१० वर्षापूर्वी चहाच्या टपरीवर काम केलेलं पोरगं आज भारतासाठी बॉलिंग करणार आहे
आज जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची तिसरी वनडे चालू झाली तेव्हा अंतिम अकरामध्ये एक नवीन नाव दिसून आले. टी नटराजन हा नवीन खेळाडू आता भारतासाठी खेळणार आहे. यापुर्वी मागील महिन्यातील आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादमधून खेळत असताना यॉर्करने सगळ्यांच्या चर्चेत आला होता.
सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणाऱ्या नटराजनने या हंगामात १६ विकेट्स घेतल्या. मात्र त्याहून चर्चा होते ती त्याच्या यॉर्कर्सची. नटराजनने या एका सिझनमध्ये तब्बल ७० यॉर्कर्स टाकले आहेत. यातीलच एक यॉर्कर आपल्या एबीडीची पण विकेट घेवून गेला. आणि सर्वांच्या नजरेत आला.
आपल्या कौशल्यांच्या जोरावर तो आपली वेगळी ओळख निर्माण करुन गेला. याच प्रदर्शनाच्या जोरावर सुरुवातीला त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेट बॉलर म्हणून निवड झाली. नंतर संघाचा भाग आणि आजच्या अंतिम अकरामध्ये त्याला संधी देखील मिळाली.
पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. तमिळनाडूतील एका छोट्याश्या गावातून सुरु झालेले त्याचे क्रिकेट आज त्याला भारतीय संघापर्यंत घेवून आले आहे.
तामिळनाडूतल्या सालेम जिल्ह्यात चिन्मापम्पट्टी हे नटराजनचे गाव. भारतातल्या इतर गावांसारखेच दुर्गम. घरची परिस्थिती वर्षानुवर्ष बिकट.
नटराजनचे वडील रोजंदारीवर काम करायचे, आई चहाची छोटी टपरी चालवायची. तो देखील आईसोबत टपरीवर कामाला जायचा. अगदी टेबल साफ करण्यापासून ग्लास धुण्यापर्यंत.
नटराजनच्या गावात टेनिस बॉलच्या स्पर्धा होतात. त्या बघता बघता त्याला देखील क्रिकेटच वेड लागले आणि डावखुरा नटराजन या स्पर्धांमध्ये बॉलिंग करू लागला. मोठी मैदान असल्यामुळे खेळाडूमधील गुणवत्ता लगेचच दिसून आली. त्याचे कोच जयप्रकाश यांनी नटराजनची बॉलिंग पाहिली.
यॉर्कर फेकण्याच्या क्षमतेत त्यांना या मुलाचे भविष्य दिसले. त्यांनी नटराजनला गावातून शहरात आणले. सुरुवातीला बीएसएनल संघाकडून खेळू लागला. त्याच खेळ आणि बॉल दोन्ही बोलक होते. नटराजनचे यॉर्कर पाहून विजय क्लबने आपल्या टिममध्ये घेतले. प्रशिक्षण दिले.
त्याच दरम्यान आयपीएलच्या धर्तीवर तामिळनाडू प्रीमिअर लीग सुरू झाली. या स्पर्धेतल्या डिंडीगुल ड्रॅगन्सने नटराजनला आपल्या टिममध्ये घेतले. नटराजननने या संधीचं सोने केले. पण याच दरम्यान त्याला मोठा सेटबॅक बसला.
त्याच्या बॉलिंग ॲक्शनवर हरकत घेण्यात आली. पहिल्याच मॅचमध्ये अंपायर्सनी त्याच्या अक्शन संदर्भात मॅचरेफरींना रिपोर्ट दिला.
यानंतर तो तब्बल दिड वर्ष बाजूला फेकला गेला. यादरम्यान त्याच्या मदतीला आले तामिळनाडूमधील जेष्ठ कोच सुनील सुब्रमण्यम. त्यांनी नटराजनला आवश्यक बदल सुचवले. बदललेल्या अक्शनसह तो अचूक बॉलिंग करू शकतो याचा आत्मविश्वास दिला. यॉर्कर्स अचूक होण्यासाठी काम केले.
नटराजनन पुन्हा कमबॅक केले पुन्हा चमकला आणि याच स्पर्धेतुन त्याला आयपीएलची दार खुली झाली.
आयपीएलमधल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नटराजनला संधी दिली. लिलावात नटराजनची बेस प्राईज होती दहा लाख रुपये. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्यासाठी तीन कोटी रुपयांची बोली लावत त्याला ताफ्यात घेतले. इथे मात्र त्याला चमक दाखवता आली नाही. आणि पंजाबने त्याला सोडून दिले.
अनेक आयपील खेळाडूंसारखा तो देखील आता असाच कुठे तरी लुप्त होणार अशी भिती व्यक्त केली जावू लागली. मात्र पुढच्या हंगामासाठी हैदराबादने त्याला संधी दिली. दोन हंगाम केवळ निरीक्षण आणि शिक्षण या सुत्रावर ठेवले. वॉटर बॉय, नेट प्रॅक्टिस बॉलर, कामचलाऊ फिल्डर म्हणून तो संघात होता.
यंदाच्या हंगामात कोरोनामुळे अनेक दिग्गजांनी स्पर्धेतुन माघार घेतली. आणि नटराजनला संघात अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले. आणि त्याने संधीचे सोने केले. यॉर्कर किंग म्हणून ओळख मिळवली. पैसा मिळाला.
या पैशाविषयी ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना नटराजन म्हणाला होता,
‘मला या पैशांमधून बहिणींचं शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्या शिकल्या, त्यांची प्रगती झाली तर होणारा आनंद हा घरात एखादी फॅन्सी कार घेतल्याच्या आनंदापेक्षा मोठा असेल.’
भविष्यात पुढे चालत असताना भुतकाळातील ऋणांना नटराजन विसरला नाही. ज्या गुरु जयप्रकाश यांनी त्याला शहरात आणले, क्रिकेटमध्ये आणले त्यांना तो विसरला नाही. यशाच्या हवा कानात जात असल्या तरी डोक्यात जावू दिल्या नाहीत. आपल्या गुरुप्रतिचा आदर म्हणून नटराजनच्या जर्सीवर जेपी नट्टू असे लिहीले आहे.
यामागे जयप्रकाश यांच्या नावाचे आद्याक्षर म्हणून जेपी आणि नटराजनचा शॉर्टफॉर्म म्हणून नट्टू असा अर्थ असल्याचे त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.
आपल्या नंतरच्या पिढीचा देखील विचार…
आपण इथवर पोहोचल्यानंतर आपल्या सारख्याच अनेकांना संधी देण्यासाठी त्याने पाऊल पुढे टाकले. नटराजनने गावातच अकादमी उभारली. एका मित्राने अकादमीसाठी जागा दिली. गावातल्या क्रिकेटवेड्या मुलांसाठी नटराजनने व्यवस्था उभारली.
असाच नटराजनच्याच गावचा जी. पेरियास्वामी हा तरुण मुलगा घरच्या गरीबीमुळे क्रिकेट सोडणार होता. नटराजन त्याच्या घरी गेला. क्रिकेटमध्ये करियर करता येते, क्रिकेटमुळे खाण्याची भ्रांत मिटते हे त्याने पेरियास्वामीला आणि त्याच्या पालकांना समजावून सांगितले.
टीएनपीएलच्या मागच्या वर्षी झालेल्या फायनलमध्ये पेरियास्वामीने पाच विकेट्स घेत नटराजनचा विश्वास सार्थ ठरवला.
हे ही वाच भिडू.
- सरदेसाई म्हणाले क्रिकेटर व्हायला टॅलेंट लागतं, पत्रकार व्हायला टॅलेंट लागत नाही
- बिस्किटात पार्लेजी आणि क्रिकेटमध्ये नेहराजी म्हणजे फुल्ल टू रिस्पेक्ट.
- जिथे ३५ रुपयांसाठी मजुरी केली आज तिथेच कोरोनाशी लढण्यासाठी भलंमोठ सेंटर उभारलं.