मॅन ऑफ द मॅचचा चेक त्यानं पाणीपुरी विकणाऱ्याला दिला होता….

क्रिकेटमध्ये प्रत्येक संघात असा एखादा खेळाडू असतोच ज्याच्या बॅटिंगची वाट सगळेच पाहत असतात, अनेकद संघ अडचणीत सापडल्यावर तो खेळाडू आपल्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या बळावर संघाला विजय मिळवून देतो. आजचा किस्सा आहे न्यूझीलंडच्या अशाच एका खेळाडूचा जो नाईंटीजमधल्या लोकांचा आवडता खेळाडू होता.

नॅथन ऍस्टल हा न्यूझीलंड संघाला आजवर मिळालेला बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू होता.

संघाचा कणा म्हणून तो खेळायचा. न्यूझीलँडच्या संघातील सगळ्यात मोठा विश्वासू खेळाडू म्हणून नॅथन ऍस्टल प्रसिद्ध होता. नॅथन ऍस्टलच्या येण्याने न्यूझीलँडच्या बॅटिंग ऑर्डरला एक बळकटी मिळाली होती. नॅथन ऍस्टलच्या कव्हर ड्राइव्हचे क्रिकेट शौकीन मोठे फॅन होते. 

नॅथन ऍस्टलला स्थानिक क्रिकेटचा बादशहा समजलं जायचं. त्याच्या ऑलराउंडर प्रदर्शनाच्या जोरावर न्यूझीलँडच्या निवड समितीने त्याला संघात स्थान दिलं. पण नॅथन ऍस्टलला संधीच सोनं करता येत नव्हतं. बॅटिंगमध्ये तो ६ व्या नम्बरवर खेळायला यायचा त्यामुळे त्याला लय सापडत नव्हती. शेवटी श्रीलंकेविरुद्धच्या एका मॅचमध्ये नॅथन ऍस्टल ओपनर म्हणून खेळायला आला तेव्हा त्याने ९५ धावांची जबरी खेळी केली होती.

याच कामगिरीच्या जोरावर त्याला १९९६ सालच्या न्यूझीलंड वर्ल्डकप टीममध्ये निवडण्यात आलं. या वर्ल्डकपसाठी तो भारतात आला पण या आधी त्याच्या वयक्तिक आयुष्यात एक दुःखद घटना घडली होती. त्याच्या आजोबांचं दोनच दिवसांपूर्वी निधन झालं होतं. नॅथन आपल्या आजोबांचा फार लाडका होता. त्यांनी त्याला शेवटच्या भेटीत वर्ल्ड कपमध्ये शतक ठोक असं सांगितलं होतं. तो त्यांचं हे स्वप्न पूर्ण करायचंच या इराद्याने भारतात आला.

न्यूझीलंडची पहिलीच मॅच अहमदाबादच्या मोटर स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होती.

याच काळात एकदा नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना नॅथन ऍस्टलला काही लोकं बॉलींग करत होते. हे सगळे लोकल बॉलर होते. त्याच वेळी एका २३ वर्षाच्या भारतीय मुलाला नॅथन ऍस्टलला बॉलिंग करण्याची संधी मिळाली. तो मुलगा होता भारत शहा, मुळात तो एक पाणी पुरी विकणारा गडी होता. नॅथन ऍस्टलला १ ओव्हर बॉलिंग करण्याची संधी भारत शहाला मिळाली.

भारत शहा यांना हि सुवर्णसंधी वाटलेली. भारत शहा हे एक फास्टर बॉलिंग करत होते. नॅथन ऍस्टल ज्यावेळी बॅटिंग करत होता त्यावेळी भारत शहा यांनी सुरवातीचे तीन बॉल बिट केले. नॅथन ऍस्टल भारत शहा यांच्या बॉलिंगवर चांगलाच इम्प्रेस झाला.

वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात नॅथन ऍस्टलने धमाकेदार बॅटिंग केली. या मॅचमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर नॅथन ऍस्टलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. नॅथन ऍस्टलने हा मॅन ऑफ द मॅचचा चेक थेट भारत शहा यांना नेऊन दिला.

पाणी पुरी विकणाऱ्या भारत शहा यांना विश्वास बसत नव्हता कि नॅथन ऍस्टल खुद्द त्याचा चेक मला देतोय म्हणून. दुसऱ्या दिवशी हे प्रकरण चांगलंच गाजलं नॅथन ऍस्टलच्या उदारपणामुळे आणि भारत शहा यांच्या बॉलिंग कौशल्यामुळे.

आपल्या आजोबांसाठी मारलेल्या शतकाचं बक्षीस त्याने अनोळखी पाणीपुरीवाल्याला देऊन टाकलं.

नॅथन ऍस्टल हा भारतात तेव्हा या कारणामुळे प्रचंड फेमस झाला होता. न्यूझीलँडचा तो महत्वाचा खेळाडू तर होताच पण या घटनेमुळे जगभरात त्याच कौतुक लोकांनी केलं होतं. बॅटिंग आणि बॉलिंग यांचं बेस्ट कॉम्बिनेशन न्यूझीलँडला नॅथन ऍस्टलच्या रूपाने मिळालं होतं. पुढे भारत शहा यांनी नॅथन ऍस्टलचे आभारसुद्धा मानले होते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.