म्हणून नवाब मलिक यांना भंगारवाला म्हणतात…

महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या आर्यन खान प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे नवाब मलिक यांच्या निशाण्यावर आहेत. पण अलीकडेच याच प्रकरणाबाबत भाजप नेते मोहित कम्बोत यांनी  नवाब मलिक यांच्यावर १०० कोटींचा खटला दाखल केला आहे.

याबाबतीत माध्यमांनी त्यांना विचारलं असता त्यांनी माध्यमांना बोलतांना, “होय मी भंगारवाला आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची मुलगी सना मलिकनेही ट्वीट केलंय कि, “होय मी भंगारवाल्याची मुलगी! आणि मला याचा अभिमान आहे” अचानक हे वक्तव्य करण्यामागे काय कारण आहेत तर नवाब मलिक यांना विरोधकांकडून भंगारवाला म्हणून हिणवलं जातंय, त्यांना भंगारवाला का म्हणलं जातंय अन त्यामागचा इतिहास पाहूया,

क्रूझ ड्रग्ज पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईवरुन नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी पिक्चरचा इंटरवल झाला आहे.  समीर वानखेडे यांची नोकरी जात नाही आणि त्यांनी तुरुंगात टाकत नाही तोपर्यंत हा पिक्चर संपणार नाही, असंही ते म्हणालेत.

भाजप नेते मोहित कम्बोत यांच्याकडून १०० कोटींचा खटला दाखल केला. त्याबद्दल मलिक यांना  विचारण्यात आलं तेंव्हा त्यांनी १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर दिलं कि, “माझी तर औकात इतकी नाही. माझ्यावर १०० कोटींचा खटला दाखल करून, माझा ब्रॅण्ड त्यांनी १०० कोटींचा केला आहे. सगळं विकलं तरी माझ्याकडे १०० कोटी निघणार नाहीत. ते सांगतात मी भंगारवाला आहे…पण भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी कपडे आणि भंगारचा व्यवसाय केला. मी सुद्धा वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राजकारणात आमदार होण्यापर्यंत भंगारचा व्यवसाय करत होतो. शेजारीच आमचं दुकान आहे, जाताना त्याचे फोटोही काढा. माझं कुटुंब भंगारचा व्यवसाय करतं याचा आम्हाला अभिमान आहे”.

“माझ्या आजोबांनी कधीही बनारसमध्ये कोणत्या डाकूंकडून सोनं घेतलेलं नाही. माझ्या वडिलांनी चोरांकडन सोनं खरेदी केलं नाही. मी कधीही मुंबईत सोन्याची तस्करी केली नाही. मी कोणतं मार्केट बुडवलं नाही. कोणत्याही बँकांचे पैसे खाल्ले नाहीत. मी कंपन्या निर्माण करुन बँकांचे शेकडो कोटी बुडवले नाहीत. माझ्या घरी कधी सीबीआयीने धाड टाकलेली नाही. माझ्यावर कोणताही आरोप नाही. मुख्यमंत्री निधीत तो चेक बाऊन्स मी केला नाही,” असा टोला देखील यावेळी नवाब मलिक यांनी लगावला.

“होय मी भंगारवाला आहे. भंगारवाल्याची किमयागिरी काय असते हे या लोकांना माहिती नाही. जी वस्तू उपयोगी नसते ती उचलून आणतो. त्याचे तुकडे करुन पाणी पाणी करण्याचं काम भंगारवाला करतो. नवाब मलिक या शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचं पाणी केल्याशिवाय थांबणार नाही,” अशा इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला.

कोण आहेत हे नवाब मलिक ?

आर्यन खान प्रकारणाच्या परिस्थितीत समीर वानखेडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेले आणि रोज नवनवीन आरोप करणारे मंत्री नवाब मलिक कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी राजकारणाची सुरुवात समाजवादी पक्षातून केली, पण नंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.

महाराष्ट्रात पाच वेळा आमदार राहिलेले नवाब मलिक यांचा जन्म २० जून १९५९ रोजी उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्रौला तहसील भागातील धुसवा गावात झाला. नवाब मलिक यांचे संपूर्ण कुटुंब १९७० दशकामध्ये यूपीमधून मुंबईत स्थलांतरित झाले. त्यांनी मुंबईतील अंजुमन हायस्कूलमधून १० वी  आणि त्यानंतर १९७८ मध्ये बुर्हानी कॉलेजमधून १२वी पास केली. १९७९ मध्ये त्यांनी पदवीसाठी याच महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.

नवाब मलिक यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात व्यवसायापासून केली, मात्र यादरम्यान ते  राजकारणाकडे ओढले गेले, त्यानंतर त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रात उडी घेतली. नव्वदच्या दशकात देशात राम मंदिराची चळवळ सुरू झाली आणि अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या विरोधात आवाज उठवणारे सपा अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची लोकप्रियता अल्पसंख्याक समाजात झपाट्याने वाढली.

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरीचा पाडाव झाला तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. बाबरी घटनेमुळे देशभरातील अल्पसंख्याक काँग्रेसवर प्रचंड नाराज झाले आणि पर्याय म्हणून मुस्लिमांनी समाजवादी पक्षाची निवड केली.

मुस्लिमांमध्ये मुलायम सिंह यांची वाढती लोकप्रियता पाहून नवाब मलिक यांनीही सपामधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. नवाब मलिक यांनी १९९६ मध्ये महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल नेहरू नगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सपाच्या तिकिटावर पहिल्यांदा नशीब आजमावले आणि विजय मिळवून विधानसभेत पोहोचले.

नवाब मलिक हे मुलायम यांच्या जवळचे नेते मानले जायचे. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत नेहरू नगर या जागेवरून पुन्हा सपाच्या तिकिटावर आपले नशीब आजमावले आणि विजयी झाले.

त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात यूपीए सरकार सत्तेत आल्यानंतर नवाब मलिक यांनी सपा सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी नेहरू नगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उतरले आणि विजयाची हॅट्ट्रिक केली.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

२०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी अणुशक्तीनगर विधानसभेतून पुन्हा लढवली, पण शिवसेनेकडून थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक पुन्हा येथून लढले आणि पाचव्यांदा आमदार झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीनंतर नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. २०२० मध्ये मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षही करण्यात आले होते.

आणि आज ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.