भारतातला सर्वात अमूल्य ठेवा चोरून परदेशात विकणारा बदमाश

2007 सालचा मार्च महिना. न्यूयॉर्कमध्ये ‘आर्ट ऑफ द पास्ट’ नामक गॅलरीत दोन अमूल्य वस्तूंचा लिलाव सुरू होता. दोन्ही कांस्यमूर्ती होत्या. दक्षिणेत इसवी सनाच्या अकराव्या शतकात राज्य करणाऱ्या ‘चोळ साम्राज्यात’ अशा सुंदर, सुरेख मूर्ती तयार होत. या ब्रॉंझ अथवा कांस्यमूर्ती जगात फार दुर्मिळ प्रमाणात होत्या आणि म्हणूनच त्यांचे प्रचंड मोल होते. यातील एक मूर्ती नटराजाची तर दुसरी पार्वतीची होती.

या मूर्तीचा लिलाव करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते ‘सुभाष कपूर’ आणि लिलावाची रक्कम होती केवळ ‘8.5 दशलक्ष डॉलर..!!’

WhatsApp Image 2021 04 12 at 6.28.06 PM

ही जोडी सर्वार्थाने अतुलनीय आणि अमूल्यच होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लिलाव सुरू होता तो केवळ सुभाष कपूर यांच्या हातात असलेल्या फोटोंच्या आधारे आणि या दोन्ही मुर्त्या होत्या भारतात.. लवकरच भारतात आपल्या हस्तकांच्या मार्फत कपूरांनी या दोन्ही मूर्ती न्यूयॉर्कला चोरून आणण्याची व्यवस्था केली.

सुभाष कपूरने दोन्ही कांस्यमूर्ती विकत घेतल्या एक कोटी रुपयांना आणि विकल्या 8.5 दशलक्ष डॉलर्सला.. भारताच्या इतिहासात चोरून नेलेल्या अथवा सरकारी मार्गाने विक्रीस उपलब्ध केलेल्या वस्तूंमध्ये या दोन कांस्यमूर्त्यांना सर्वात जास्त रक्कम मिळाली होती. हा एकप्रकारे विक्रमच समजण्यात आला.

इकडे भारतात मात्र या दोन्ही मुर्त्या चोरून गेल्याची गोष्ट उजेडात येण्यासाठी 2008 साल उजडावे लागले. मुर्ती चोरीला जाऊन तोवर एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला होता. पोलिसांचा तपास सुरू झाला. ज्या मूर्त्यांचा शोध पोलीस घेत होते, त्यांचा साधा फोटो सुद्धा त्यांना उपलब्ध झाला नाही. त्यांनी या मुर्त्या कधीच पाहील्या नव्हत्या. किती हे दुर्दैव..

सुभाष कपूर यांनी परदेशात राहून प्राचीन वस्तूंच्या खरेदीविक्रीचा व्यवहार सुरू केला होता.

कित्येक वेळेस तर नकली कागदपत्रे तयार करून मौल्यवान गोष्टी ते विकत असत. जगभरात असे एकही संग्रहालय नाही, जिथे सुभाष कपूरने विकलेली एखादी वस्तू नसेल. 2004 साली एक अर्धनारीनटेश्वराची मूर्ती आणि दुर्गेची मूर्ती विकून त्यांना 50 दशलक्ष डॉलर्स मिळाले होते. जगातील सर्वात श्रीमंत संग्राहक म्हणून त्यांचा लौकिक झाला.

आणि हे सर्व वैभव उभे होते भारतातून चोरून नेलेल्या प्राचीन मूर्त्यांचा काळाबाजारावर..

2007 साली तामिळनाडूच्या सुथमल्ली गावातून केवळ दोनच कांस्यमूर्ती कपूरने चोरल्या नव्हत्या तर त्या एकाच राज्यातून जवळपास चौदा कांस्यमूर्ती एकाचवेळेस चोरण्यात आल्या होत्या. म्हणजे कितीतरी कोटी डॉलर्सची संपत्ती सुभाष कपूरने अवघ्या चार-पाच रात्रीत भारताबाहेर नेली.

भारतीय पुरातत्त्व खाते, इमिग्रेशन ऑफिसर, डॉकयार्डवर काम करणारे अधिकारी, पोलीस यांसारख्या कित्येक भ्रष्ट लोकांना सुभाष कपूरने आपल्या हाताशी धरले होते.

पेटारे भरून भारताचा हा मौल्यवान ऐवज तो घेऊन जाई आणि विकून गडगंज पैसे कमवत असे. एकदा त्याचे एक शिपमेंट पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यात 70 पेक्षा जास्त मुर्त्या, कित्येक चांदीची लहान मोठी भांडी, अठराव्या शतकात तयार करण्यात आलेला राजाचा अल्बम आणि इतर काही मौल्यवान वस्तू त्या पेटाऱ्यात होत्या.

पण झालं काय? कपूरच्या माणसांनी ही सगळी मालमत्ता आपसूक सोडवली आणि न्यूयॉर्कला पोहोच केली.

बरं, या मुर्त्या काय लहान होत्या? 8.5 दशलक्ष डॉलरला विकल्या गेलेल्या दोन्ही मूर्त्यांपैकी नटराज साडेतीन फुटांचा आणि दीडशे किलो वजनाचा होता. पार्वतीसुद्धा जवळ जवळ एवढ्याच आकाराची होती. या सुथमल्ली गावाजवळ असणारा ‘श्रीपुरंथम’ गावातील जगप्रसिद्ध नटराज सुद्धा सुभाष कपूरने चोरला आणि 5.1 दशलक्ष डॉलरला विकला होता. तो तर तब्बल चार फुटांचा होता. एवढ्या प्रचंड जड वस्तू भारताबाहेर नेत असताना त्याला कसलाही त्रास होत नसे, ही आपल्यासाठी किती शरमेची बाब म्हणायला हवी?

पण सुभाष कपूरचे दिवस भरले होते.

या तिन्ही कांस्यमूर्ती विकल्यामुळे तो भारतातील काही प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या नजरेवर आला. त्यातील एका अतिसामान्य नागरिकाने तर सुभाष कपूरला अटक करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे ‘एस. विजयकुमार’. सुभाष कपूरला थोड्याच काळात जर्मनीवरून अटक करण्यात आली. भारताच्या बाहेर गेलेल्या कित्येक वस्तूंचा थांगपत्ता लागला.

a83288f7f3fd521f54dcf1e3a1cf9462e2727ce8

4 सप्टेंबर 2014 साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून ‘श्रीपुरंथम’ येथून चोरीला गेलेला चार फुटांचा नटराज आणि 2004 साली विकलेली अर्धनारीश्वराची प्रतिमा भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या दोन्ही वस्तू ऑस्ट्रेलियात होत्या.

नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबोट यांच्याशी संपर्क साधला आणि भारताचा हा अति मौल्यवान ठेवा परत मिळवला.

सुभाष कपूरला अटक झाली तेव्हा त्याच्या न्यूयॉर्क येथील गोदामावर सुद्धा छापा मारण्यात आला. तिथे असलेल्या भारतीय वस्तूंची किंमत पाहून सर्वांचेच डोळे पांढरे झाले. या सर्व वस्तूंची बाजरात किंमत भरत होती ‘100 दशलक्ष डॉलर्स’. भारतीय रुपयांमध्ये किमतीचा अंदाज लावायचा झाला तर एकावर किती शून्य मोजावे लागतील, याचा तुम्हीच विचार करा.

आजही भारत सरकार जगभर असलेल्या आपल्या ऐतिहासिक वस्तूंना परत आणण्यासाठी अहोरात्र झटत आहे. केवळ एकट्या सुभाष कपूरने भारतातील हजारांपेक्षा जास्त प्राचीन वस्तू भारताबाहेर विकल्या.

हर्षद मेहता, अब्दुल तेलगी, निरव मोदी, विजय माल्या यांच्या घोटाळ्यांविषयी आपण कितीतरी वेळेस वाचले आहे, ऐकले आहे. पण, या सर्वांच्याच तोंडात मरेल एवढा प्रचंड मोठा स्कॅम, भारताच्या तस्करीचा हा काळा इतिहास आपल्या खिजगिणतीतही नाही. 21 व्या शतकातील भारत लुटीची अशीही एक गोष्ट..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.