवीनचे बाबा पाकीस्तान मध्ये स्थायिक झाले. परवीनला भारतात आईसोबतच राहायचं होतं. परंतु तिचा स्टुडन्ट व्हिसा संपत आला होता. भारतात राहण्यासाठी परवीनला एकच पर्याय होता तो म्हणजे लग्न करणं किंवा जास्त शिकणं. 

अलीगढ विद्यापीठातुन अधिकाधिक कोर्समध्ये ती शिकायचा प्रयत्न करत होती. याचदरम्यान परवीनने नसीरला दिल्लीमधील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा येथे शिकण्यास प्रोत्साहन दिले. परवीनच्या पाठिंब्यामुळे नसीरने NSD मध्ये प्रवेश घेतला. नसीरच्या अभिनयाला NSD मुळे दिशा मिळत गेली.

१ नोव्हेंबर १९६९ रोजी नसीरने परवीनसोबत लग्न केलं आणि तो NSD मध्ये शिकुन अलीगढ विद्यापीठाच्या हाॅस्टेलमध्ये राहू लागला. 

फाळणीमुळे भारत-पाकीस्तान संघर्षाचा तो काळ होता. पाकीस्तानी नागरीकांना भारतात इतकी चांगली वागणुक मिळत नव्हती. परवीनने मुलीला जन्म दिला. तिचं नाव हिबा. नसीर अजुनही शिकत असल्याने मुलीचा सांभाळ करायला तो मनाने तयार नव्हता.

आता जास्त वेळ भारतात राहणं शक्य नसल्याने परवीन हिबासह लंडनला गेली. 

नसीर थिएटरमध्ये चांगली प्रगती करु लागला. नसीरला सिनेमे सुद्धा मिळु लागले. सिनेमांमध्ये छोट्या छोट्या भुमिका करणा-या नसीरच्या आयुष्याला १९७५ हे कलाटणी देणारं वर्ष ठरलं. याच साली विजय तेंडुलकर लिखित श्याम बेनेगलांचा ‘निशांत’ सिनेमा आला. या सिनेमात नसीरने विश्वम हि भुमिका साकारली. ‘निशांत’नंतर नसीरला एकाहुन एक सिनेमे मिळत गेले. 

याच काळात सत्यदेव दुबे एक थिएटर वर्कशाॅप करत होते. या थिएटर वर्कशाॅपमध्ये नसीरचा सहभाग होता. वर्कशाॅपदरम्यान रत्ना पाठक आणि नसीरची मैत्री झाली. रत्ना त्यावेळी NSD मध्ये दुस-या वर्षाला शिकत होती.

रत्नासोबत नसीरची मैत्री वाढली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

नसीरची पहिली पत्नी लंडननंतर इराणला स्थायिक झाली. तिच्यात आणि नसीरमध्ये काहीच संभाषण उरलं नव्हतं. दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. १९८२ साली नसीर आणि रत्नाने लग्न केलं. दोघेही अभिनय क्षेत्रात असल्याने आनंदात जगत होते. 

एके दिवशी नसीरची पहिली पत्नी परवीनने नसीरला पत्र लिहिलं की , मुलगी हिबाला भारतात येऊन तुला भेटायचंय. हिबा भारतात आली. वडिलांना भेटली. जवळपास १२ वर्षानंतर बाप-लेकीची भेट झाली होती. हिबाने सुद्धा वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत NSD मध्ये अभिनय शिकला. काही मोजके सिनेमे आणि मालिकांमध्ये तिने काम केले.

लोकप्रिय मालिका ‘बालिका वधु’ मध्ये तिने कल्याणी देवी या व्यक्तिरेखेची तरुणवयातली भुमिका साकरली. रत्नाने सुद्धा नसीरच्या मुलीचा आनंदाने स्वीकार केला. हिबा आज रंगभुमीवर जास्त कार्यरत आहे. ती स्वतः नाटकं सुद्धा लिहिते. 

नसीरने आपलं संपुर्ण पुर्वायुष्य अगदी मोकळेपणाने स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी हे आत्मचरित्र ‘आणि मग एक दिवस’ या नावाने मराठीत अनुवादीत केलं आहे. नसीरची प्रत्येक गोष्टीवर स्वतःची अशी ठाम मतं आहेत. हि मतं ढोबळमानाने नसुन या मतांना एक अभ्यासपूर्ण पार्श्वभूमी आहे. 

सिनेइंडस्ट्रीबद्दल त्याला अनेक गोष्टी खटकतात. खटकणा-या गोष्टी नसीर वेळोवेळी बोलुनही दाखवतो. या वयातही नसीर रंगभुमीला आणि नाटकांना आवर्जुन वेळ देतो. ‘जसं गायकाला रियाजाची आवश्यकता आहे तसंच नाटक करणं हा माझ्यासाठी अभिनयाचा रियाज आहे’, असं नसीरचं मत आहे.

वरवरचा दिखावा करण्यापेक्षा जे कलाकार सच्चा अभिनय करतात अशा कलाकारांसाठी नसीरुद्दीन शाह हा कलाकार अभिनयाचं विद्यापीठ आहे. कवी-गीतकार गुलजार साब नसीरच्या अभिनयाचं वर्णन करताना लिहितात, 

मैं अदाकार हूँ लेकिन

सिर्फ अदाकार नहीं

वक़्त की तस्वीर भी हूँ

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.