गेली ६० वर्षे नटराजने भारतीयांवर उमटवलेला ठसा कोणत्याही खोडरबरने खोडता येणार नाही.

जून महिना सुरू झाला. एव्हाना शाळेच्या सुट्ट्या संपू लागल्या असायच्या. नव्या वर्गात जाण्याची तयारी सुरू व्हायची. नव्या वह्या, नवी पुस्तके, रेनकोट वगैरेच्या खरेदीची लगबग उठायची.

या सगळ्या खरेदीमध्ये एक वस्तू हमखास असायची,

लाल काळ्या रंगाची नटराज पेन्सिल.

म्हणजे भारतात काश्मीर पासून ते कन्याकुमारी जा, पाचवीच्या मुलाच्या कंपासपेटी असू दे अथवा मोठ्या कंपनीचा सीईओचे टेबल, प्रत्येक ठिकाणी नटराज शिसपेन्सिल दिसतेच.

अशा वेळी प्रश्न पडतो काय आहे या शिसपेन्सिलीचा इतिहास?

शिसपेन्सिलीचा शोध मध्ययुगात लागला. ईजिप्शियन व रोमन लोक प्राचीन काळी लेखनासाठी शिसे असलेल्या पेन्सिली वापरीत असत, असे उल्लेख आढळतात.

इ. स. १४०० च्या सुमारास बव्हेरियामध्ये ग्रॅफाइटाचा शोध लागला. त्यावेळी त्याला प्लंबॅगो (किंवा ब्लॅक लेड-काळे शिसे) म्हणजे ‘शिशाप्रमाणे कार्य करणारा’ हे नाव देण्यात आले.

पुढे इंग्लंडमध्ये याच ग्रॅफाईटपासून शिसपेन्सिली बनू लागल्या.

वापरासाठी सोयीच्या असलेल्या या पेन्सिली अल्पावधीतच जगभरात फेमस झाल्या. नेपोलियनच्या काळात फ्रांस आणि जर्मनी यांनी शिसपेन्सिलीनिर्मितीमध्ये आघाडी घेतली.

अमेरिकेत यंत्राद्वारे पेन्सिली बनवण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आणि मोठी क्रांतीच झाली.

या पेन्सिली टिकाऊ होत्या, कमी खर्चात, कमी कष्टात बनत होत्या. खोडता येत असल्यामुळे कच्चं काम करण्यासाठी, आकृती काढण्यासाठी या शिसपेन्सिलीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला.

इंग्रज भारतात आले येताना या शिसपेन्सिली देखील घेऊन आले.

भारतीयांसाठी तर हे वरदान ठरले. भारत हे शिसपेन्सिलीचं मोठं मार्केट बनलं.१९१५ मध्ये भारतात पहिला पेन्सिल कारखाना कलकत्ता येथे सुरू झाला.

त्यापूर्वी देशाची पेन्सिलीची गरज जपान, जर्मनी, इंग्लंड इ. ठिकाणाहून आयात करून भागविण्यात येई. १९१८ मध्ये मद्रास व १९३१ मध्ये कलकत्ता येथे प्रत्येकी एक असे दोन नवीन कारखाने सुरू झाले.

या कारखान्यांतून अल्पसे उत्पादन होई परंतु जर्मनी-जपान येथून आयात होणाऱ्या पेन्सिलींमुळे त्यांची म्हणावी तशी प्रगती होऊ शकली नाही. शिवाय त्यासाठी लागणारा कच्चा माल सुद्धा उपलब्ध नव्हता.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पेन्सिलींची मागणी वाढली व आयात बरीच कमी झाल्याने वरील कारखान्यांची प्रगती झाली. तसेच काही नवीन कारखानेही सुरू झाले.

पण युद्ध थांबल्यावर परत जर्मनी जपानच्या शिसपेन्सिली भारतीय मार्केटवर कब्जा निर्माण झाला.

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. नवीन भारत घडवण्याच्या स्वप्नाने भारावून गेलेल्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला होता.

याच धोरणातून त्यांनी भारतातील शिसपेन्सिलीचा उद्योग वाढवा यासाठी प्रयत्न केले. सर्वप्रथम १९५० मध्ये जकात मंडळाने या धंद्यास तीन वर्षांचे संरक्षण दिले व आयातीवर बंधने घातली.

पुढच्या काहीच वर्षात बाहेरून येणाऱ्या शिसपेन्सिलीवर आयतकर लादण्यात आला.

यामुळे भारतात ठिकठिकाणी नवीन शिसपेन्सिलीचे कारखाने उभे राहिले. यातच प्रमुख कारखाना होता मुंबईचा हिंदुस्थान पेन्सिल कारखाना.

ते साल होतं १९५८. हा कारखाना सुरू करणारे बाबुराव संघवी हे जर्मनीतून शिसपेन्सिली बनवण्याचे तंत्रज्ञान शिकून आले होते. त्यांनी रामनाथ मेहरा व मनसुखानी या दोन मित्रांबरोबर हा कारखाना सुरू केला.

जर्मनी, जपान मध्ये बनणाऱ्या शिसपेन्सिलीला तोडीस तोड किंबहुना दर्जाच्या बाबतीत त्यांच्यातूनही काहीसे सरस असणारे पेन्सिल भारतात बनू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं.

आज त्यांचे नटराज आणि अप्सरा हे शिसपेन्सिलीचे दोन ब्रँड अस्तित्वात आहेत.

फक्त पेन्सिलीच नाहीत तर खोडरबर, पट्टी, शार्पनर असे अनेक स्टेशनरी प्रॉडक्ट्स नटराज ब्रँड खाली विकले जातात आणि प्रचंड फेमस देखील आहेत.

गेल्या काही वर्षात आपले लेखन कमी झाले, लीडची पेन्सिल वगैरेची फॅशन आली. यामुळे साध्या शिसपेन्सिलीची मागणी कमी झाली.

पण तरीही जवळपास पन्नास टक्के शिसपेन्सिलीच मार्केट आजही नटराजच्या ताब्यात आहे.

संघवी यांच्या मते दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल फक्त पेन्सिलमधून होते.

आजही ही पेन्सिल हातात धरलं की शाळेच्या आठवणी दाटून येतात. कायम मित्राकडून घेतली जाणारी शिसपेन्सिलीची उधारी, ऐन परीक्षेत तुटलेली पेन्सिलीचे टोक शार्प करताना बनवलेले हार अशा कित्येक गोष्टी नटराज पेन्सिलीशी जोडलेल्या आहेत. मोबाईलवर टाइप करताना त्याची मज्जा कळणार नाही.

कितीही नाही म्हटलं तरी गेली साठ वर्षे या लालकाळी नटराज पेन्सिलीने भारतीय मनावर ठसा उमटवला आहे तो कोणत्याही खोडरबरला पुसता येणार नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.