रतन टाटांच्या वडिलांनी शिवसैनिकांच्या जोरावर लोकसभा लढवली होती

नवल होरमुस टाटा. सध्याचे टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे वडील. टाटा हे नाव जगभरात पोचणाऱ्या जेआरडी टाटा यांचे हे चुलत भाऊ. दोघे समवयस्क होते. जन्मले टाटा घराण्यात मात्र त्यांच्या घरच्या परिस्थितीत जमीन आस्मानच अंतर होतं.

जे आरडी टाटा जन्मले ते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन पण नवल टाटा यांच्या घरी दारिद्र्य होतं.

त्यांचे वडील अहमदाबादच्या एका कारखान्यात कामाला होते. त्यांच्या निधनानंतर नवल टाटा हे अनाथाश्रमात वाढले. जमशेदजी टाटांच्या मुलाने म्हणजेच रतनजी टाटा यांनी नवल टाटा यांना दत्तक घेतले आणि पुढे त्यांचं आयुष्य बदलून गेलं.

जे आर डी टाटा व नवल टाटा हे साधारण एकदमच टाटा उद्योगसमूहाच्या आले.

दोघांनाही सुरवात एका छोट्या नोकरीपासून करावी लागली. पण त्यातल्या त्यात जेआरडी टाटा यांनी वेगाने प्रगती केली आणि अनपेक्षितपणे टाटा ग्रुपचे नेतृत्व कमी वयात आपल्या हातात घेतलं.

खरं तर या पदावर जेआरडी यांच्याही आधी नवल टाटा यांचा अधिकार होता मात्र स्वभावाने मृदू आणि अत्यंत सज्जन असलेल्या नवल टाटा यांनी याबद्दल कधी आक्षेप घेतला नाही. नशिबाने आपल्याला भरपूर दिलंय असच ते नेहमी म्हणायचे. त्यांना टाटा समूहाचा संचालक बनवण्यात आलं होतं आणि हि पडती बाजू स्वीकारण्यास नवल यांची कधी ना नव्हती.

नवल टाटा आणि जेआरडी यांच्या व्यक्तिमत्वात देखील प्रचंड अंतर होतं.

नवल टाटा हे दिसायला अत्यंत देखणे आणि मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे. जेआरडी याच्या बरोबर उलट. त्यांना नवल टाटा हे झेपायचे नाहीत. दोघांच्यात बरेच मतभेद देखील व्हायचे मात्र सुसंस्कृत टाटा घराण्याने ही गोष्ट कधी बाहेर येऊ दिली नाही. अगदी खासगीतही ते एकमेकांबद्दल चांगलंच बोलायचे.

नवल टाटा अत्यंत मार्दवशील स्वभावाचे होते. आपल्या स्वीय सचिवाला देखील ते कधी आदेश द्यायचे नाहीत. प्रत्येकाशी बोलताना त्यांचा विनंतीवजा सूर असायचा. त्यांचा कामगार कायद्याचा अभ्यास मोठा होता. भारतसरकारच्या नियोजन आयोगाचा सदस्य म्हणून देखील त्यांना घेण्यात आलं होतं. भारतीय हॉकी फेडरेशनचे ते १५ वर्ष अध्यक्ष होते. त्यांना पदमभूषण पुरस्कार देखील मिळाला होता.

इतकं असूनही नवल टाटांच्या नावामागे कधी प्रसिद्धीचं वलय नव्हतं. पडद्यामागे राहून त्यांनी टाटा उद्योगसमूहाला बळकट करण्याचं काम केलं. 

त्यांचा हा पडद्यामागे राहण्याचा स्वभाव एकदाच उफाळून आला. आजवर टाटा आडनावाच्या माणसाने जे केलं नव्हतं ते नवल टाटांनी करायचं ठरवलं….

“लोकसभेची निवडणूक लढवणे .”

टाटा उद्योगसमूहाचे डोलारा उभा करताना आजवर राजकारण्यांशी संबन्ध आला होता. स्वातंत्र्यापूर्वी गांधीजींच्या लढ्याला मदत करणे वगैरे गोष्टी टाटांनी केलेल्या. जेआरडी टाटा हे एकेकाळी नेहरूंचे मित्रच होते. मात्र जेव्हा एअर इंडियाचे नेहरूंनी राष्ट्रीयकरण केलं तेव्हा पासून टाटांनी त्यांच्यापासून अंतर राखण्यास सुरवात केली होती.

राजकारण आणि व्यापार एकत्र होत नाही हे जेआरडी टाटांच्या मनात पक्के बसलं होतं. म्हणून टाटांच्या घराण्यात कोणीही थेट राजकारणात कधी उतरला नव्हता आणि अशात नवल टाटा थेट निवडणूक रिंगणात उतरायची भाषा बोलत होते. अनेकांसाठी हा मोठा धक्का होता.

 असं म्हणतात कि जेआरडी टाटा याना हि कल्पना पसंत पडली नाही पण नवल टाटा यांना त्यांनी थेट या विषयावर आपलं मत देखील सांगितलं नाही.

नवल टाटा यांनी १९७१ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

त्यांनी अर्ज भरला तो मतदारसंघ होता दक्षिण मुंबई. भारतातील सर्वात उच्च्भ्रू वसाहत असलेला हा मतदारसंघ. याचे वैशिष्ट्य म्हणजे मागच्याच निवडणुकीत मुंबईचा सम्राट समजल्या जात असणाऱ्या स.का.पाटील यांचा कामगार चळवळीतील नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी पराभव केला होता. जायंट किलर म्हणून फर्नांडिस यांना देशभरात ओळख मिळाली होती.

यावेळी निवडणुकीच्या रिंगणात स.का.पाटील नव्हते त्यांच्या ठिकाणी डॉ.कैलास नावाचे एक नवखे उमेदवार उभे होते. त्यामुळे जॉर्ज फर्नांडिस यांच्यापुढे हा विजय एकदम सोपा मानला जात होता.

अशातच नवल टाटा यांनी निवडणुकीत अर्ज भरून खळबळ उडवून दिली. असं म्हणतात कि नवल टाटा यांनी अर्ज दाखल केल्यावर इंदिरा गांधी जेआरडी टाटा यांच्यावर नाराज झाल्या. त्या तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. त्यांनी जेआरडी टाटा यांना विचारणा केली,

‘So the Tata group wants to set up a front against me?

सर्व बाजुंनी नवल टाटा यांच्या उमेदवारीला विरोध होत होता. फक्त एकच माणूस त्यांच्या पाठीशी उभा राहिला. तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

बाळासाहेबांचा काँग्रेसला विरोध होता. आणि  साम्यवादी कामगार चळवळीशी निगडित असलेल्या जॉर्ज फर्नांडिसशी तर त्यांचं उभं वैर होतं.

जॉर्ज फर्नांडिस आणि टाटा उद्योगसमूहाचं नातं देखील तितकं खराब होत असं नाही. फर्नांडिस यांना एकदा ताज हॉटेलसमोर मारहाण झाली होती तेव्हा जेआरडी यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. पुढे काही वर्षांनी त्यांना जमशेदपूरच्या कामगार युनियनचा प्रमुख होणार का याची विचारणा केली होती. पण फर्नांडिस यांचा त्याकाळचा डॅशिंग स्वभाव आणि भांडवलशाही विरुद्ध उभारलेला लढा यामुळे त्यांनी ताटांच्यापासून अंतरच राखलं होत.

मात्र या निवडणुकीमुळे फर्नांडिस आणि टाटा एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले होते.

बाळासाहेबांच्या आदेशामुळे शिवसैनिक नवल टाटा यांच्या प्रचारात उतरले. स्वतः बाळासाहेब त्यांचे प्रचारप्रमुख होते असं म्हणतात. तळागाळातला शिवसैनिक टाटा उद्योगाच्या राजकुमारच्या निवडणुकीसाठी जीवाचं रान करत होता. जयंत साळगावकर हे देखील नवल टाटा यांच्या प्रचारात आघाडीवर होते.

या सगळ्याचा परिणाम दिसून आला. निवडणुकीच्या निकालानंतर जॉर्ज फर्नांडिस यांचं डिपॉझिटच जप्त झालं. नवल टाटा देखील निवडणुकीत पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला पण नवल टाटांनी त्यांना चांगलीच लढत दिली होती. दोघांच्यात फक्त १९ हजार मतांचे अंतर राहिले होते.

शिवसैनिकांनी केलेला प्रचार दिसून येत होता. बाळासाहेब म्हणाले,

“हा बाईचा नाही तर शाईचा विजय आहे.”

त्याकाळी चर्चा होती कि इंदिरा गांधींनी रशिया मधून खास शाई मागवली आहे ज्यामुळे अन्य उमेदवारांच्या बाजूने जे मतदान झाले आहे ते गायब होत होते. खरं खोटं काय माहित पण नवल टाटा यांची लाट असूनही त्यांना पराभव चाखावा लागला. डिपॉजिट जप्त झालेल्या जायंट किलर जॉर्ज फर्नांडिस यांची मात्र माध्यमांनी यथेच्छ चेष्टा उडवली.

जेआरडी व इतरांचा विरोध असताना फक्त शिवसैनिकांच्या बळावर नवल टाटा यांनी घेतलेली आघाडी काहीजणांसाठी धक्कादायक होती. मुकुंद आयर्नचे प्रमुख व जॉर्ज फर्नांडिस यांचे मित्र वीरेन शहा यांनी एके ठिकाणी सांगितली,

“जर नवल टाटा १९६७ साली जॉर्जच्या विरोधात उभे राहिले असते तर त्यांचा नक्कीच विजय झाला असता.”

टाटांचा निवडणुकीशी आलेला हा पहिला आणि शेवटचा संबन्ध. यानंतर नवल टाटा यांना अनेकदा आग्रह होत असूनही त्यांनी कधी परत तिकडे फिरकून पाहिले नाही. १९८९ साली कॅन्सर मुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या काही वर्षातच जेआरडी टाटा यांनी आपला वारसदार म्हणून नवल टाटांच्या मुलाची म्हणजेच रतन यांची निवड केली आणि पुढचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.