१०० टेस्ट मॅचेस खेळणारा नेथन लायन आधी साधा ग्राऊंड्समन होता

ऑस्ट्रेलियन बॉलर्स म्हणलं की, धडकी भरवणारा वेग, डोळ्यांसमोरून जाणारे खतरनाक बाऊन्सर्स आणि समोरच्या बॅटरला बॉल लागला तरी खुन्नस देण्याची पद्धत या गोष्टी फिक्स आठवतात. याच ऑस्ट्रेलियात स्पिनर्सची पण हवा होऊ शकते हे पहिल्यांदा शेन वॉर्ननं सिद्ध केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये १००१ विकेट्स घेणाऱ्या वॉर्नचा एक वेगळाच दरारा होता.

वॉर्नच्या रिटायरमेंटनंतर, ऑस्ट्रेलिया चारही दिशांना स्पिनर्स शोधत होती. त्यांनी जवळपास ११ स्पिनर्स ट्राय करून पाहिले. ज्यातला एक स्टीव्ह स्मिथही होता. अखेर २०११ मध्ये कांगारूंचा शोध संपला आणि त्यांना गोल्डन आर्म घावलाच. त्याचं नाव नेथन लायन.

लायन काय वॉर्नसारखा लेग स्पिनर नाही, तो टाकतो ऑफ स्पिन. पण चटाचट विकेट मिळवणं असुद्या किंवा किंचाळून अपील करणं, लायन कणभर सुद्धा कमी पडत नाही.

मध्यम उंची, मैदानावरच्या कुठल्याही कोपऱ्यातून चमकणारं टक्कल, नाकापासून गालापर्यंत चोपडलेली पांढरी क्रीम आणि अंपायरसमोर दोन्ही गुडघे टेकवून अपील करायची लय भारी पद्धत असं लायनचं वर्णन करता येतं. आता आपल्या आडनावाप्रमाणं तो खुंखार वैगरे वाटत नाही, पण एकदा का बॉल वळायला लागला की भल्याभल्या बॅटर्सला क्रीझवर लेझीम खेळायला लावतो.

जशी भारतात डोमेस्टिक क्रिकेटची उज्ज्वल परंपरा आहे, तशीच ऑस्ट्रेलियातही. तिकडं शेफील्ड शिल्ड स्पर्धेला लय महत्त्व. कार्यकर्ता किती पाण्यात आहे हे त्याच्या शिल्डमधल्या कामगिरीवर ठरतं. शेफील्डच्या आधीच देशांतर्गत टी२० क्रिकेट खेळताना लायनचं नाव गाजलं. त्यानंतर त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं आणि पुढच्या सात महिन्यात नेथन लायनला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची शान असणारी ‘बॅगी ग्रीन’ कॅप मिळाली. श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली.

टेस्ट क्रिकेटमधला पहिला बॉल

तुम्हाला क्रिकेट लय मनापासून आवडत असेल, तर जरा विचार करा. आपल्या देशाकडून खेळायचं हे स्वप्न आपण पाहिलं असणारच. त्यात आपण बॉलिंग करत असलो, तर आणखी एक वाढीव स्वप्न असतं ते म्हणजे पहिल्याच बॉलवर विकेट घेणं. लायन टेस्ट क्रिकेटमध्ये बॉलिंगला आला, तेव्हा क्रीझवर होता कुमार संगकारा. लायननं आपल्या पहिल्याच बॉलवर काय केलं? तर संगकाराची विकेट घेतली. त्याच लहानपणापासून पाहिलेलं स्वप्नं पूर्ण झालं असणार, फिक्स!

त्यानंतर लायनची गाडी अगदी सुसाट सुटली. त्यानं जवळपास अडीच वर्षात १०० टेस्ट विकेट घेऊन दाखवल्या. या दरम्यान ऑस्ट्रेलियन टीम भारतात आली, आपल्या धोनी आणि कंपनीनं त्याला लई धुतलं. काही काळ त्याला टीममधून बाहेर बसावं लागलं खरं, पण त्यानं दणक्यात कमबॅक केला.

ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात हिट ऑफस्पिनर होता ह्युज ट्रम्बल. त्याच्या नावावर १४१ विकेट्स होत्या. लायननं २०१५ मध्ये आपली १४२ वी विकेट घेतली आणि त्याला नाव पडलं GOAT. Greatest Of All Time.

लायन बॉलिंगला आला की, ऑस्ट्रेलियाचे प्लेअर्स ‘Niiiccceee Garry’ असं चिअरिंग करत असतात. फुटबॉलपटू गॅरी लायनच्या नावावरून त्याला ‘गॅरी’ हे टोपणनाव मिळालंय. आता जितके ऑस्ट्रेलियन प्लेअर्स वांड तितकेच चाहतेही. त्यांनी ठरवलं की बॉक्सिंग डेच्या दिवशी (म्हणजेच २६ डिसेंबरला) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या टेस्ट मॅच दरम्यान एक वर्ल्ड रेकॉर्ड करायचं. त्या मॅचमध्ये लायन आपला तिसरा बॉल टाकेल तेव्हा सगळ्यांनी एका सुरात ‘Niiiccceee Garry’ असं ओरडायचं. फेसबुक, ट्विटर सगळ्या सोशल मीडियावर प्लॅन रेडी झाला.

लायननं आपल्या तिसऱ्या बॉलवर समी अस्लमची विकेट घेतली आणि सगळ्या एमसीजीत तुफान कल्ला झाला.

भारताविरुद्ध झालेल्या सिरीज दरम्यान लायन आपली शंभरावी टेस्ट मॅच खेळला. भारतानं त्याचा खास टीशर्ट देऊन सन्मानही केला. कधीकाळी हाच लायन, कॅनबेराच्या ग्राऊंडवर ग्राऊंड्समन म्हणून काम करायचा. तिकडून त्यानं ॲडलेड स्टेडियमवर क्युरेटर म्हणून काम करायला घेतलं. आता ग्राऊंड्समनचं काम असतं ग्राऊंडवर पाणी मारणं, पिचवर रोलिंग करणं, गवताची लेव्हल पाहणं.

कधी हे काम करणारा लायन आज त्याच गवतावर राज्य करतोय. टेस्ट विकेट्सच्या रकान्यात आता ३९९ विकेट्स आहेत, आगामी ॲशेस सिरीजमध्ये तो ४०० विकेट्सचा ट्प्पा गाठेल आणि मैदानावरचे प्रेक्षक पुन्हा एकदा ओरडतील…

‘Niiiccceee Garry!’

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.