नेपाळी नाक म्हणून तिला चिडवलं गेलं पण पुढे ती नॅशनल क्रश बनली होती….
बॉलिवूडमध्ये तर एकच दणका उठलाय तो म्हणजे उठसूट ज्याला त्याला हिरो व्हायचंय. आधीच्या काळात ते जरा सोपं होतं कारण तिथं टॅलेंटला महत्व होतं पण आत्ता जरा गदारोळ झालेला दिसून येतो. पण जेव्हा प्रेक्षकांचा ओढा सिनेमाकडे वाढला होता तेव्हा हिरोईनला लोकं एकतर डोक्यावर घ्यायचे किंवा नाही पिच्चर आवडला तर शिव्याही घालायचे. असाच एक घटनाक्रम घडला होता माला सिन्हासोबत तर जाणून घेऊया
माला सिन्हा ही अशा हिरॉइन्सपैकी होती की जिने दीर्घकाळ काम केलं आणि लोकांच्या मनात अशी काही छाप उमटवली की अजूनही माला सिन्हा एकेकाळी सगळ्या भारताची नॅशनल क्रश बनली होती. बांग्ला सिनेमातून ती हिंदीत आली सुरवातीला अवहेलना झाली पण नंतर तिने कहर केला होता.
11 नोव्हेंबर 1936 साली नेपाळमध्ये माला सिन्हाचा जन्म झाला. त्यावेळी तिचं नाव आल्डा असं होतं पण शाळेतले पोरं तिला डालडा म्हणून चिडवायला लागले मग आईने तिचं नाव बदलून माला केलं.
माला सिन्हा अभिनेत्री असण्याआधी ती एक गायिका होती. ऑल इंडिया स्टेशनवर ती गायन करायची आणि याच माध्यमातून ती रुपेरी पडद्यावर आली. जय वैष्णो देवी या बांग्ला सिनेमातून तिने कामाला सुरुवात केली. बांगलामध्ये मालाला खरी ओळख मिळाली ती म्हणजे लोह कपाट या सिनेमातून. जेव्हा माला सिन्हा हिंदीत काम करायला आली तेव्हा मीनाकुमारी, नर्गिस, मधुबाला, नूतन यांनी बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवायला सुरवात केली होती. माला सिन्हाबरोबरच वैजयंती माला आणि वहिदा रेहमानसुद्धा आलेच होते.
बादशहा हा सिनेमा मालाला मिळाला आणि तिचं ऑफिशियल बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. पण सुरवातीचे बरेच सिनेमे फ्लॉप गेले, समीक्षकांनी मालाच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उभे केले. पण टीकाकार लोकांकड लक्ष न देता फुल्ल डेडिकेशनने मालाने आपलं काम सुरू ठेवलं. 1957 मध्ये आलेल्या प्यासाने मात्र मालाला लोकांच्या हृदयात स्थान दिलं. या सिनेमातला मालाचा अभिनय लोकांच्या काळजात रुतून बसलेला आहे.
60 च्या दशकात मात्र माला सिन्हाने हिट सिनेमांची मांदियाळी सिनेरसिकाना दिली. त्यात प्यासा, फिर सुबह होगी, उजाला, धर्मपुत्र, अनपढ़, आंखें, गीत, गुमराह, गहरा दाग, जहांआरा, अपने हुए पराये, संजोग, नीला आकाश, नई रोशनी, मेरे हुजूर, देवर भाभी, हरियाली और रास्ता, हिमालय की गोद में, धूल का फूल, कर्मयोगी आणि जिंदगी यांचा समावेश होतो.
माला सिन्हाने त्याकाळच्या प्रत्येक दिग्दर्शकासोबत काम केलं त्यात केदार शर्मा, बिमल राय, सोहराब मोदी, बी.आर. चोपड़ा, यश चोपड़ा, अरविंद सेन, रामानंद सागर, शक्ति सामंत, गुरुदत्त, विजय भट्ट, ऋषिकेश मुखर्जी, सुबोध मुखर्जी, सत्येन बोस होते आणि या लोकांनी मालाला हिरोईन बनवलं.
जस जसं वय वाढत गेलं तसं तस मालाने सिनेमात काम न करण्याचं ठरवलं कारण आजी, आई, काकू या रोलमध्ये तिला काम करायचं नव्हतं. पण पारिवारिक सिनेमे करून तिने लोकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं. बॉलिवुडमध्ये नेपाळी नाक आहे म्हणूनसुद्धा तिला चिडवलं गेलं पण सुपरहिट सिनेमांमुळे ती भारताची नॅशनल क्रश बनली होती.
हे ही वाच भिडू :
- सत्ता गेली तरी बॉलिवुड इंदिरा गांधींच्या मागे ठामपणे उभा राहिला…
- बाप बॉलिवुडमधला मोठ्ठा माणूस असुनही त्यानं बापाच्या नावानं काम मिळवलं नाही..
- संघाचे स्वयंसेवक ते बॉलिवुडचा खतरनाक व्हिलन, अमरीश पुरींचे ते सात किस्से.
- कॉलेजमध्ये असताना देखील व्हिलन म्हणून दरारा होता. पास झाल्यावर गावाने मिरवणूक काढली होती…