नौदलाचा कणा असलेल्या ‘INS शिवाजी’च नामकरण एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केलं आहे….

सुरक्षा दलाला सगळ्यात जास्त महत्वाचं काय गरजेचं असेल तर ते प्रशिक्षित अधिकारी. मग ते भारताचं सैन्य असो, हवाईदल असो कि नौदल असो. महाराष्ट्रामधील लोणावळ्यात असेच एक नौदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणारे नौसेनेचे ‘INS शिवाजी’ स्टेशन आहे जिथून आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त अधिकारी प्रशिक्षण घेऊन देशसेवेत रुजू झाले आहेत.

म्हणून या स्टेशनला आज नौदलाचा कणा समजलं जाते.

याच स्टेशनला असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच नाव हे देखील आज महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या अभिमानाच केंद्रबिंदू आहे. मात्र या स्टेशनला हे नाव कसं आणि कोणी दिले याबाबत अनेकांना माहिती नसते.

तर या स्टेशनला छत्रपती शिवरायांचं नाव देण्याचा मान जातो तो एका ब्रिटिश अधिकाऱ्याला.

बॉम्बे म्हणजेच आताच्या मुंबईच्या नेवल डॉकयार्डमधील HMIS (हर मॅजेस्टीज इंडियन शीप) डलहौजीमधील ‘स्टोकर्स ट्रेनिंग स्कूल’ च्या जागेवर INS शिवाजीची स्थापना झाली होती. १५ फेब्रुवारी १९४५ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर जॉन कॉलविले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘HMIS शिवाजी’ची शिफारस केली होती.

त्यावेळी जॉन कॉलविले म्हणाले होते छत्रपती शिवजी महाराजांच्या पराक्रमाला हा आमच्याकडून छोटासा आदर.

त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी याच नामांतर आयएनएस शिवाजी असं करण्यात आलं.

स्थापना झाल्यानंतर काहीच दिवसात पुढचा विस्तार आणि प्रशिक्षत अधिकाऱ्यांना देशाच्या राजकारणापासून लांब ठेवण्यासाठी या ‘हर मॅजेस्टीज इंडियन शीप – शिवाजी’ या प्रशिक्षण प्रतिष्ठानला मुंबईपासून कोणत्यातरी शांत जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जेव्हा इंग्रज अधिकारी एका योग्य ठिकाणाच्या शोधात होते, तेव्हाच दुर्दैवाने सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधे एक हवाई अपघात झाला होता. काही अधिकारी या अपघाताचा तपास करण्यासाठी या सह्याद्रीच्या डोंगररांगेत गेले. तेव्हा त्यांना या प्रशिक्षण प्रतिष्ठानसाठी जशी जागा हवी होती अगदी तशीच जागा या लोणावळ्याजवळीकी पर्वतरांगेमध्ये मिळाली.

अगदी शांत आणि उंचीवरची जागा, रोजच्या जगापासून लांब, सुरक्षेच्या दृष्टीने योग्य अशी ती जागा होती. आणि याठिकाणी हे अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण प्रतिष्ठान स्थलांतरित करण्यात आलं. आज आयएनएस शिवाजी ही नौदलाची ‘अ’ श्रेणीतील प्रशिक्षण संस्था बनली आहे.

‘कर्मसु कौशलम्’ (कार्यातील कौशल्य) हे आयएनएस शिवाजीचे ब्रीदवाक्य आहे.

‘आयएनएस शिवाजी’तील प्रत्येक अभ्यासक्रम हा ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’ अर्थात एआयसीटीईच्या मान्यतेनुसार चालतो. तर येथून मरीन इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी मिळते. आतापर्यंत ‘आयएनएस शिवाजी’ मधून तब्बल २ लाखांहून अधिक अधिकारी, नौसैनिकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

तब्बल ५०० अभ्यासक्रमांचा समावेश

नौदलासह कोस्ट गार्ड आणि मित्रदेशांच्या नौसैनिकांनाही इथं आधुनिक प्रशिक्षण दिलं जातं. ‘आयएनएस शिवाजी’त आण्विक, जैविक, रासायनिक, किरणोत्सर्गी हल्ल्यांना तोंड देणारी प्रशिक्षण संस्था, अग्निशमन प्रशिक्षण संस्थेचाही समावेश आहे. ‘आयएनएस शिवाजी’त नौसैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी विविध प्रकारचे एकूण ५०० अभ्यासक्रम चालवण्यात येतात.

यात सर्वसाधारणपणे २८०० अधिकारी व ७८०० नौसैनिक सहभागी होतात.

इथं मित्र देशांमधील प्रशिक्षणार्थींनाही प्रशिक्षण दिलं जातं. दरवर्षी सुमारे २० देशांमधील २५० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतात.

अलीकडेच म्हणजे १३ फेब्रुवारी २०२० रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रेसिडेंट्स कलरने सन्मानित करण्यात आलं आहे.

कोणत्याही लष्करी पथकासाठी ‘प्रेसिडेंट्स कलर’ हा सर्वोच्च बहुमान असतो. ‘आयएनएस शिवाजी’तर्फे निशाण टोळीतील निशाण अधिकारी लेफ्टनंट कमांडर साहीर जान आणि लेफ्टनंट कमांडर रोशन कुमार सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा ध्वज स्वीकारला होता. यावेळी ‘आयएनएस शिवाजी’च्या अमृत महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या खास टपाल तिकिटाचे प्रकाशन देखील राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.