योगी आदित्यनाथ ज्याचे पाईक आहेत तो ‘नाथसंप्रदाय’ हिंदू-मुस्लिम एकतेचा वारसा सांगतो

उसाच्या रसवंतीगृहावरती तुम्ही ज्यांचे चित्र नेहमी पाहता त्या कानिफनाथ यांच्या संप्रदायाने देशात आणि महाराष्ट्रात कधीकाळी मोठे स्थित्यंतर घडवले होते. लहानपणी कदाचित तुम्ही देवळात सर्वांसोबत पोथी वाचायला किंवा एखाद्या देवघरात अजूनही फोटोत 9 साधूंचा जथ्था सोबत पाहता तेव्हा खरंतर एकेकाळी सगळा भारत गाजवणाऱ्या व भारतातील विविध तत्वज्ञान यांचा संगम करून उदात्त विचारसरणीचा पाया घालणाऱ्या या साधूंचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

हा संप्रदाय म्हणजेच नाथ संप्रदाय.

खरेतर नाथ संप्रदायाला दक्षिण आशियातल्या सगळ्याच देशांमध्ये नेहमीच राजकारण व समाजकारण यांच्यातील एक महत्त्वाचा समुदाय म्हणून महत्त्व प्राप्त आहे. भारतासह आजूबाजूच्या देशांमध्ये नाथ संप्रदायाचा प्रभाव अजूनही आढळतो. नाथ म्हणजे रक्षण करणारा किंवा स्वामी किंवा मालक असा याचा अर्थ होतो आणि अशा रक्षण करणाऱ्या लोकांचा संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय.

तेराव्या शतकामध्ये शैवसंप्रदायतील योगींच्या काही गटांनी आदिनाथ गोरक्षनाथ महाराजांच्या नेतृत्वाखाली हा पंथ स्थापन केला होता. नाथ संप्रदायाला अवधूत संप्रदाय असेही म्हणतात. या संप्रदायाचा संबंध महाराष्ट्रातील जवळपास सर्व इतर संप्रदायांची व भक्ती चळवळीशी अगदी जवळचा आहे. यासंबंधी ज्ञानेश्वर महाराजांनीही भाष्य केल्याचे आढळते.

श्री गुरु परंपरा सांगताना ज्ञानेश्वर यांनी सांगितलेल्या अभंगात त्यांनी आपल्या नाथपरंपरेचा वारसा निवृत्तीनाथ यांकडे असल्याचे सांगितले आहे.

आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा । मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य ।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।
गहीनिप्रसाडे निवृत्ती दातार । ज्ञानदेवे सार चोजाविले ।।

ही परंपरा केवळ महाराष्ट्रातील नाथ परंपरेचीच आहे. यासंबंधीची कथा सांगण्यात येते, जेव्हा विठ्ठलपंत कुलकर्णी आपल्या चारही मुलांना घेऊन रानावनातून चालले होते. तेव्हा त्यांचा एके ठिकाणी वाघाशी सामना झाला आणि धावपळीत सर्व कुटुंब एका बाजूला आणि निवृत्तीनाथ महाराज एका बाजूला निघून गेले. ते एका गुहेत जाऊन लपले.

त्या गुहेमध्ये नाथ संप्रदायातील काही योगी साधूंचा वास होता. योगींनी निवृत्तिनाथांना दीक्षा देऊन त्यांना नाथ परंपरेत समाविष्ट करून घेतले. पुढे आपल्या भावंडांजवळ परतल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना देखील नाथसंप्रदायाची दीक्षा दिली.

एकीकडे विठ्ठलाच्या रूपाने वैष्णव भक्तीचा संप्रदाय व दुसरीकडे आपल्या भावाकडून मिळालेली शैवसंप्रदायाला मानणाऱ्या नाथसंप्रदायाची दीक्षा यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना दोन्ही पंथातील चांगल्या शिकवणुकीचा पाया एकत्रित करून वारकरी संप्रदायाची स्थापना करता आली.

ज्ञानेश्वरांचे पणजे त्र्यंबकपंत यांना गोरखनाथांचा कृपाप्रसाद होता असेही सांगण्यात येते.

खरं सांगायचं झालंच तर महाराष्ट्राला आपण एक स्वतंत्र समांतर संस्कृती असल्याची व व स्थानिक संस्कृतीच्या, भाषेच्या अभिमानाची पहिली ओळख नाथ संप्रदायाने करून दिली. ज्या ठिकाणी राहील तेथील संस्कृती आत्मसात करत तेथील भाषांमध्ये आपल्या रचना सादर करण्याची लोकांना सोडून राहण्याची माणुसकी या पंथात आढळते.

दत्त संप्रदायालाही अवधूत संप्रदाय नाव असल्याने तसेच दक्षिण भारतातील शरण परंपरा यांचा वारसा विसोबा खेचर या ग्रेट माणसामार्फत थेट वारकरी संप्रदायात येत असल्याने नाथ संप्रदायाने महाराष्ट्राच्या प्रबोधनात एक महत्त्वाची भूमिका पार पाडली असे म्हणता येईल.

शरणपरंपरेविषयी आणि त्याच्या वारकरी संप्रदायवरील प्रभाव याविषयी नंतर कधीतरी सविस्तर बोलू भिडू!

ज्ञानेश्वर महाराजांनी आपली परंपरा सांगतांना हा वरील अभंग रचला आहे. उर्वरित उत्तर भारतामध्ये मात्र त्यांच्या उगमाची एक वेगळी परंपरा सांगण्यात येते. म्हणूनच महाराष्ट्रात स्वतंत्रपणे नऊ साधूंची नवनाथ परंपरा वाढीस लागली.

चक्रधर स्वामी ही आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात नाथ संप्रदायाला मानणारे होते असे काही लोक मानतात.

ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायी होते. ज्ञानेश्वरी च्या पारायणाला बसणाऱ्या कोणालाही हे नव्याने सांगायची गरज नाही. कित्येक अभंगात ज्ञानेश्वरांनी नाथांचा उल्लेख केला आहे; एवढेच नाही तर ज्ञानेश्वरी हाच नाथ संप्रदायाचा कृपाप्रसाद आहे म्हणून त्यांनी निवृत्तीनाथांचा आदरपूर्वक उल्लेख केलाय.

भागवतामध्ये सांगितल्यानुसार ऋषभदेवाला एकूण १०० पोरं होती, त्यातली ९ संसारपाण्यापासून लांब गेलेली होती, तेच हे नऊ नारायण कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन. ह्याच नऊ पोरांचा कलीयुगामध्ये अवतार झाला त्यांची क्रमश: नावे त्यांनी जसजसा अवतार घेतला त्यानुसार पडली.

या प्रत्येक नाथाचा नावामध्ये एकेक नादखुळा कथा आहे.

प्रथम पुत्र कवी हा “मच्छेंद्रनाथ” या नावाने जन्मला.”अन्तरिक्ष” याने “जालंदर” या नांवाने जन्म घेतला. यांच्या शिष्य रुपाने प्रबुद्ध “कानिफा” या नांवाने अवतरीत झाला. कानिफा का तर या नाथाचा जन्म हत्तीच्या कानांमधून झाला. तुम्हाला जर कोणी

“तू काय हत्तीच्या कानांमधून आला आहेस का?”

असं म्हटलं तर त्याचा थेट संदर्भात कानिफनाथांच्या जन्माशी आहे. पिप्पलायन यांचा जन्म “चर्पटनाथ” नावाने झाला. यांना त्यांच्या सावत्र आईने दोन्ही हात व दोन्ही पाय तोडून चौरंगासारखे केले होते म्हणून त्यांना चौरंगीनाथ असे म्हणतात.

अविर्होत्र हा “नागेशनाथ” म्हणून अवतरित झाला. द्रुमिल याने “भर्तरीनाथ” या नावाने तर चमस हा “रेवणनाथ” या रुपात अवतरित झाला; आणि करभाजन गायीच्या शेना मधून किंवा उकिरड्यामधून आला म्हणून “गहनिनाथ” या नांवाने जन्मला.

अजूनही गावाकडे पोरांची नावे ह्या नाथांच्या नावावरून ठेवण्यात येतात मात्र ती एवढ्या क्लिष्ट शहरी भाषेत ठेवण्यात येत नाहीत इतकेच!

म्हणजे जालंदरचा गावात जालिंडर होतो नायतर गहिनीनाथ यांचा गैनी, रेवणनाथ यांचा रेवण्णा असं…

या सर्व नाथांचा भारतभर संचार होता मात्र महाराष्ट्रात आणि विशेषत: अहमदनगर जिल्ह्यात जास्त वास्तव्य झाले. यावेळी महाराष्ट्रामध्ये ज्या कोणत्याही मुगल अथवा मुस्लिम अथवा हिंदू राजांची सत्ता असेल, त्या सर्वांनी नाथ संप्रदायाला संरक्षण दिले. सर्व नवनाथांच्या समाध्या ह्या ” मुस्लिमाच्या तुर्बातीसारख्या (कबर ) होत्या . त्यामुळे यांचे पुजारी हिंदू आणि मुस्लिम असे दोन्हीही धर्माचे दिसतात .त्यामुळे सामाजिक ऐक्य टिकवले गेले.

इतकेच काय तर ही नाथ परंपरा मुळात कश्मीरमधल्या शारदा लिपीत ग्रंथ व्यवहार करणाऱ्या शैवसंप्रदाय याकडून तसेच तिबेट मधल्या बौद्ध संप्रदायाच्या काही विचारांना घेऊन हळूहळू दक्षिण भारतामध्ये सरकत आली व महाराष्ट्रात त्यांनी आपले बस्तान बसवले असेही म्हणण्यात येते.

पाकिस्तानात अजूनही शारदा लिपीतील काही लेख उत्खननात आढळतात.

खरे म्हणजे त्या काळात हिंदू बौद्ध मुस्लिम जैन अशा विविध संप्रदायाचे लोक एकत्रितपणे राहत असताना नाथ संप्रदायाच्या योगी साधूंनी कुणालाच न दुखावता सर्व धर्माचा एकत्रित विचार करता येईल, अशा न दिसणार्‍या एका देवाला मानायला सुरुवात केली व त्यामुळे समाजातील इतर झगडे मिटून एकत्रितपणे विविध संप्रदायाचे, धर्माचे लोक नाथसंप्रदायाच्या एका छत्राखाली एकत्र आले.

गोरक्षनाथ यांनी लिहिलेली गोरखवाणी नाथ संप्रदायाच्या सुरुवातीच्या काळातील वैचारिक प्रगतीची साक्ष देते हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मातील काही परंपरा स्वीकारत व दोन्ही धर्मातील बरेच परंपरा नाकारत ह्या संप्रदायाने हिंदू व मुस्लिम असे कोणतेही बिरुद न घेता स्वतःला योगी म्हणवून घेऊन आपली स्वतंत्र वाटचाल केली.

नंतर जेव्हा नाथ संप्रदायात तांत्रिक विद्याचे महत्व अधिकच वाढले तेव्हा हा धर्म सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाण्यास सुरुवात झाली.

योगी स्वताला हटयोगी म्हणून घेऊ लागले तसेच अनेक यंत्रांचा वापर करून जादूटोणा व गूढवादी साहित्याची निर्मिती करत शाक्त परंपरेला जास्त महत्त्व देत. सुरुवातीला या मताचा आदर करणाऱ्या चक्रधरस्वामी, कबीर, तुकाराम, एकनाथ, रामदास अशा कित्येक संतांनी नंतरच्या काळात नाथ संप्रदायावर जहरी टीका केली.

या गूढ प्रकारांमधील गोरखधंदा हा नाथ साधूंकडून केला जाणारा जादूटोण्याचा प्रकार ग्रामीण भागात अजूनही आढळतो. खरेतर गोरक्षनाथ यांच्या काही वचनांनाही गोरखधंदा म्हणण्यात येते. गोरक्षनाथांनी आपल्या एका गोरखधंद्यामध्ये म्हटले आहे –

“हिन्दू ध्यावहि देहुरा, मुसलमानना मसिता।
योगी ध्यावहि परम्पदा, जहा देहुरा न मसिता।
हिंदू अखाई रामम कुन, मुसलमानम खुदाई
योगी अखाई अलक कुन तहां राम अचाई ना खुदाई।”

अर्थ नीट समजून घ्या भिडू, गोरक्षनाथ म्हणतात हिंदू देवळात पूजा करतात व मुसलमान मशिदीमध्ये. या दोघांशी नाथ संप्रदायाला काही देणे घेणे नाही, त्यांचा परमात्मा वेगळा आहे. हिंदू रामाची पूजा करतात मुसलमान खुदाची, पण योगी ना रामाला ओळखतो ना खुदाला- त्याचा परमेश्वर वेगळा आहे.

मात्र उत्तर प्रदेश सरकार मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी या शब्दावर बंदी आणण्यासाठी कायदा केला होता.

नेपाळचे राजे पृथ्वीनारायण शाह व उदयपूर चे राजे मानसिंग हेही नाथसंप्रदायाचे पाईक होते. मानसिंग यांनी तर सलग चाळीस वर्षे आपल्या राज खजिन्यातून निघणाऱ्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा नाथ संप्रदायाला दान केला. हे नाथ योगी सत्तेशी खूपच जवळीक साधून असत व राजा राज्यकारभाराच्या काही बाबतीत त्यांच्याशी सल्लामसलत देखील करत असे.

मात्र जेव्हा ब्रिटिश शासन आले तेव्हा मात्र या योगी साधूंना सत्तेपासून दूर करण्यात आले. त्यांच्यावर लूटमार करणाऱ्या बंधू लोकांचा समूह म्हणून पहिले गेले एवढेच नाही, तर उदयपूर सारख्या शहरांमधून काही योगी साधूंना सैनिकी बळाने हुसकावून लावण्यात आले. कालांतराने जेव्हा हिंदू मुसलमान यांच्यातील दरी वाढत गेली तेव्हा जनसामान्यांवरचा या समुदायाचा पगडा कमी झाला.

आणि नंतर हे साधू एके ठिकाणी कसेबसे मठ टाकून आपले जीवन कंठू लागले- योगी आदित्यनाथ हेही याच संप्रदायातले.

गोरक्षनाथांच्या गोरखपुर या गावी त्यांचा मठ आहे. आदित्यनाथ यांच्यावरती श्रद्धा असणाऱ्या कट्टर हिंदुत्ववादी सर्व नागरिकांना उदारमतवादी विचारसरणीला नडायला आवडतं, मात्र ते स्वतः ज्या संप्रदायाचे पाईक आहेत, तो संप्रदाय मात्र याच्या अगदी उलट आपल्या शिष्य परंपरेत सर्व कठोर परंपरांना बाजूला सारत अति उदारमतवादीपणाने विविध गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेणारा आहे.

त्यांच्या गुरू अवैद्यनाथ (ज्याला कोणत्याही वैद्यांचा गुण येत नाही) यांनी पहिल्यांदा हिंदुत्व आणि मुसलमानांच्या विरुद्ध लढायची भाषा सुरू केली.

इतकेच नाही तर महाराष्ट्राला शिव्या देताना योगीजी एवढंही समजून घेत नाहीत की ज्या माणसाने आपल्या संप्रदायाची स्थापना केली त्या माणसाने आपल्या कार्यकाळात मूळ यूपीच्या गंगा नदीला गंगा न म्हणता

“महाराष्ट्रातील गोदावरी हीच खरी गंगा आहे”,

हे निक्षून सांगितले होते.

नवनाथ भक्तिसार संपायला येताना टाकीचा नवनाथ ग्रंथातच आढळतो-

एकदा सिंहस्थ कुंभमेळ्यात साठ हजार ऋषी सध्या जिला अहिल्या नदी म्हणतात, (ही आणि गोदावरी एकाच डोंगरावर उगम पावते आणि त्रंबकेश्वरमध्येच ती गोदावरीला मिळते) तिथं स्नान करीत होते. गुरू गोरक्षनाथ बारक्या पोराच्या रूपात तिथं आले व तेही स्नान करू लागले. त्या वेळी त्यांनी गोदावरीला “हर हर गंगे” अशी हाक दिली. बाकीचे ऋषी म्हणू लागले की ‘ही गंगा नाही, गोदावरी आहे. तू तिला गंगा कसे काय म्हणतोस? हा गंगा नदीचा अपमान आहे.’

त्या वेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली. त्या वेळी ऋषींनी माफी मागून विचारले, महाराज तुम्ही कोण आहात. तेव्हा गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. त्या टाईमापासून नाथसंप्रदाय आणि साधुलोक तिला गंगा मानतात आणि म्हणतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.