पक्ष्यांशी गप्पा मारणारा रानवाटांचा सोबती : किरण पुरंदरे

बोल भिडूचा १२ तारखेला वाढदिवस साजरा होतोय हे तर आपल्या लक्षात आलं. पण कार्यक्रमात नेमक काय असणार आहे हे कुठ सांगितलंय? तर या कार्यक्रमाची मेन थीम आहे निसर्गाशी संवाद, आपल्या माणसांशी संवाद.

आज आपण माणसांच्या जंगलात राहतो. पण मोबाईल आणि इतर गॅझेटसच्या गर्दीत आपला एकमेकांसोबतचा संवाद सुद्धा हरवत चाललाय. निसर्ग राहिला खूप लांब. अशा या धावत्या मशिनच्या काळात असाही एक माणूस आहे जो पक्ष्यांशी गप्पा मारतो, झाडांशी संवाद साधतो, शहरापेक्षा जंगलात रमतो. त्यांच नाव किरण पुरंदरे. 

साधारण १९७७ , ७८ चा काळ. पुण्यातल्या एका सुप्रसिध्द शाळेत जाणारा एक चौदा पंधरा वर्षाचा हा मुलगा किरण. सकाळच्या वर्तमानपत्रात डोकावून त्यातल्या गंमती वाचायची सवय. एक दिवस पेपर मधल्या एका छोट्या निवेदनाकडे त्यांच लक्ष वेधलं गेलं.

“चला पक्षीनिरीक्षणाला.”

भटकणे, रानमेव्यावर ताव मारणे ही आवड असलेला किरण बघू तरी नेमक काय असत म्हणून त्या शिबिराला गेला.  रमेश बिडवे नावाच्या पक्षीतज्ञाने  आयोजित केलेल्या या छोट्याशा सहलीने त्याचं आयुष्य बदललं. पक्ष्यांच्या या जगात किरण पुरंदरे यांचा प्रवेश झाला. रमेश बिडवे यांच्या सोबत रात्रंदिवस पक्ष्यांच्या शोधात पुण्याच्या आसपासची जंगलं धुंडाळू लागला.

जंगलांची त्यांना गोडी लागली. मिळेल तिथून पक्ष्यांची माहिती गोळा करणे हा नवा छंद त्यांना लागला. या छंदाचे वेडात रुपांतर झालं आणि हे वेडचं पुढ आयुष्य बनलं.

किरण पुरंदरे एकदा मित्रांसोबत कट्ट्यावर गप्पा मारत होते. त्यावेळी एका कुठल्याशा पक्षाच्या शिट्टीचा आवाज त्यांना आला. गंमत म्हणून त्यांनी त्याच्यासारखी सेम शिट्टी वाजवून बघितली. त्यांच्या मित्रांच्या लक्षात आलं की किरणची शिट्टी एकदम त्या पक्ष्यासारखी आहे. विशेष म्हणजे किरणच्या शिट्टीचा प्रतिसाद त्या पक्ष्यानेही दिला. तेव्हा त्यांना लक्षात आलं की पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करणे देखील आपल्याला जमत.

जर एखाद्या नव्या गायकाला एखाद्या उस्तादाने आपल्या पाठीवर थाप दिली तर जेवढा आनंद होईल तसा आनंद किरण पुरंदरेना आपल्या नकलेला पक्ष्याने प्रतिसाद दिल्यावर होऊ लागला. त्यांना त्या पक्ष्याची पावती मिळाली. जवळपास शंभरभर पक्ष्याचा आवाज काढायला शिकले. आज त्यांची आणि या पक्ष्यांची जुगलबंदी पाहणे एक अविस्मरणीय अनुभव असतो.

शालेय जीवनात पक्षीनिरीक्षणाची गोडी लागली खरी पण त्याकाळात त्यांच्याकडे कोणतीही दुर्बीण, कॅमेरा, फिल्ड गाईड, पुस्तकं,स्पॉटिंग स्कोप अशी कोणतीही शास्त्रीय आयुध नव्हती. पायी जंगलातून फिरून उघड्या डोळ्यांनी आणि कानांनी जे जे काही साठवता येईल ते साठवत गेले. कॉलेजमधून बीकॉमची डिग्री घेतली. पक्षीनिरीक्षणाच कोणतही औपचारिक शिक्षण त्यांना मिळालेलं नव्हत.

पण कुठल्याही पुस्तकी जगात शिकता येणार नाही असे पक्ष्यांच आणि आयुष्य जगण्याचं ज्ञान त्यांना या जंगलानी शिकवलं.

पुढे नोकरी सुद्धा याच क्षेत्रात मिळाली. शहरात आपल्या दैनंदिन कामात अडकलेल्या लोकांना निसर्गात घेऊन जाने त्यांना जंगलाची ओळख करून देणे ही कामे केली. कधीतर त्यांच्या वाचनात त्यांना व्यंकटेश माडगुळकरांच नागझिरा हे पुस्तक वाचनात आलं होत. या पुस्तकाने आणि जंगलाने त्यांना भारावून टाकलं.  त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत माडगुळकर म्हणतात,

” मला चांगली जाणीव आहे, की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरु होते. मी ही लहानशी वाट पडली आहे, एवढचं. “

किरण पुरंदरेनां सलग तीस वर्ष शहरात राहण्याचा, तिथल्या बांधलेल्या आयुष्याचा कंटाळा आला होता. त्यांनी आपल्या दैवताच्या “तात्या माडगुळकरानी” पाडलेल्या वाटेने जायचं ठरवलं. नागझिराचं जंगल त्यांना खुणावत होत. त्यावेळी महाराष्ट्राच्या सामाजिक वनीकरण खात्याचे माधव गोगटे हे संचालक होती. एक दिवस भीत भीत किरण पुरंदरेनी त्यांना आपली नागझिरा मध्ये एकवर्ष राहण्याची कल्पना बोलून दाखवली. गोगटेनी त्यांचा प्रस्ताव पाहिला. तो त्यांना खूप आवडला. ते फोन करून  म्हणाले,

“काय, नागझिऱ्याच्या जंगलामध्ये जाऊन राहायचं म्हणताय काय? जरूर जा. मी तुम्हाला झाडाला बांधूनच ठेवतो.”

त्यांच्याच पाठिंब्यामुळे वन्यजीव खात्याने पुरंदरेना वर्षभर नागझिरा जंगलात राहण्याची परवानगी दिली. जायचं तर ठरलं पण पैशाची जुळवाजुळव होणे अवघड होत. अखेर पुरंदरेचे शेकडो हितचिंतक धावून आले. अनेकांनी त्यांना पैश्याच्या स्वरुपात तर अनेकांनी त्यांना औषधं, टोर्च, सायकल, सौरकंदील अशा वस्तूस्वरुपात देखील मदत केली. याच सगळ्यांच्या शुभेच्छाच्या जोरावर १ नोव्हेंबर २००१ ला किरण पुरंदरे नागझिराला पोहचले.

तिथून पुढे एकवर्ष म्हणजेच जवळपास चारशे दिवस ते नागझिरामध्ये राहिले. शहरीपणाचा चकचकीत बुरखा फाडून टाकला. पंचेद्रियांच्या संवेदनांना धार चढवली. दानदान सायकलवर किंवा पायी जंगल पालथे घातले. या वर्ष भरात निसर्गाचे अखंड ऋतूचक्र अनुभवले. तिथे एकरूप झाले. तहान भूक विसरून लाखो वनस्पती, कीटक, फुलपाखरू, उभयचर, अष्टपद, सरपटणारे प्राणी , सस्तन प्राणी, पक्षी, माणस, गावं पाहिली. हे सगळ लिहून ठेवलं. फोटो काढले. 

जवळपास आठशे पानांचा पहिला ड्राफ्ट तयार केला. यामधूनचं साकारलं “सखा नागझिरा” हे पुस्तकं.

एकदम काळजाला भिडेल अशी भाषा,नागझिऱ्याच्या निसर्गसंपत्तेच सौंदर्यपूर्ण वर्णन आणि त्याबरोबरच तिथल्या प्रश्नांची जगाला जाणीव होईल असे संवेदनशील लिखाण यामुळे थोड्याच दिवसात या पुस्तकावर रसिकांच्या उड्या पडल्या. निसर्गशास्त्र व पर्यावरण शास्त्र यांच्या अभ्यासकाबरोबरच सर्वसामान्य वाचकांच्यातही हे पुस्तक फेमस ठरले. याच पुस्तकाला २००७साली उत्कृष्ट वाड्मयनिर्मितीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. 

आजही किरण पुरंदरे पर्यावरण क्षेत्रात रक्षक, शिक्षक, प्रेरक आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी त्यांना बालचित्रवाणीवर “रानगप्पा” या कार्यक्रमात पक्ष्यांची माहिती सांगताना ऐकलं असेल.

त्यांच्या निसर्गवेध या संस्थेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गसंवर्धनासाठीचे उपक्रम राबवले जातात. नागझिरा पासून ते रायगडाच्या पायथ्याच्या गावापर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी पक्ष्यासाठी जलकुंड उभारले आहेत.  ठीकठिकाणी पक्षी प्राणी, जैविक विविधता या विषयांवर अधिकारवाणीने बोलू शकणारी व्यक्ती म्हणून त्यांना बोलवलं जात. आजवर त्यांची जवळपास २२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. या सर्व पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.   

असा हा कविमनाचा , जंगलाविषयी अपार प्रेम असलेला, तिथल्या मातीशी एकरूप झालेला पक्षीवेडा आपले अनुभव घेऊन बोल भिडूच्या भेटीला येतोय १२ तारखेला. पुण्याच्या पत्रकार भवन मध्ये. नक्की या. या अवलियाला तोंडून निसर्गाशी संवाद साधता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.