एकेकाळी ३ रुपये रोजंदारीने काम करणारे नटुकाका टीव्हीवरचे स्टार कलाकार झाले होते.

एखादा कलाकार हा एखाद्या शोचा जीव असतो, ज्याला शून्य विरोधक असतात, ज्यावर प्रत्येक माणूस प्रेम करतो अशा लोकांपैकी असलेला एकमेव कलाकार म्हणून नटवरलाल प्रभाशंकर उंडाईवाला उर्फ नटुकाका अर्थात घनश्याम नायक.

३ ऑक्टोबर २०२१ रोजी नटुकाका यांचं निधन झालं. पण हा इतका मोठा कलाकार होता कि फक्त भारतचं नाही तर परदेशातही त्यांचे फॅन होते. जाणून घेऊया घनश्याम नायक यांच्या सुरवातीच्या आयुष्याबद्दल.

घनश्याम नायक यांचा जन्म १२ मे १९४५ रोजी झाला. घरातच त्यांचा भवाई हा लोककलाप्रकार होता. भवाई म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या तमाशासारखा लोककलाप्रकार. घरातच भवाई असल्याने त्यांचे वाडवडील पिढ्यानपिढ्या हा लोककलाप्रकार सादर करत असे. तेव्हा हाडाचा कलाकार काय असतो हे नटूकाकांना तेव्हाच कळलं होतं आणि त्यातूनच ते घडत गेले. 

नाटक क्षेत्रात गुजरातमध्ये घनश्याम नायक यांचं मोठं वलय होतं. थेटरमध्ये त्यांनी साकारलेली पात्र अजूनही लोकांच्या लक्षात राहतात म्हणजे हीच त्यांच्या अभिनयाची पावती होती. पुढे नाट्यक्षेत्रातूनच ते सिनेमामध्ये आले. जवळपास १०० गुजराती आणि हिंदी सिनेमात त्यांनी काम केलं होतं आणि तब्बल ३५० सीरियलमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली होती. गुजराती नाट्यभूमीवर १०० पेक्षा जास्त नाटकात त्यांनी काम केलेलं होतं.

१२ गुजराती सिनेमांमध्ये घनश्याम नायक यांनी गायक केलं होतं तेही आशा भोसले आणि महेंद्र कपूर अशा दिग्गज गायकांसोबत. १९६० साली बालकलाकार म्हणून त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं होतं तो सिनेमा होता मासूम. हम दिल दे चुके सनम या सिनेमात त्यांनी विठ्ठल काकाची भूमिका केली होती. 

बेटा, तिरंगा, आंखें, लाडला, क्रांतिवीर, आंदोलन, बरसात, माफिया, चाहत, इश्क, चाइना गेट, तेरे नाम आणि खाकी अशा बऱ्याच सुपरहिट सिनेमांचा ते भाग होते. ख‍िचड़ी, एक महल हो सपनों का, दिल मिल गए, सारथी, साराभाई वर्सेज साराभाई या सीरियलमध्ये सुद्धा त्यांनी कमालीचं काम केलेलं होतं.

सुरवातीला जेव्हा काम मिळत नसायचं तेव्हा घनश्याम नायक हे ३ रुपयांसाठी २४ तास काम करायचे. हा तो काळ होता जेव्हा सिनेमातुन फारसे पैसे मिळत नसायचे. सिनेमातून जेव्हा त्यांना काम मिळत नव्हते आर्थिक परिस्थिती खराब होती तेव्हा वेळ इतकी बिकट होती कि त्यांनी शेजाऱ्यांकडून उधारीवर पैसे घेऊन मुलाबाळांची शाळेची फी भरली होती. 

पण नंतर तारक मेहता का उलटा चष्मा या सिरियलसाठी घनश्याम नायक यांना नटुकाका या पात्राची विचारणा झाली आणि नंतर मात्र त्यांच्या संघर्षमय आयुष्यात स्थिरता आली. तारक मेहतामधील जेठालालच्या गडा इलेकट्रोनिक्स दुकानात मॅनेजर म्हणून नटुकाकाचा रोल त्यांचा असायचा. बागाचे काका आणि मॅनेजर या पात्राने अनेक लोकांना पोट धरून हसवलं.

सेठजी पगार बढाव, हां आपने मुझसे कुछ कहा असे अनेक मजेदार डायलॉग त्यांच्या तोंडून ऐकून प्रेक्षकांना आनंद मिळायचा. टीव्ही सिरीयलच्या जगातला सगळ्यात मोठा कलाकार हे नटुकाका प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील इतकं लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलं आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.